नॉर्वेजियन साहित्य : आधुनिक युरोपीय भाषा-साहित्यांत नॉर्वेजियन साहित्याला महत्त्वाचे स्थान आहे. नॉर्वेजियन साहित्याचा मूलस्रोत आणि परंपरा ह्यांचा शोध घ्यावयाचा झाल्यास एक हजारांहून अधिक वर्षे मागे जावे लागेल. रूनिक लिपीत कोरलेले काही लेख–ह्यांचा काळ इसवी सनाचे सु. पाचवे शतक–हे ह्या साहित्याचे आदिरूप होय. ह्या लेखांतून अनुप्रासयुक्त अशी काही काव्यरचनाही आढळते. नार्वेजियनांचे आरंभीचे साहित्य ओल्ड नॉर्समध्ये असून त्यातील बरेचसे आइसलँडमध्ये आणि आइसलँडच्या रहिवाश्यांकडून निर्मिले गेले आहे. असे असले, तरी ह्या साहित्यावरील नॉर्वेजियन छाया अनेकदा प्रकर्षाने प्रत्ययास येते. त्यावरून हे साहित्य निर्माण करणारे बरेचसे साहित्यिक दीर्घकाळ नॉर्वेत राहिलेले असावेत, असा तर्क केला जातो. आइसलँडिक एड्डा, सागा व स्कॉल्डिक काव्य ह्यांची प्रेरणा नॉर्वेजियन साहित्यामागे असल्याचे दिसून येते. स्कँडिनेव्हियन मिथ्यकथांचा संपन्न वारसा ह्या साहित्याला लाभलेला आहे. ह्या साहित्याचा आढावा घेत असताना नॉर्वेजियन ग्रंथनामे देण्याऐवजी शक्य तो त्यांचे इंग्रजी शीर्षकार्थच दिलेले आहेत.

नॉर्वेजियन भाषेतील आरंभीच्या उल्लेखनीय ग्रंथांत द किंगज मिरर ह्या १२५० च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या पद्य ग्रंथाचा अंतर्भाव होतो. चालीरीती आणि व्यवहारज्ञान ह्यांचा बोध राजपुत्रांना करून देण्याच्या उद्देशाने हा ग्रंथ कुणा अज्ञात लेखकाने रचिला आहे. तत्कालीन सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब त्यात पडलेले आहे. काही भौगोलिक आणि व्यापारविषयक माहितीही त्यात आहे. तेराव्या शतकात बॅलड ह्या साहित्यप्रकारासही बरीच लोकप्रियता प्राप्त झालेली होती. फ्रान्समधील त्रूबदूरांचा तसेच इंग्रजी व स्कॉटिश बॅलडरचनेचा लक्षणीय प्रभाव नॉर्वेजियन बॅलडवर दिसून येतो. हे बॅलड मुख्यत: मौखिक परंपरेनेच प्रसृत झाले. त्यांपकी सु. दोनशेच लिखित स्वरूपात जतन केले गेले आहेत. ‘ड्रीम बॅलड’(तेरावे शतक) ही एक विशेष उल्लेखनीय अशी बॅलडरचना. हे एक स्वप्ननिवेदन असून स्वप्नात पाहिलेले परलोकदर्शन त्यात घडविलेले आहे. इटालियन महाकवी दान्ते ह्याच्या दिव्हीना कोम्मेदीतील काही कल्पना ह्या बॅलडमधील कल्पनांशी मिळत्याजुळत्या आहेत. ख्रिस्ती धर्मश्रद्धेचा प्रभाव ह्या बॅलडवर असला, तरी काही पेगन वैशिष्ट्येही त्यात सहजपणे सामावून गेलेली दिसतात.

