पृथ्वीराज रासो : हिंदीतील हा अनेक दृष्टींनी विवादास्पद ठरलेला ग्रंथ ‘रासो’ काव्यपरंपरेतील एक महत्त्वाचा काव्यग्रंथ आहे. ग्रंथाचा नायक पृथ्वीराज याच्या चंद विराद्दिआ (बरदाई) नावाच्या मित्राने तो लिहिला व हा चंद कवी पृथ्वीराजाचा समकालीन होता, असे मत प्रचलित आहे. हा ग्रंथ चंद कवीनेच लिहिला याबद्द्ल शंका नाही कारण सर्व उपलब्ध प्रतींत वेळोवेळी चंद कवीचा ग्रंथकार म्हणून उल्लेख आहे. मात्र हा चंद कवी पृथ्वीराजाचा समकालीन तसेच त्याचा मित्रही होता असे काव्यांतर्गत पुराव्यावरून जरी म्हणता आले, तरी त्यातील अनैतिहासिक भागांवरून हा पृथ्वीराजानंतरचा कोणी कवी होता, असे माताप्रसाद गुप्त यांनी निश्चितपणे सांगितले आहे. या ग्रंथाची रचना संवत १४८० च्या (इ.स. १४२३) आसपास झाली असावी, असाही माताप्रसाद गुप्तांचा निष्कर्ष आहे. पृथ्वीराज रासोच्या सु. शंभरावर प्रती उपलब्ध आहेत. यांची एक यादी मोतीलाल मेनारिया यांच्या राजस्थानी पिंगल साहित्य या ग्रंथात दिली असून त्यात ६० प्रतींच्या प्राप्तीची स्थानेही नमूद केली आहेत. त्यांचे आकार वेगवेगळे आहेत. पृथ्वीराज रासोची सर्वांत छोटी प्रतच मूळ ग्रंथाशी मिळतीजुळती असावी कारण या प्रतीतील घटना ऐतिहासिक घटनांशी जुळतात. पुढे ग्रंथाचा आकारप्रकार प्रक्षिप्त भागांमुळे वाढला. आज तीन आकार मुख्यत्वे दिसतात : एक छोटा, दुसरा मध्यम व तिसरा बृहत्. माताप्रसाद गुप्तांनी पृथ्वीराज रासोवर अनेक वर्षे संशोधन करून जी प्रत सिद्ध केली आहे, तीत आधारभूत म्हणून सु.१० प्रती घेतल्या आहेत. पैकी धारणोज (तालुका पाटण, गुजरात) येथे मिळालेल्या प्रतीचा व जैन विद्वान मुनी जिनविजयजी यांच्या संग्रहातील प्रतीचा विशेष उपयोग करून घेतला गेला आहे. नामवर सिंह यांनी पृथ्वीराज रासोच्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी ही धारणोज-प्रत महत्त्वाची मानली.

