सांकृत्यायन, कमला : (१५ ऑगस्ट १९३०–२५ ऑक्टोबर २००९). हिंदी व नेपाळी साहित्यिक. त्यांचा जन्म कालिंपाँग (जि. दार्जिलिंग) येथे एका विद्वान घराण्यात झाला. त्यांची मातृभाषा नेपाळी. हिंदी साहित्य हा विषय घेऊन त्या आगा विद्यापीठातून एम्.ए. पीएच्.डी. झाल्या. याशिवाय त्यांनी प्रयागची ‘साहित्यरत्न’ ही पदवी संपादन केली. त्यांनी दार्जिलिंगच्या लोरेतो कॉलेजमधील हिंदी विभागात प्रपाठक म्हणून, तसेच नवी दिल्ली येथील ‘नॅशनल कॉलेज फॉर मायनॉरिटीज’ येथे अध्यापन केले. ख्यातनाम भारतीय महापंडित ⇨राहुल सांकृत्यायन (१८९३–१९६३) यांच्या त्या पत्नी होत. त्यांनी नेपाळी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांत विपुल लेखन केले असून त्यांचे चौदा ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. त्यांपैकी विचार तथा विवेचन (समीक्षा १९८१), राहुल सांकृत्यायन आणि लक्ष्मीनाथ बेझबरुआ ही चरित्रे (अनुवादित) हे त्यांचे नेपाळी भाषेतील लेखन होय. भूतान (१९७२), आसाम की लोककथायें (१९७४), प्रतिवेशी साहित्य (१९८४), जीवनयात्रा (१९९४ राहुल सांकृत्यायनांचे चरित्र) हे त्यांचे काही हिंदी ग्रंथ होत. नॅशनल बिब्लिऑगफी ऑफ इंडियन लिटरेचर ह्या साहित्य अकादीने प्रकाशित केलेल्या राष्ट्रीय ग्रंथसूचीच्या नेपाळी भाषा विभागाचे संकलक-संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या त्या सदस्या होत्या. त्यांनी नेपाळ, म्यानमार, श्रीलंका, रशिया, चीन आदी देशांचे सदिच्छा दौरे केले. त्यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांत शैक्षणिक मंत्रालयाकडून दिलेला अहिंदी लेखकासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (१९७४), पश्चिम बंगाल राज्यपुरस्कार (१९८२), कोलकात्याच्या हिंदी सोसायटीचा ‘रूपलेखा पुरस्कार’ (१९८९), नेपाळी अकादमी पुरस्कार, राहुल सांकृत्यायन पुरस्कार (१९९४) इ. सन्माननीय व महत्त्वाचे पुरस्कार होत.

कुलकर्णी, अ. र.