चौदावे-अठरावे शतक :चौदाव्या शतकात नॉर्वे, डेन्मार्क व स्वीडन हे तीन स्कँडिनेव्हियन देश एकाच राजसत्तेखाली आले आणि ही राजसत्ता डेन्मार्कला विशेष अनुकूल ठरली. डॅनिश भाषेचा वरचष्मा वाढल्यामुळे नॉर्वेजियन भाषेतील साहित्यनिर्मिती खुरटली. ही स्थिती दीर्घकाळ राहिली आणि पेट्टर डास (१६४७–१७०८) हा महत्त्वपूर्ण कवी उदयास येण्यासाठी सतरावे शतक अर्धे उलटून जावे लगले. ‘द ट्रंपेट ऑफ नॉर्डलँड’(सु. १७००) ह्या आपल्या काव्यात डासनेनॉर्वेजियन जीवनाचे जिवंत चित्र रंगविलेले आहे. बायबलमधील काही कथांना त्याने काव्यरूप दिले. त्याची कविता लोकगीतांच्या निकट जाणारी आहे. नार्वेत जन्माला आलेल्या ⇨ लूद्‌व्ही हॉल्बर्ग (१६८४–१७५४) ह्या साहित्यिकाने अठराव्या शतकात, एकूणच स्कँडिनेव्हियन साहित्यांना स्फूर्तिदायक असे वाङ्मयीन कर्तृत्व गाजविले. हॉल्बर्गने आपल्या साहित्यकृती डॅनिश भाषेत रचिल्या, तथापि डॅनिश-नॉर्वेजियन साहित्यिकांना एक आधुनिक दृष्टी दिली. ट्यूलिनची (१७२८–६५) कविता मुख्यत: निसर्गपर आहे. ह्या काळात आशादायक अशा दोन घटना घडल्या. १७६० मध्ये ‘रॉयल नॉर्वेजियन सोसायटी ऑफ लर्निंग’ ही संस्था अस्तित्वात आली. त्यानंतर काही वर्षांनी राष्ट्रवादी विचारांची प्रेरणा लाभलेल्या काही तरुणांनी ‘नॉर्वेजियन सोसायटी’ची स्थापना केली व आपल्या सांस्कृतिक आकांक्षा प्रकट केल्या. ‘नॉर्वेजियन सोसायटी’शी संबंधित असलेल्या साहित्यिकांनी स्कँडिनेव्हियन साहित्यावरील जर्मन प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

एकोणिसावे शतक : १८१४ मध्ये नॉर्वे हा स्वतंत्र देश झाला. स्वातंत्र्याबरोबरच नॉर्वेजियन साहित्याची एक नवी परंपरा निर्माण करण्याच्या विचाराने यथावकाश मूळ धरले. एकाच राजसत्तेखाली राहिल्यामुळे डेन्मार्क आणि नार्वे ह्यांच्यात निकटचे सांस्कृतिक दुवे निर्माण झाले होते आणि वाङ्मयाचे क्षेत्रही ह्यास अपवाद नव्हते. हे दुवे तोडावेत, अशा विचारांचा एक राष्ट्रावादी प्रवाह अस्तित्वात आला. ह्या मतप्रवाहाला विरोध झाल्यावाचून राहिला नाही. सांस्कृतिक आदान-प्रदानांत नॉर्वेला डेन्मार्ककडून मिळालेला वारसा उपेक्षणीय नाही अशीही अनेकांची धारणा होती. ⇨ हेन्रिक व्हॅर्‌गेलान (१८०८–४५) हा श्रेष्ठ भावकवी पहिल्या विचारधारेचा महत्त्वपूर्ण प्रतिनीधी. नॉर्वेच्या स्वातंत्र्याचा तो प्रतीक बनला. नवा, चैतन्यशाली नॉर्वे निर्माण करण्याच्या ध्यासाने व्हॅर्‌गेलान भारलेला होता. त्याचे विचार क्रांतिकारक होते दृष्टी मानवतावादी होती. नॉर्वेजियन साहित्यात त्याने स्वतःचे युग निर्माण केले.

