मास्टरजी ऊर्फ झिंदा कौल : (१८८४–१९६६). प्रख्यात काश्मीरी कवी. मूळ नाव झिंदा कौल, तथापि शिक्षकी पेशामुळे ते मास्टरजी ह्या नावानेच अधिक लोकप्रिय झाले. त्यांचा जन्म शेहिततेंग, श्रीनगर येथे एका गरीब कुटूंबात झाला. अत्यंत हालाखीत त्यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले. सुरुवातीस त्यांनी शिक्षण खात्यात अध्यापक म्हणून नोकरी केली. आर्थिक स्थिती फार वाईट असूनही त्यांनी परिश्रम, बुद्धीमत्ता आणि प्रतिभा यांच्या बळावर एक उत्कृष्ट शिक्षक, विद्वान व कवी म्हणन लौकीक संपादन केला. नंतर त्यांनी संशोधन व पुरातत्व विभागांतही काही काळ नोकरी केली. शेवटी त्यांची नेमणूक काश्मीर सरकारच्या मुख्य सचिवालयातील प्रसिद्धी विभागात उच्‍चपदी झाली. फारसे उच्‍च शिक्षण नसतानाही त्यांनी इंग्रजीत काव्यरचना करण्याइतपत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व संपादन केले. उत्पलदेवाच्या (सु. ९२५) संस्कृत स्तोत्रावलीचा त्यांनी इंग्रजीत उत्कृष्ट पद्यानुवाद केला. त्यांच्या काश्मीरी काव्य रचनेवर उपनिषदे तसेच अल्लाम इक्बाल आणि परमानंद ह्यांचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी आरंभी फार्सीत, नंतर उर्दूत आणि त्याही नंतर हिंदीत (संग्रह – पत्र पुष्प, १९४१) काव्यरचना केली. शेवटी ते काश्मीरात रचना करू लागले. मातृभाषेएवजी फार्सी, उर्दू आणि हिंदीत रचना करून त्यांनी आपल्या काव्यप्रतिमेचा दीर्घकाळ अपव्यवयच केला, असे म्हणावे लागते. कारण ह्या परभाषांतील रचनेत त्यांना आपल्या काव्याभिव्यक्तीचे परिणत रूप कधीच गाठता आले नाही. त्यांच्या फार्सी व उर्दू रचनेचे संपादन व संकलन प्रा. ए. एन. रैना यांनी करून त्या रचनांचा ११६ पृष्ठांचा संग्रह १९६४ मध्ये दीवान-ए-साबित नावाने प्रसिद्ध केला. ‘साबित’ हे मास्टरजींनी आपल्या फार्सी व उर्दू भाषांतील रचनेसाठी घेतलेले टोपणनाव होय.

त्यांनी काश्मीरात काव्यरचना करण्यात फारच उशिरा (१९४२ च्या सुमारास) सुरुवात केली आणि आपली मातृभाषा हीच काव्यरचनेसाठी अत्यंत प्रभावी व सर्वोत्कृष्ट माध्यमभाषा असू शकते, याचा साक्षात्कार त्यांना झाला. केवळ दहा वर्षांतच त्यांना त्यांच्या काश्मीरीतील फक्त ३६ कविता संग्रहीत असलेल्या सुमरन (२ भाग, १९५४) ह्या संग्रहास साहित्य अकादेमीचा पुरस्कार प्राप्त झाला (१९५६). सुमरन ह्या संग्रहात त्यांनी आपल्या कवितांचा इंग्रजी गद्यानुवादही दिला आहे.

मास्टरजींच्या व्यक्तीमत्त्वात भारतीय विचारधारेतील गूढवादी व लौकिक अशा दोन वृत्तींचा अनोखा मिलाप झालेला होता. अत्यंत शांत, सभ्य, मृदू ,संवेदनशील व चिंतनशील असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सर्वांवर ते प्रेम करत. निसर्गातील सर्व चराचर वस्तूंचा ते आदर करत व माणसात देव पाहत. ते संपूर्णपणे शाकाहारी होते. ते गूढवादी परंपरेतील असले, तरी आधुनिक विचारांचीही त्यांना डोळस जाण होती. प्रेमाच्या प्रकाशाने अंधःकारमय द्वैताचा पडदा विरून जातो आणि आपण त्यामागील एकतेच्या सन्मुख होतो. ह्या श्रद्धेभोवती त्यांची सर्व काव्यरचना केंद्रित झालेली आहे. मानवाचे ह्रदय जरी एक बुडबुडा असले, तरी त्यात ईश्वरप्राप्तीविषयीची तुफानी तळमळ पेलण्याचेही सामर्थ्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मास्टरजींच्या काव्यात ईश्वरप्राप्तीची तळमळ आणि त्या तळमळीस मिळणारा ईश्वरी प्रतिसाद व्यक्त होताना अत्यंत समर्पक संबोधने आणि संपन्न व सूचक अशा प्रतीके-प्रतीमांचा वापर होतो. त्यांची ईश्वरप्राप्तीची तळमळ काव्यात व्यक्त होताना पारंपारिक शैली तसेच स्तोत्रे, लीला वा भावगीते यांहून वेगळे असे परिमाण काश्मीरी काव्यास प्राप्त झाले आहे.

मास्टरजींनी काश्मीरी काव्यात नियत व अनियत प्रकारच्या काही नवीन लयबंधांची व रचनाबंधांची भर तर घातलीच, पण त्या वेळेपर्यंत होत असलेल्या अनुकरणात्मक त्याच त्या रचनांपासून काश्मीरी काव्य मुक्तही केले. अर्थात मास्टरजींच्या काव्यात काही दोष – उदा., अनवट नावे, मिथ्यकथात्मक संदर्भ, अवघडलेली शब्दरचना, सनसनाटी शब्दकळा इ. – असले तरी त्यांचे प्रमाण अल्प असून त्यांमुळे त्यांच्या काव्यास कमीपणा आलेला नाही. राजकीय पुढाऱ्यांच्या प्रशंसापर लिहिलेल्या दोन कवितांचा अपवाद सोडल्यास त्यांची कविता मोजकी पण अतिशय अर्थसघन व रूपकात्मक आहे आणि ती काश्मीरी साहित्याचा चिरंतन व मोलाचा ठेवा आहे.

मास्टरजींनी प्रख्यात शैली संप्रदायी काश्मीरी कवी ⇨ परमानंद (१९७१–सु. १८९७) यांची कविता चिकित्सकपणे संपादून संकलित करून तीन खंडात प्रसिद्ध केली. त्याचे हे कार्य अतिशय मोलाचे मानले जाते. परमानंद (१९४१) हे त्यांनी लिहिलेले परमानंदांचे चरित्र होय.

प्रा. जे. एल्‌ कौल यांनी मास्टरजींच्या काश्मीरी रचनांचा तसेच त्यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास केलेला असून ते त्यांच्यावरील अधिकारी अभ्यासक मानले जातात. जम्मू येथे मास्टरजींचे निधन झाले.

हाजिनी, मोही-इद्दीन (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)