घनानंद : (सतरावे-अठरावे शतक). रीतिकालीन प्रसिद्ध हिंदी कवी. आपल्या रचनेत त्याने घनानंद, आनंदमोद, घन आनंद, आनंद-निधान, आनंदमेघ, आनंदघन इ. विविध नावे धारण केलेली आढळतात. आनंद व घनानंद तसेच आनंदघन व घनानंद हे वेगवेगळे कवी असावेत, असा विद्वानांचा तर्क आहे. घनानंदाच्या जीवनाबाबत अधिकृत माहिती फारशी मिळत नाही. तो जातीने कायस्थ होता आणि त्याची संगीतात व साहित्यात चांगली गती होती. सुरुवातीस तो दिल्ली येथे मुहंमदशाह रंगीले याच्या दरबारात मीर मुन्शी (अव्वल कारकून) होता व पुढे मुंहमदशाहशी त्याचे न पटल्यामुळे तो मथुरेला जाऊन राहिला असे सांगतात. मथुरेला गेल्यावर त्याने निंबार्क मताचे आचार्य वृंदावनदेव यांच्याकडून दीक्षा घेतली. घनानंदाच्या जन्माबाबत १६५८, १६७३ आणि १६८९ ही तीन वर्षे दिली जातात तसेच त्याच्या मृत्यूबाबतही १७३९, १७५६ व १७६० ही तीन वर्षे दिली जातात. मथुरेवर झालेल्या अहमदशाह अब्दालीच्या आक्रमणात घनानंद मारला गेला, असे सांगतात.

घनानंद दिल्लीस असताना मुहंमदशाह रंगीले याच्या दरबारातील सुजान नावाच्या नर्तिकेवर (वेश्येवर) आसक्त होता आणि तिचे सौंदर्य, प्रेम व विरह ही त्याच्या काव्याची प्रमुख प्रेरणाही होती, असे मानले जाते. सुजानच्या प्रेमाबाबत त्याने इतक्या तन्मयतेने लिहिले आहे, की तिची ऐहिकता आध्यात्मिकतेत परिणत झाल्यासारखी वाटते. म्हणूनच ईश्वराला त्याने सुजानरूपात पाहिले, की सुजानला ईश्वररूप दिले, असा संभ्रम पडतो. घनानंदाची बरीच कविता मुक्तक (स्फुट) स्वरूपाची असून सौंदर्य, प्रेम, विरह आणि भक्ती यांचा तीत सुंदर आविष्कार झालेला आढळतो. ‘मध्ययुगातील स्वच्छंदतावादी (रोमँटिक) काव्याचा घनानंद सर्वश्रेष्ठ प्रातिनिधिक कवी आहे’, असे गौरवोद्‌गार पं. रामचंद्र शुक्ल यांनी काढले आहेत. घनानंदाची कविता उत्कट, भावनाप्रधान आणि मार्मिक आहे. त्याची भाषा जीवंत असून लक्षणा, व्यंजना या शब्दशक्तींनी ती अर्थसघन झालेली आहे. विशेषतः रीतिकालीन काव्यात जेव्हा स्थूल शरीरसौंदर्याचे वर्णन वा अनुभूतीशून्य कल्पनाविलास यांची विशेष चलती होती. तेव्हा घनानंदाने सच्च्या अनुभूतीतून आपली कविता लिहिली, हे त्याचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

घनानंदाच्या नावावर सु. एक्केचाळीस लहानमोठे ग्रंथ आहेत. सुजानहित, कृपाकंदनिबंध, इश्कलता, व्रजविलास, नाममाधुरी, पदावली, प्रीतीपावस, विचार सार, प्रेम पहेली, प्रिया प्रसाद, मनोरथ मंजरी, छंदाष्टक, त्रिभंगी, बियोग बेलि, गोकुल गीत, कृष्ण कौमुदी, अनुभवचंद्रिका  इत्यादींचा त्यांत अंतर्भाव होतो.

संदर्भ : १. गौड, मनोहरलाल, घनानंद और स्वच्छंद काव्यधारा, बनारस, १९४०.

   २. मिश्र, विश्वनाथप्रसाद, संपा. घनानंद ग्रंथावली, बनारस, १९५२.

बांदिवडेकर, चंद्रकांत