अज्ञेय’- सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन : (७ मार्च १९११–        ). एक आधुनिक हिंदी साहित्यिक व वृत्तपत्रकार. जन्म गोरखपूर जिल्ह्यातील (उत्तर प्रदेश) कसिया या गावी. बालपणीचा बरासचा काळ लखनौ तसेच काश्मीर, बिहार आणि मद्रास येथे गेला. शिक्षण मद्रास आणि लाहोर येथे झाले. बी. एस्‌सी. झाल्यानंतर एम्. ए.चा अभ्यास करीत असतानाच सशस्त्र क्रांतिकारी चळवळीत ते सहभागी झाले. परिणामत: १९३० च्या अखेरीस त्यांना अटक झाली. त्यानंतरची त्यांची चार वर्षे तुरुंगवासात आणि दोन वर्षे नजरकैदेत गेली. काही वर्षे त्यांनी ‘आकाशवाणी’त नोकरी केली. १९४३–४६ या काळात ते सैन्यातही होते. मानवेंद्रनाथ रॉय यांच्या ‘रॅडिकल डेमॉक्रॅटिक’ पक्षाचे ते सभासद होते. दिनमान  या हिंदी साप्ताहिकाचे संपादन त्यांनी काही वर्षे केले. सध्या ते जोधपूर विद्यापीठात भाषाविभागाचे अध्यक्ष आहेत.

मुख्यत: कवी आणि उपन्यासकार (कादंबरीकार) म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत. तथापि कहानी (कथा), यात्रावृत्त (प्रवासवर्णन) इ. साहित्यप्रकारही त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत.

भग्नदूत (१९३३) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. यानंतर त्यांचे चिंता  (१९४२), इत्यलम्  (१९४६), हरी घासपर क्षण भर  (१९४९), बावरा अहेरी  (१९५४), इंद्रधनु रौंदे हुए  (१९५७), अरी ओ करुणा प्रभामय (१९५९), आँगन के पार द्वार  (१९६१), सागरमुद्रा  (१९७०) इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. प्रिझन डेज अँड अदर पोएम्स (१९४६) हा त्यांच्या इंग्रजी कवितांचा संग्रह. हरी घासपर क्षण भर या काव्यसंग्रहात त्यांची काव्यप्रतिभा प्रकर्षाने प्रगटली आहे, असे अनेक समीक्षकांचे मत आहे. अज्ञेयांच्या प्रौढ, अंतर्मुख आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांच्या काव्यातून येतो. माणसाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, त्याचे स्वातंत्र्य, त्याची निर्मितिक्षमता, त्याचे अंत:संघर्ष, उदात्तता आणि शुद्धता प्राप्त करून घेण्यासाठी चाललेली त्याची धडपड, व्यक्तिमत्वसंपन्न मनुष्य व समाज यांचे संबंध इत्यादींसंबंधीचे त्यांचे अनुभव त्यांच्या काव्यात ठिकठिकाणी व्यक्त झाले आहेत. अरी ओ करुणा प्रभामयमध्ये रहस्यवादी (गूढगुंजनात्मक) काव्य लिहिण्याकडे त्यांचा कल दिसतो. त्यापुढील संग्रहांतून ही वृत्ती अधिक वाढलेली दिसते. त्यांच्या काव्याचा नवीन पिढीतील कवींवर बराच प्रभाव पडलेला आहे.

शेखर—एक जीवनी या त्यांच्या कांदबरीचे दोन भाग प्रसिद्ध झाले आहेत (१९४१, १९४४). एका बुद्धिमान आणि चिंतनशील तरुणाच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या कादंबरीतून त्यांनी घडविले आहे. प्रेमचंदांच्या आदर्शोन्मुख यथार्थवादी ( वास्तववादी ) कादंबऱ्यांनंतर कादंबरीने हिंदी कादंबरीलेखनास एक नवी दिशा दिली. नदी के द्वीप (१९५२) ही त्यांची आणखी एक महत्त्वाची कादंबरी, स्त्रीपुरुषप्रेमासंबंधीच्या हिंदी साहित्यातील रूढ विचारास ह्या कादंबरीने आव्हान दिले. अपने अपने अजनबीमध्ये (१९६१) त्यांनी मृत्यूविषयी केलेले विश्लेषणही लक्षणीय आहे.