योहान व्हेलहाव्हेन (१८०७–७३) हा कवी आणि समीक्षक दुसऱ्या विचाराच्या मंडळींचा नेता. व्हॅर्‌गेलान आणि व्हेलहाव्हेन ह्यांच्या पक्षांत निकराचा वाद होता. वादातील हे दोन पक्ष अनुक्रमे ‘देशभक्त’आणि ‘बुद्धिवंत’म्हणून ओळखले जात होते. व्हॅर्‌गेलान आणि व्हेलहाव्हेन ह्यांच्या वाङ्‌मयीन भूमिकांतही भेद होता. व्हॅरगेलानचा भर मुक्ताभिव्यक्तीवर होता, घाटाच्या काटेकोर जाणिवेने सर्जनशक्ती बंदिस्त करून घेणे त्याला मंजूर नव्हते. व्हेलहाव्हेनने मात्र बौद्धिकता, संयम आणि जाणीवपूर्वक कलानिर्मिती ह्यांचा पुरस्कार केला. ‘क्रिएशन, ह्यूमॅनिटी अँड मेसाया’ हे नाट्यात्म, भावगेय काव्य व्हॅर्‌गेलानच्या विशेष उल्लेखनीय कृतींपैकी एक होय. ‘मानवतेचे महाकाव्य’ असा त्याचा उल्लेख स्वतः व्हॅर‌्‌गेलान करीत असे. व्हॅर्‌गेलानच्या कवितेतील दोषांवर व्हेलहाव्हेनने वेळोवेळी टीका केली, तसेच ‘द डॉन ऑफ नॉर्वे’ (१८३४) ह्या आपल्या सुनीतमालेतून देशभक्त पक्षाला राष्ट्रवादी भूमिकेतील उणिवाही दाखवून देण्याचा त्याने प्रयत्न केला.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यत नॉर्वेजियन साहित्यात ह्या वादाचा प्रभाव टिकून होता त्यातून पुढे आलेले दोन दृष्टिकोणही नांदत होते.

ह्या शतकाच्या मध्यास देशाच्या ऐतिहासिक परंपरांविषयीची आणि लोकसंचिताविषयीची आस्था वाढली. राष्ट्रीय आकांक्षांचे प्रतिबिंब तीतून उमूट लागले. हा काळ राष्ट्रीय स्वच्छंदतावादाचा म्हणून ओळखला जातो. पेटर आनड्रेआस मुंक (१८१०–६३) ह्याने नॉर्वेचा अष्टखंडात्मक इतिहास लिहिला. ह्या इतिहासग्रंथाने अनेक लेखकांना आणि कलावंतांना स्फूर्ती दिली. नॉर्वेजियन हेच शुद्ध नॉर्डिक वंशाचे आहेत, तसेच ओल्ड नॉर्स ही भाषा घडविण्याचे श्रेय एकूण स्कँडिनेव्हियनांना नसून नॉर्वेजियनांना आहे, अशा विचारांचा मुंकने पुरस्कार केला. ओल्ड नॉर्स भाषेच्या संदर्भात मुंकने केलेल्या संशोधनाचा प्रभाव ईव्हार ऑसेनसारख्या भाषाशास्त्रज्ञावर पडला. ऑसेनने ओल्ड नॉर्सशी निकटचे नाते असलेल्या विविध बोलींच्या आधारे एक वाङ्‌मयीन भाषा घडविण्याच्या प्रयत्नांना महत्त्वाचा हातभार लावला. ⇨ पेटर क्रिस्टेन आस्ब्यर्नसेन (१८१२–८५) ह्याने ⇨ यर्जन मो (१८१३–८२) ह्या आपल्या मित्राच्या सहकार्याने नॉर्वेजियन लोककथा जमवून त्या १८४१–१८४४ ह्या कालखंडात प्रसिद्ध केल्या. एम्. बी. लँडस्टाड (१८०२–८०) ह्याने नॉर्वेजियन लोकगीतांचे संकलन केले.


