गुलाबराय : (१७ जानेवारी १८८८–१३ एप्रिल १९६३). प्रसिद्ध हिंदी निबंधकार, समीक्षक व साहित्येतिहासकार. ‘बाबू गुलाबराय’ या नावाने ते विशेष ओळखले जात. जन्म इटावा येथे. शिक्षण एम्. ए. (तत्त्वज्ञान), एल्‌एल्‌.बी.पर्यंत. पुढे आग्रा विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. संस्कृत, फार्सी व इग्रंजी या भाषा त्यांना चांगल्या अवगत होत्या.

त्यांचा काव्यशास्त्राचा गाढा अभ्यास होता. भारतीय व पाश्चात्त्य काव्यशास्त्रांचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला होता. काव्यशास्त्रांवर लिहिलेले त्यांचे ग्रंथ परिचयात्मक स्वरूपाचे आहेत. उदा., नवरस (१९२१), सिद्धांत और अध्ययन (१९४६), काव्यके रूप (१९४७) इत्यादी. त्यांनी तत्त्वज्ञानावरही काही सुबोध ग्रंथ लिहिले आहेत. उदा., कर्तव्यशास्त्र (१९१९), तर्कशास्त्र (३ भाग–पहिले दोन भाग पाश्चात्त्य तर्कशास्त्रासंबंधी व तिसरा भाग भारतीय तर्कशास्त्रासंबंधी १९२५, २७, २९), पाश्चात्त्य दर्शनोंका इतिहास (१९२६), मनकी बाते (१९५४) इत्यादी. हिंदी काव्य विमर्ष (१९५५) व अध्ययन और आस्वाद (१९५७) या ग्रंथांत त्यांचे दर्जेदार समीक्षात्मक लेख आहेत. अत्यंत नम्रपणे आणि रसिकतेने ते समीक्षा करतात. आवेश, तर्ककठोर विश्लेषण आणि दोषदर्शन त्यांच्या समन्वयी प्रवृत्तीला फारसे मानवत नाही. गुलाबराय यांचे हिंदी साहित्यातील स्थान मुख्यत्वेकरून त्यांनी लिहिलेल्या निबंधांमुळे कायम झाले आहे. पांडित्य आणि विनोद यांचा समन्वय त्यांच्या निबंधांत आढळतो. कोमलता, सहृदयता व निरहंकारी सरलता यांचे प्रतिबिंब त्यांच्या निबंधांत उमटलेले आहे. फिर निराश क्यों (१९१६), ठलुमा क्लब (१९२८), मेरी असफलताएँ (१९४०), मेरे निबंध (१९५५), कुछ उथले कुछ गहेर (१९५७) हे त्यांचे उल्लेखनीय निबंधसंग्रह होत. हिंदी साहित्यका सुबोध इतिहास (१९३८) हा त्यांचा ग्रंथ विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. त्यात प्राचीन व अवार्चीन लेखकांच्या साहित्याचा गुणग्राहक दृष्टीतून त्यांनी परिचय करून दिला आहे. प्रांजळपणा, सुबोधता आणि शालीनता हे त्यांच्या शैलीचे विशेष आहेत. 

संदर्भ : शर्मा, हरिशंकर नगेंद्र व इतर, संपा. बाबू गुलाबराय स्मृतिग्रंथ, आग्रा, १९७०.  

बांदिवडेकर, चंद्रकांत