बिग्ज, हरमान मायकेल : (२९ सप्टेंबर १८५९–२८ जून १९२३) अमेरिकन वैद्य. सार्वजनिक आरोग्याचे प्रणेते व सूक्ष्मजंतुशास्त्राचा संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधाकरिता व नियंत्रणाकरिता उपयोग करण्यावर भर देणारे पहिले अमेरिकन शास्त्रज्ञ.

बिग्ज यांचा जन्म ट्रूमान्सबर्ग या न्यूयॉर्कजवळील गावी झाला. १८७९ मध्ये ते कॉर्नेल विद्यापीठात आणि १८८१ मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या उद्देशाने न्यूयॉर्कमधील बेल्व्ह्यू हॉस्पिटल मेडिकल कॉलेजात दाखल झाले. १८८२ मध्ये त्यांनी कॉर्नेल विद्यापीठाची पदवी मिळवली व १८८३ मध्ये बेल्व्ह्यूची वैद्यकीय पदवी मिळविली.

विद्यार्थी असतानाच त्यांचे लक्ष सूक्ष्मदर्शकीय विकृतिविज्ञानाकडे (विकृतीमुळे शरीराच्या निरनिराळ्या ऊतकांत-समान रचना आणि कार्य असलेल्या पेशींच्या समूहांत–होणाऱ्या बदलांचा सूक्ष्मदर्शकाखाली अभ्यास करणाऱ्या शास्त्राकडे) व नव्याने उदयास येत असलेल्या सूक्ष्मजंतुशास्त्राकडे ओढले गेले होते. १८८४ मध्ये त्या काळात सूक्ष्मजंतू व रोगोत्पादन यांच्या अभ्यासात अग्रेसर असलेल्या जर्मनीला आणि १८८५ मध्ये लुई पाश्चर यांच्या पॅरिसमधील प्रयोगशाळांनाही त्यांनी भेट दिली. त्यामुळे व अधूनमधून यूरोपला भेट देत राहिल्यामुळे त्यांना सूक्ष्मजंतुशास्त्राच्या प्रगतीची अद्ययावत माहिती मिळत गेली.

यूरोपच्या पहिल्या सफरीहून परतल्यानंतर ते बेल्व्ह्यूच्या नव्याने स्थापन झालेल्या कार्नेगी प्रयोगशाळेचे प्रमुख सभासद झाले. अमेरिकेत सार्वजनिक आरोग्य व सूक्ष्मजंतुशास्त्र यांची सांगड घालणारी ही पहिलीच प्रयोगशाळा होती व तिचे कार्य बिग्ज यांच्याच मार्गदर्शनाखाली चालत होते.

इ. स. १८९२ मध्ये न्यूयॉर्क शहराच्या आरोग्य खात्यात नव्याने स्थापन झालेल्या सूक्ष्मजंतुशास्त्र विभागात त्यांची प्रमुख निरीक्षक म्हणून नेमणूक झाली. १९०१ मध्ये शहराचे वैद्यकीय अधिकारी व १९१४ मध्ये न्यूयॉर्क राज्याचे वैद्यकीय आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. या पदांवर काम करीत असताना त्यांनी आपल्या विषयाच्या प्रगतीस मोठा हातभार लावला.

क्षयरोगासंबंधीच्या जुन्या कल्पनांविरुद्ध सतत झगडून हा रोग सूक्ष्मजंतुजन्य असल्याच्या कल्पनेचा त्यांनी पाठपुरावा केला. १८८९ मध्ये ⇨रॉबर्ट कॉख या शास्त्रज्ञांनी क्षयरोगास कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजंतूंचा शोध लाविला होता व त्यामुळे बिग्ज प्रभावित झाले होते. या रोगाकरिता खास आरोग्यभुवने असावीत असे त्यांचे मत होते व ते त्याचा जोरदार पुरस्कारही करीत. वरील कार्याशिवाय ⇨गुप्तरोगांचे प्रयोगशालीय निदान, अर्भक मृत्यु-प्रमाणावर नियंत्रण आणि रोगप्रतिबंधक लशींचा उपयोग यांबद्दलचे त्यांचे कार्यही उल्लेखनीय होते. प्रसूती व बालसंगोपन यांसाठी रुग्णालयातून स्वतंत्र विभाग स्थापण्यात त्यांचा पुढाकार होता. ते न्यूयॉर्क येथे मरण पावले.

भालेराव, य. त्र्यं.