वर्मा, श्रीकांत : (१८ ऑक्टोबर १९३१ – २५ मे १९८६). आधुनिक हिंदी कवी. बिलासपूर (मध्य प्रदेश) येथे जन्म. नागपूर विद्यापीठाची हिंदी विषयातील एम्.ए. पदवी त्यांनी संपादन केली (१९५६). ते व्यवसायाने पत्रकार होते. त्यांनी दिनमान या प्रख्यात साप्ताहिकासाठी १९६६ – ७७ या काळात खास वार्ताहर म्हणून काम केले, तसेच कृति नावाच्या पत्रिकेचे संपादनही केले (१९५८ – ६२). आयोवा विद्यापीठात ते निमंत्रणावरून अभ्यागत कवी म्हणून गेले होते (१९७० – ७१ व १९७८). त्यांनी ‘नॅशनल फोरम ऑफ रायटर्स ऑफ ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’ ही संघटना स्थापन केली (१९७४). पत्रकारितेप्रमाणेच ते राजकारणातही सक्रिय होते. त्यांची १९७६ पासून राज्यसभेवर सदस्य म्हणून निवड झाली होती. १९८५ पासून ते ‘अखिल भारतीय काँग्रेस’ (आय) कार्यकारिणीचे महासचिव होते.

त्यांनी विविध वाङ्‍मयप्रकार हाताळले असले, तरी त्यांची ख्याती मुख्यत्वे कवी म्हणूनच होती. त्यांची विसाहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांत भटका मेघ (१९५७), माया दर्पण (१९६७), दिनारम्भ (१९६७), जलसाघर (१९७३), मगध (१९८४) व गरुड किसने देखा है (१९८७) हे काव्यसंग्रह झाडी (१९६४), संवाद इ. कथासंग्रह दुसरी बार (१९६८) ही कादंबरी जिरह (१९७३) हा समीक्षाग्रंथ अपोलोका रथ हे यात्रावर्णन बीसवी शताब्दीके अंधेरेमे हा मुलाखतींचा संग्रह व प्रसंगनामक लेखसंग्रह असे विविध प्रकारचे साहित्य अंतर्भूत आहे. यांशिवाय त्यांनी अंड्रयेई व्होझनेसेन्स्की यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद फैसले के दिन या नावाने प्रसिद्ध केला, तसेच लोर्का, पास्तेरनाक, ऑक्टोव्हियो पाझ आदी कवींच्या कवितांचे हिंदी अनुवाद केले. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद अदरवाइज अँड अदर पोएम्स (१९७२) या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

त्यांचा माया दर्पण हा काव्यसंग्रह विविध प्रतिमांनी समृद्ध असून त्यातील तरल कवितांनी त्यांना हिंदी साहित्यविश्वात ख्याती मिळवून दिली. पुढे जीवनाच्या भयावह परिस्थितीचा ताण त्यांच्या कवितांतून व्यक्त होऊ लागला. जलसाघर संग्रहातल्या कविता ह्याचा प्रत्यय देतात. मगध या काव्यसंग्रहाने त्यांच्या आगळ्यावेगळ्या मौलिक प्रतिभेचे समर्थ दर्शन घडविले. राजकीय सद्यस्थितीतील सर्वग्रासी सत्य प्राचीन घटनांतून प्रभावीपणे सूचित करताना राजकारणातील निर्लज्ज भयावहता त्यांनी प्रखरपणे प्रकट केली. या काव्यसंग्रहाने त्यांना पहिल्या दर्जाच्या कवींच्या श्रेणीत आणून बसविले. त्यांच्या अनेक कवितांचे इंग्रजी, जर्मन, रशियन, बल्गेरियन, डॅनिश इ. भाषांत अनुवाद झाले आहेत. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या काही कवितांचा मराठी अनुवाद मगध आणि नंतरच्या कविता (१९८७) या नावाने प्रसिद्ध केला आहे. त्यांनी अमेरिका, यूरोप, रशिया इ. ठिकाणी प्रवास केला. त्यांना अनेक मानसन्मान लाभले : राष्ट्रीय स्तरावरच्या नऊ पुस्तकांपैकी जलसाघर काव्यसंग्रहास मध्य प्रदेश शासनाचा तुलसी पुरस्कार (१९७६) मध्य प्रदेश शासनाचा शिखर सन्मान (१९७९) कुमारन आशान राष्ट्रीय पुरस्कार (१९८४) इ. पुरस्कार त्यांना मिळाले. न्यूयॉर्क येथे त्यांचे निधन झाले.

बांदिवडेकर, चंद्रकांत