सुदर्शन : (१८९५–१९६७). सुप्रसिद्घ हिंदी कथाकार. मूळ नाव बद्रीनाथ भट्ट. जन्म सियालकोट (पाकिस्तान ) येथे. बी.ए. पर्यंत शिक्षण. आरंभी ते उर्दूमध्ये व नंतर हिंदीत लिहू लागले. त्यांची पहिली लघुकथा ‘हार की जीत’ ही सरस्वती मासिकात १९२० मध्ये प्रसिद्घ झाली व तिने जाणकार वाचकांचे लक्ष वेधून घेतले. ‘कवी की स्त्री ‘, ‘अपराधी’, ‘संसार की सबसे बडी कहानी’, ‘कमल की बेटी ‘ ह्या त्यांच्या काही गाजलेल्या कथा होत. ह्या कथांनी त्यांना कथाकार म्हणून खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी कादंबऱ्या व नाटकेही लिहिली पण त्यांना जनमानसात कथाकार म्हणून जास्त मान्यता मिळाली. ते ⇨प्रेमचंदां च्या परंपरेतील महत्त्वाचे लघुकथालेखक मानले जातात. प्रारंभी त्यांच्यावर आर्य समाजाचा गाढ प्रभाव होता. काही काळ आर्य समाजाचे प्रचारक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. आर्य समाजी विचारसरणीच्या प्रभावामुळे त्यांचे लेखन आदर्शवादाकडे झुकलेले दिसून येते. व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्यावर सुसंस्कार करणारा आदर्शवाद त्यांच्या कथांतून प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या कथांची बांधणी कलात्मक चिरेबंदी असे. व्यक्तिरेखा अस्सल, विश्वासार्ह व वास्तवदर्शी भासतील अशा प्रकारे ते उभ्या करीत. त्यांच्या कथांचे विषय व कथावस्तूची बांधणी ह्यांवर प्रेमचंदांचा प्रभाव जाणवतो.

सुदर्शन यांच्या कथांमध्ये सामाजिक हेतुप्रवणता आढळते. विशिष्ट सामाजिक हेतू समोर ठेवून ह्या कथा लिहिलेल्या दिसतात. त्यांच्या लिखाणामागे नैतिक प्रेरणा प्रबळ असल्या, तरी कथांची मांडणी सुबक व कलात्मक असल्याने त्यांना वाङ्‍मयीन मूल्य प्राप्त होते. मानवी मनाचे व सामाजिक समस्यांचे चित्रण करताना त्यांचे लक्ष आदर्श मानवी मूल्यांचे गुणगान करण्याकडे असते. कथानकाची बांधणी करताना वाचकांना पुढील घटनाक्रमाबाबत उत्कंठा वाटेल अशा उत्कंठावर्धक पद्घतीने ती ते करतात. त्यामुळे वाचक त्यात रंगून जातो. पुष्पलता (१९१९), सुप्रभात (१९२३), परिवर्तन (१९२६), सुदर्शन सुधा (१९२६), तीर्थयात्रा (१९२७), फूलवती (१९२७), सुदर्शन सुमन (१९३४), गल्प-मंजरी (१९३४), चार कहानियाँ (१९३८), पनघट (१९३९), अँगूठीका मुकदमा (१९४०) हे त्यांचे काही प्रमुख कथासंग्रह होत. आनरेरी मजिस्ट्रेट (१९२७) हे गाजलेले प्रहसन अंजना (१९२३), सिकंदर, भाग्यचक्र ही अन्य नाटके व भागवन्ती ही कादंबरी हे त्यांचे उल्लेखनीय इतर साहित्य होय. सबकी बोली हे त्यांनी संपादिलेले पाठ्यपुस्तक एके काळी लोकप्रिय होते. त्यांनी चित्रपटसृष्टीतही बरीच वर्षे काम केले.

सारडा, निर्मला