आस्मुन ओलाफसान व्हिन्ये (१८१८–७०) हा भावकवी ह्याच काळातला. ईव्हार ऑसेनने घडविलेल्या नव्या साहित्यभाषेचा उपयोग त्याने आत्मभिव्यक्तीसाठी केला. स्वच्छंदतावादी आणि वास्तववादी अशा दोन्ही प्रवृत्ती व्हिन्येमध्ये आढळून येतात. निसर्गाविषयी त्याला उत्कट प्रेम वाटे. नॉर्वेतील पर्वतराजीचे भावगेय (लिरिकल) दर्शन त्याच्या कवितांतून घडते. व्हॅर्‌गेलानची बहीण कामिल्ला कॉलेट (१८१३–९५) हिने लिहिलेली द गव्हर्नर्स डॉटर्स ही कादंबरी १८५५ मध्ये प्रसिद्ध झाली. स्त्रीचे सामाजिक आणि वैवाहिक जीवनातील स्थान हा विषय कॉलेटने ह्या कांदबरीत हाताळलेला होता. ही कादंबरी नॉर्वेजियन साहित्यातील वास्तववादाची पूर्वसूरी ठरली. त्यानंतर दहा-पंधरा वर्षांच्या काळातच ⇨ इब्सेन (१८२८–१९०६) आणि ⇨ ब्यर्नसॉ(१८६२–१९१०) ह्या श्रेष्ठ नाटककारांच्या वास्तववादी नाटकांनी नॉर्वेजियन साहित्यात मोलाची भर घातली. इब्सेनने तर आधुनिक यूरोपीय नाटकाचा एक जनक म्हणून आंतरराष्ट्रीय स्वरूपाची कीर्ती मिळवली. पिलर्स ऑफ सोसायटी (१८७७), ए डॉल्स हाउस (१८७९), घोस्ट्स (१८८१), ॲन एनिमी ऑफ द पीपल (१८८२) अशा नाटकांद्वारे इब्सेनने अनेक महत्त्वपूर्ण सामाजिक समस्यांचे प्रत्ययकारी दर्शन रंगभूमीवर घडविले. तत्पूर्वी ब्रांद (१८६६) आणि पीर जिंत (१८६७) ही दोन पद्य नाटकेही इब्सेनने लिहिलेली होती तथापि त्याची ख्याती मुख्यतः त्याच्या वास्तववादी, समस्यात्मक नाटकांवरच अधिष्ठित आहे. माणसांच्या मनांचा वेध त्याने खोलवर जाऊन घेतला, तेथील अंत:संघर्ष जिवंतपणे उभे केले, वेगवेगळे मुखवटे धारण करून समाजात वावरणारा दंभ उघड केला. रंगभूमीच्या विविध तांत्रिक अंगांचा त्याने उत्तम अभ्यास केलेला होता आणि त्यातूनच स्वतःचे एक नाट्यतंत्रही त्याने निर्माण केलेले होते. नाट्यकृतीचा बांधेसूदपणा, एका अंकात एकच प्रवेश, पूर्वकालीन घटनांवर कौशल्याने प्रकाश टाकणे, ही त्याच्या नाट्यतंत्राची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत. आरंभी ऐतिहासिक नाटके लिहिणारा ब्यर्न्‌सॉन इब्सेनच्या प्रभावातून वास्तववादी नाटकांकडे वळला. द बँक्‌रप्ट (१८७४), द एडिटर (१८७४) आणि बियाँड अवर पॉवर ह्या त्याच्या श्रेष्ठ नाट्यकृती. बियाँड अवर पॉवर ह्या नावाच्या दोन नाट्यकृती त्याने लिहिल्या होत्या (१८९३ १८९५). ब्यर्न्‌सॉनने कांदबरीलेखनही केले. द हेरिटेज ऑफ द कुर्ट्‌स (१८८४) आणि इन गॉड्स वे (१८९०) ह्या त्याच्या विशेष महत्त्वाच्या दोन कादंबऱ्या. पहिलीत ख्रिस्ती धर्माकडे पाहण्याचा एक चिकित्सक दृष्टिकोण दिसून येतो, तर सामाजिक परिर्वतन हा दुसरीचा विषय. सामाजिक परिर्वतनाची प्रक्रिया शाळांमधून सुरू झाली पाहिजे, असे ब्यर्न्‌सॉनने तीत दाखवून दिले आहे. ब्यर्न्‌सॉनला १९०३ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. योनास ली (१८३३–१९०८) आणि आलेकसांडर खेल्लान (१८४९–१९०६) हे एकोणिसाव्या शतकातीलआणखी दोन महत्त्वाचे साहित्यिक. दोघेही कादंबरीकार. द व्हिजनरी (इं. भा. १८७०) ही योनासची पहिलीच कादंबरी यशस्वी ठरली. ह्या कादंबरीत तसेच त्याच्या अन्य लेखनात उत्तर नॉर्वेतील जीवनाचे प्रत्ययकारी चित्रण केलेले आहे. द पायलट अँड हिज वाइफ (इ. भा. १८७६) ही त्याची समुद्रजीवनावरील एक उत्कृष्ट कादंबरी. खेल्लानने जोमदार शैलीत सामाजिक अन्यायांचे दर्शन आपल्या कादंबऱ्यांतून घडविले. गार्मन अँड वर्स (इं. भा. १८८५) आणि स्किपर वर्स (इं. भा. १८८५) ह्या त्याच्या सामाजिक कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. खेल्लानने काही नाटके आणि कथाही लिहिल्या.

