मलूकदास : (१५७४−१६८२). हिंदी संत कवी व मलूकदासी संप्रदायाचे प्रवर्तक. मलूकदास प्रयागजवळील कडा गावात जन्मकले. त्यांच्या वडिलांचे नाव सुंदरदास असल्याचे त्यांचे चरित्रकार सथुरादास सांगतात तथापि त्याबाबत तसेच गुरू, वैवाहिक जीवन, तीर्थयात्रा इ. चरित्रतपशिलांबाबत अभ्यासकांत मतभेद आहेत. जात क्षत्रिय. परंपरागत धंदा कांबळी विकण्याचा. या मलूकदासांचे मूळ नाव मल्ल होते. लहानपणापासून सत्संगाची आवड. वृत्तीने अतिशय उदार. कांबळ्या विकताना एकदा ईश्वराने त्यांचे ओझे वाहून आणल्याचा साक्षात्कार झाला व तेव्हापासून ते पूर्णपणे भक्तिमार्गी झाले. अनेक चमत्कार केल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. औरंगजेबाची त्यांच्यावर मर्जी होती म्हणूनच कडा गाव जझिया करापासून मुक्त राहिले. औरंगजेबाचा एक सरदार फतेह खाँ त्यांचा शिष्य झाला व पुढे मीर माधव नावाने प्रसिद्धीस आला.

मलूकदासांचे पहिले गुरू देवनाथ अथवा पुरूषोत्तम. दुसरे मुरारी स्वामी. मलूकदास १०८ वर्षे जगले व गृहस्थधर्मी होते. त्यांना एक कन्या होती. कन्या व  पत्नी यांचा मृत्यू झाल्यावर ते विरक्तपणे जीवन कंठू लागले. असे सांगतात, की त्यांच्या मृत्यूच्या वेळी शिष्यांना व कुटुंबियांना शंख व घंटा यांचे निनाद ऐकू येऊ लागले. त्यांना त्यांच्या इच्छेवरून गंगेत महासमाधीसाठी सोडण्यात आले. त्यांचे शरीर त्रिवेणी घाट, दशाश्वमेध घाट यांवर थांबून पुढे जगन्नाथपुरीस गेले व तिथे पंड्यांना स्वप्न-दृष्टांत झाला. त्यांनी त्यांना प्रवाहातून ओढून जगन्नाथाच्या मूर्तीसमोर ठेवले. मलूकदासांनी जगन्नाथाचे उच्छिष्ट खाऊन राहण्यासाठी तिथेच स्थान मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. तिथे त्यांचे स्थान आजही दाखविले जाते.

यांचे काव्यग्रंथ : ज्ञानबोध, रतनखान, भक्तवच्छावलि, भक्तिविषेक, ज्ञानपरोछि, बारह खडी, रामावतारलीला, ब्रजलीला, ध्रुवचरित, विमयविभूति, सुखसागर. ज्ञानबोध, रतनखान आणि भक्तवच्छावलि हे त्यांचे तत्त्वज्ञानपर महत्त्वाचे ग्रंथ असून त्यांत ज्ञान, भक्ती व वैराग्य यांच्या समन्वयाचे विवरण आहे.

तत्त्वज्ञान, भक्ती व योग या विषयांवर त्यांनी लिहिले. ते रामनाम घेत पण सगुण भक्त नव्हते. गीतेच्या तत्त्वज्ञानावर त्यांची अतीव श्रद्धा होती. त्यांच्या काव्यात संपूर्ण समर्पणाने युक्त प्रेम व भक्ती यांचा आविष्कार झाला आहे. त्यांची रचना मुख्यत्वे अवधीत असली, तरी खडी बोलीचाही प्रभाव तिच्यावर आहे. भाषाभ्यासाच्या दृष्टीने त्यांच्या ग्रंथांचे महत्त्व विशेष आहे.

त्यांचा भाचा सथुरादास याने त्यांचा जीवनपरिचय करून देणारी परिचई लिहिली पण ती ती अप्रकाशित आहे. त्यांचा मलूकदासी पंथ प्रसिद्ध असून त्यांच्यानंतर त्यांचा पुतण्या रामसनेही ह पंथाच्या गादीवर बसला. त्यानंतर अयोध्यादास या शेवटच्या उत्तराधिकाऱ्यापर्यंत सु.आठ उत्तराधिकारी झाले. नंतर गादीची परंपरा तुटली. पुरी, पाटणा, मुलतान या ठिकाणी त्यांचे अनुयायी आढळतात.

संदर्भ : 1. चतुर्बेदी, परशुराम, उत्तरी भारत की संतपरंपरा, अलाहाबाद,१९५१.

           २. राकेश, विष्णुदत्त, उत्तर भारतके निर्गुंण पंथ साहित्य का इतिहास, अलाहाबाद,१९७५.

बांदिवडेकर, चंद्रकांत