कथाकार या नात्याने हिंदी साहित्यात त्यांचे स्थान प्रेमचंद, यशपाल यांसारख्या श्रेष्ठ कथाकारांइतकेच महत्त्वाचे आहे. विपथगा  (१९३७), परंपरा  (१९४४), कोठरी की बात  (१९४५), शरणार्थी  (१९४८),  जयदोल (१९५१) आणि ये तेरे प्रतिरूप  (१९६१) हे त्यांचे कथासंग्रह. कथालेखनात विविध प्रयोग करून कथेविषयीच्या पारंपरिक कल्पना त्यांनी निष्प्रभ करून टाकल्या. त्यांच्या कथांतून सभोवतालच्या परिस्थितीचे पडसाद उमटले आहेत. त्यांच्यामधील विचारवंत त्यांच्या कथांतूनही सतत जाणवतो.

त्रिशंकु (१९४५) आणि आत्मनेपद (१९६०) या पुस्तकांत त्यांचे साहित्यसमीक्षात्मक लेख संगृहीत केले आहेत. त्रिशंकुमधील लेखनावर अनेक पाश्चिमात्य विचारवंतांचा प्रभाव दिसून येतो. परंतु आत्मनेपदमध्ये मात्र त्यांच्या स्वतंत्र चिंतनाचा प्रत्यय येतो. अरे यायावर रहेगा याद? (१९५३) आणि एक बूंद सहसा उछली (१९६०) या त्यांच्या प्रवासवर्णनांचे स्वरूपही चाकोरीबाहेरचे आहे. एका प्रौढ, संवेदनशील आणि उत्कट काव्यदृष्टी असलेल्या कलावंताच्या अनुभवांचे सर्जनशील रूप त्यांत आढळते.

एक श्रेष्ठ साहित्यिक म्हणूनच नव्हे, तर कुशल संपादक म्हणूनही त्यांचे स्थान मोठे आहे. सैनिकविशाल भारतबिजलीप्रतीक  इ. हिंदू व वाक्‌  या इंग्रजी नियतकालिकांचे ते संपादक होते. त्यांनी संपादिलेल्या तार सप्तकमध्ये (१९४३) त्यांनी स्वत:च्या आणि नव्या वळणाचे काव्य लिहिणाऱ्या इतर सहा कवींच्या काव्याचे संकलन केले आहे. त्यानंतरच्या दूसरा सप्तक  (१९५१) वतीसरा सप्तक  (१९५९) या काव्यसंग्रहांत त्यांनी सात-सात नवोदित कवींच्या वेचक कविता संपादिल्या आहेत. तार सप्तकनंतर हिंदीमधील छायावादी ( स्वच्छंदतावादी ) काव्य मागे पडले आणि प्रयोगशील अशी यथार्थवादी काव्यपरंपरा सुरू झाली, हे अनेक समीक्षकांनी मान्य केले आहे. या तिन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनांतून त्यांनी काव्यविषयक अनेक समस्यांचा सूक्ष्मपणे परामर्श घेतला आहे.

अज्ञेय यांनी हिंदी भाषेला एक नवे सामर्थ्य आणि सौंदर्य प्राप्त करून दिले. हिंदी साहित्यास आधुनिक रूप देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.

संदर्भ : १. चतुर्वेदी, रामस्वरूप, अज्ञेय और आधुनिक रचना की समस्या, कलकत्ता, १९६८.

२. झा, सुमन, अज्ञेय का काव्य, कानपूर, १९६४.

३. बांदिवडेकर, चंद्रकांत, अज्ञेय की कविता : एक मूल्यांकन, अलाहाबाद, १९७१.

बांदिवडेकर, चंद्रकांत