आनाक्रेऑन: (सु. ५६३ – सु. ४७८ इ. स. पू.). एक ग्रीक भावकवी. जन्म आशिया मायनरमधील टीऑस या लहानशा बेटावर. आशिया मायनरमधील ग्रीक राज्यांवर पर्शियनांनी हल्ले सुरू केल्यानंतर इ. स. पू. सु. ५४५ मध्ये तो थ्रेसमधील ॲब्डिरा येथे आला. त्यानंतर काही काळ तो सेमॉस बेटावर पोलिक्राटीझच्या दरबारी होता. पोलिक्राटीझच्या मृत्यूनंतर अथेन्सचा सत्ताधीश हिपार्कस याच्याही दरबारी तो होता. इ. स. पू. ५१४ मध्ये हिपार्कसचा खून झाला. त्यानंतरच्या काळातील आनाक्रेऑनच्या जीवनासंबंधी निश्चित अशी काहीच माहिती मिळत नाही तथापि तो दीर्घकाळ जगला असावा, असा तर्क केला जातो. त्याच्या खेळकर भावकविता आज अत्यंत त्रुटित स्वरूपात उपलब्ध आहेत. प्रेम आणि मदिरा हे ह्या भावकवितांचे मुख्य विषय. त्यांतील काहींत उपरोधही आढळतो. त्याच्या भावकवितांची शैली साधी व सोपी आहे. त्यांत भावनांची सखोलता मात्र फारशी आढळत नाही. आनाक्रेऑनचे अनुकरण फार मोठ्या प्रमाणावर झाले. त्याचे अनुकरण करून लिहिलेल्या सुमारे ६० गीतांचा संग्रह आनाक्रेआँटिआ या नावाने ओळखला जातो.

हंबर्ट, जॉ. (इं.) पेठे, मो. व्यं. (म.)