माताप्रसाद गुप्त यांनी संपादित केलेल्या प्रतीत ह्या ग्रंथाची १२ सर्गांत विभागणी केली असून एकूण छंद ३६१ आहेत. सर्वांत मोठी प्रत ६९ सर्गांत विभागली असून, तीत १६ हजार छंद आहेत. यावरून वेगवेगळ्या स्थळी व काळी पृथ्वीराज रासोग्रंथात झालेल्या प्रचंड फेरबदलाची कल्पना येते. पृथ्वीराज रासो पूर्णपणे ऐतिहासिक काव्य नाही पण ती एका जबाबदार कवीची कृती असून त्याने प्राप्त ऐतिहासिक व्यक्तींचा व घटनांचा तीत कौशल्याने उपयोग करून घेतला आहे. इतिहासाऐवजी ‘काव्य’म्हणून रचना केली असल्यामुळे त्यात कल्पिताचा उपयोग स्वाभाविकपणेच अधिक आहे. मध्ययुगातील एक यशस्वी ऐतिहासिक काव्य म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. कर्नल टॉड या ग्रंथामुळे खूपच प्रभावित झाला होता. रासोच्या भाषेवर नामवर सिंह यांनी विस्ताराने विचार केला असून त्यांचा निष्कर्ष असा आहे, की ही पूर्णपणे अपभ्रंश भाष नाही, ती डिंगल किंवा प्राचीन पश्चिमी राजस्थानीही नव्हे, जुनी व्रज भाषाही नाही, तर ती जुनी पूर्वी राजस्थानी असून तिला पिंगल म्हटले जाते. मात्र ‘प्राकृत पिंगल’ पेक्षा ती अधिक विकसित असून तीत प्राकृत-अपभ्रंशाची रूढ रुपे कमी आहेत. ती नव्या आर्यभाषांच्या जवळ येते. या निष्कर्षाशी आपली बव्हंशी सहमती दाखवून माताप्रसाद गुप्त म्हणतात, पिंगल स्थानिक भाषा नसून ती ग्रांथिक भाषा आहे व शौरसेनी-अपभ्रंशापासून निघालेली साहित्यिक भाषा आहे. मात्र या भाषेत प्राकृत-अपभ्रंशाची रूढ रूपे नामवर सिंह समजतात त्यापेक्षा अधिक आहेत. रासोचे कथानक थोडक्यात असे : कनौजचा राजा जयचंद याने आपली मुलगी संयोगिता हिच्या स्वयंवरासाठी पृथ्वीराजाला मुद्दाम बोलाविले नाही. पृथ्वीराजाने तिचे हरण करून तिच्याशी विवाह केला व बराच काळ त्याने तिच्या समवेत विलासात घालविला. शिहाबुद्दीन घोरीने त्याच्यावर स्वारी केली. त्यात पृथ्वीराजाचा पराभव होऊन त्याला कैद करण्यात आले. गझनी येथे कैदेत असताना त्याचे डोळे काढण्यात आले. पुढे चंद कवीच्या योजनेनुसार पृथ्वीराजाने आपला लक्ष्यभेदी बाणाचा चमत्कार दाखविण्याच्या निमित्ताने शिहाबुद्दीनाचा बाणाने वध केला. अशा तऱ्हेने चंद कवीचे ईप्सित साध्य झाले. महाकाव्यात ज्या प्रकारचा चरित्रकल्पना असते, तशी ती या काव्यातही आहे. पृथ्वीराज, संयोगिता, चंद कवी यांची स्वभावचित्रे सरस आहेत. या काव्यात वीररसाला प्राधान्य असून शृंगाररसाचा परिपोषही चांगला आहे. रासोमधील युद्धवर्णने अप्रतिम आहेत. या काव्यात वीररसाला प्राधान्य असून शृंगाररसाचा परिपोषही चांगला आहे. रासोमधील युद्धवर्णने अप्रतिम आहेत. हा ग्रंथ विविध छंदात लिहिलेला असून सारिका व भुजंगप्रयात हे छंद विशेषत्वाने वापरले आहेत. दोहा, छप्पय, रासा, पद्धडी, गाथा, मुडिल्ल, अडिल्ल या छंदाचा प्रयोगही त्यात केला आहे. एका महान आदर्शाने प्रेरित होऊन लिहिलेल्या या काव्याचा नायक महाकाव्याला साजेसा तर आहेच, पण रसपरिपोष, जीवदर्शन, वर्णनशैली, छंद-प्रयोग, सर्गबद्धता या सर्वच दृष्टींनी हे महाकाव्य लोकप्रियतेच्या कसोटीवरही मान्यता पावलेले आहे.

संदर्भ : १. गुप्त, माताप्रसाद, संपा. पृथ्वीराज रासउ, चिरगाव (झांशी), १९६३.

२. त्रिवेदी, बिपिनबिहारी, चंदबरदायी और उनका काव्य, अलाहाबाद, १९५२.

३. द्विवेदी, हजारीप्रसाद सिंह, नामवर संपा. पृथ्वीराज रासो (संक्षिप्त), अलाहाबाद, १९६१.

बांदिवडेकर, चंद्रकांत