गुड्‌रूनलीड: मध्ययुगीन जर्मन राष्ट्रीय महाकाव्य. कुडूनलीड असाही त्याचा उल्लेख आढळतो. त्याचा अर्थ गुड्‌रूनचे गीत. त्याचा कर्ता अज्ञात आहे. बव्हेरियात किंवा ऑस्ट्रियात सु. १२४० मध्ये ते रचले गेले असावे. आज ह्या महाकाव्याचे फक्त हस्तलिखित उपलब्ध असून ते सोळाव्या शतकातील आहे. अनेक आपत्तींना धैर्याने तोंड देऊन स्वतःच्या प्रियकराशी एकनिष्ठ राहणाऱ्या गुड्‌रून नावाच्या स्त्रीभोवती हे महाकाव्य मुख्यतः गुंफले गेले असले, तरी त्यात गुड्‌रूनच्या आईची व आजीची अशा अन्य दोन कथाही आलेल्या आहेत. गुड्‌रूनचे प्रेम संपादन करण्यात अयशस्वी ठरलेला हार्टमूट हा गुडरून व तिची मैत्रीण हिल्डऽबुर्ग  ह्यांना पळवून आपल्या नॉर्मंडी राज्यात आणतो. तेथे तो गुड्‌रूनला लग्नाची मागणी घालतो. गुड्‌रून त्याला निश्चयपूर्वक नकार देते आणि तेरा वर्षे हार्टमूटच्या बंदिवासात धीराने काढते. त्यानंतर तिचा प्रियकार सीलँडचा राजा हेरविग नॉर्मंडीत येऊन हार्टमूटचा लढाईत पराभव करतो. गुड्‌रूनला अपमानकारक वागणूक देणारी हार्टमूटची आई गेर्लिंड हिला ठार करण्यात येते. तथापि हार्टमूटने गुड्‌रूनच्या संदर्भात आपल्या सत्तेचा दुरुपयोग केव्हाही केलेला नसल्यामुळे गुड्‌रून त्याचे प्राण वाचवते. हार्टमूट आणि हेरविग ह्यांच्यात समझोता होऊन हार्टमूटचा हिल्डऽबुर्गशी विवाह करून देण्यात येतो. या महाकाव्याची जडणघडण विस्कळीत आहे. ⇨नीबलुङ्‌‌गनलीड  या पहिल्या जर्मन महाकाव्याप्रमाणेच हे महाकाव्य म्हणजे एक साहसगीत आहे. म्हणूनच ह्या महाकाव्याची तुलना होमरच्या ⇨ओडिसीशी केली जाते. अँग्लो-सॅक्सन किंवा प्राचीन इंग्रजीत रचिल्या गेलेल्या बेवूल्फसारख्या महाकाव्याच्या परंपरेशीही त्याचे नाते आहे.   

घारपुरे, न. का.