फ्लेमिश भाषा: हॉलंड, बेल्जियम व अंशतः फ्रान्सच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात पसरलेली फ्लेमिश ही डचची एक महत्त्वाची भगिनीभाषा म्हणून ओळखली जाते. तिचे भाषिक मुख्यतः हॉलंडच्या दक्षिणेला व बेल्जियमच्या उत्तरेला फार मोठ्या संख्येने आढळतात. यांतले बेल्जियमचा काही भाग धरून उत्तरेकडील सर्व फ्लेमिश भाषिक डच भाषा प्रमाण मानतात, तर दक्षिणेकडील वालून-बेल्जियन समाज फ्रेंच भाषेचा वापर करतो. उत्तर बेल्जियममधले फ्लेमिश भाषिक कडवे कॅथलिक आहेत, तर दक्षिणेकडील वालून-फ्लेमिश भाषिक धर्मसुधारणावादी आहेत.

लॅटिनोद्‌भव फ्रेंच भाषेपेक्षा फ्लेमिश भाषा ही उच्चार, व्याकरण, शब्दसंग्रह यांच्या दृष्टीने इतकी वेगळी आहे, की त्यामुळे या दोन समाजांत परस्परभिन्नतेची तीव्र जाणीव असून त्यामुळे आपापली भाषा टिकवून धरणे आणि तिला राष्ट्रीय जीवनात न्याय आणि योग्य ते मानाचे स्थान मिळवून देणे, हे प्रत्येक समाजाला फारच महत्त्वाचे वाटते. तो एक प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन बसला आहे. इतका, की अलीकडच्या काळातसुद्धा या भाषिक प्रश्नावरून वाद होतात, राजकीय पेचप्रसंग निर्माण होतात, चळवळी होतात आणि कधीकधी तर दंगेही होतात.

डच भाषेप्रमाणे फ्लेमिश ही देखील एक लो जर्मन बोली आहे. मात्र दैनिक व्यवहारात या दोन भाषा कितीही स्वायत्त असल्या, तरी त्यांची साहित्यभाषा प्रमाणभूत डच हीच आहे. याचे एक कारण हे, की डचला हॉलंडबाहेरही जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांत महत्त्वाचे स्थान आहे, तर फ्लेमिश मात्र तिच्या मूळ भौगोलिक क्षेत्राबाहेर कुठेही आढळत नाही.

एकमेकींना अतिशय जवळच्या असलेल्या या भाषा फ्रँक आणि सॅक्सनविजेत्यांनी आणलेल्या जर्मानिक बोलीच्या मिश्रणातून बनलेल्या आहेत. ऐतिहासिक व धार्मिक घटनांमुळे या दोघींची स्वतंत्र लिखित परंपरा निर्माण झाली आणि सतराव्या शतकाच्या प्रारंभी (इ. स. १६१९ ते १६३९) त्यांच्यात बायबलची भाषांतरे झाल्यामुळे त्यांचे भिन्न अस्तित्व मर्यादित प्रमाणात टिकून राहिले.

या दोघींनी बौद्धिक क्षेत्रात स्वीकारलेली प्रमाणभूत डच भाषा ही हाय जर्मनपेक्षा अनेक दृष्टींनी वेगळी असली, तरी त्यांच्यापैकी एकीचे दुसरीत रूपांतर करणे सहज शक्य आहे. त्यामुळेच जर्मन व डच-फ्लेमिश या भाषा एकाच मूळ भाषेची परिवर्तीत रुपे आहेत असे निश्चितपणे म्हणता येते.

संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Ed. Les Langues du monde, Paris, 1952.

2. Meillet, Antoine, Les Langues Dans I’Europe Nouvelle, Paris, 1928.

कालेलकर, ना. गो.