पाटण– २ : नेपाळमधील प्राचीन शहर. ललित पाटण व येलोनदेसी ही प्राचीन व ललितपूर हे अर्वाचीन पर्यायी नाव. लोकसंख्या ५३,९३० (१९६८ अंदाज). हे काठमांडूच्या दक्षिणेस तीन किमी. बाघमती नदीजवळ स. स. पासून १,२२० मी. उंचीवर वसले आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य २०० सेंमी. याच्या परिसरात स्तूपांचे अवशेष, असून ते सम्राट अशोकाने बांधल्याचे समजतात. काहींच्या मते हे नगर इ. स. ६५० च्या सुमारास स्थापन झाले असावे. १७६९ मध्ये ते गुरख्यांनी काबीज केले. १९३४ मधील भूकंपाने शहराची बरीच हानी झाली. काठमांडूच्या वाढीमुळे पाटणचे महत्त्व कमी झाले.

येथून लोकर आणि कातड्याची निर्यात होते. येथील बानरा या नेवारच्या उपजमातीचे लोक कुशल सुवर्णकार म्हणून प्रसिद्ध आहेत. येथील अनेक विहार, राजवाडा, दरबार चौक, प्राचीन मंदिरे, प्राणिसंग्रहालय, बुद्धगया मंदिराशी साम्य असलेले महाबुद्ध मंदिर इ. प्रेक्षणीय आहेत. आग्नेयीस अकरा किमी.वरील गोदावरी गावाजवळ पवित्र झरे व हिंदूंची तीर्थस्थाने आहेत. रस्ते आणि दूरध्वनीद्वारा महत्त्वाच्या इतर ठिकाणांशी पाटण जोडलेले आहे. 

चौधरी, वसंत