एकोणिसाव्या शतकातील अन्य उल्लेखनीय साहित्यिकांत आमालिए स्क्राम (१८४६–१९०५) आणि आर्ने गारबॉर्ग (१८५१–१९२४) ह्यांचा अंतर्भाव होतो. स्क्राम ही निसर्गवादाची पुरस्कर्ती. द पीपल ऑफ हेलिमीर (१८८७–९८) ही तिची कादंबरी त्या दृष्टीने लक्षणीय आहे. पीझंट स्टूडंट्स (१८८३) ही गारबॉर्गची प्रसिद्ध कादंबरी. नॉर्वेच्या राजधानीतील विद्यार्थिजीवनाचे वेधक चित्रण तीत आढळते. गारबॉर्गने काही नाटके आणि समीक्षात्मक लेखनही केले. गारबॉर्गने नॉर्वेजियनमध्ये महाभारताच्या काही भागांचे भाषांतरही केलेले आहे.

ह्या शतकाच्या अखेरीअखेरीस साहित्यातून सामाजिक-राजकीय प्रश्न मांडण्याची प्रवृत्ती मंदावली. १८९० मध्ये ⇨ क्नूट हामसून (१८५९–१९५२) ह्याने ‘फ्रॉम द अनकॉन्शस लाइफ ऑफ द माइंड’ हा निंबध लिहून आत्मपरता व व्यक्तिविशिष्टता ह्यांवर भर देण्याचे साहित्यिकांना आवाहन केले. हंगर (१८९०), मिस्टरीज (१८९२) व पॅन (१८९४) ह्यांसारख्या त्याच्या कादंबऱ्यांतूनही हा दृष्टिकोण दिसून येतो. हामसूनला १९२० साली साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

सिगब्‌यर्न आब्स्टफेल्डर (१८६६–१९००), नील्स कॉल्लेट फोक्त (१८६४–१९३७) हे ह्या शतकातील महत्त्वाचे भावकवी. एक प्रकारच्या विषण्णतेची छाया आब्स्टफेल्डरच्या काव्यावर पडलेली आहे. यूरोपमधील प्रतीकवादी संप्रदायाचा प्रभावही त्याच्यावर दिसून येतो. फोक्तची वृत्ती बंडखोर होती. त्याच्या स्वतंत्र वृत्तीचा आणि उत्कट आत्मपरतेचा प्रत्यय त्याच्या कवितांतून येतो.

ह्या शतकाच्या अखेरीस गुन्नार हेइबॅरच्या (१८५७–१९२९) नाट्यकृती लक्षवेधी ठरल्या. त्यांत उपरोधाबरोबर विलोभनीय अशी भावगेयताही आढळून येते. किंग मिडास (१८९०), गर्ट्‌स गार्डन (१८९४), द बाल्कनी (१८९४) आणि ट्रॅजिडी ऑफ लव्ह (१९०४) ही त्याची उल्लेखनीय नाटके, द ड्रोव्हर (१९०८) हे पद्य- नाटक लिहिणारा हान्स किंग (१८६५–१९२६) हा वाङ्‌मयीन भूमिकेच्या दृष्टीने क्नूट हामसूनच्या जवळ येणारा परंतु त्याच्यापेक्षा अधिक चिंतनशील आणि विश्लेषक वृत्तीचा. त्याने कादंबरीलेखनही केले आहे. माणसांच्या मनांतील गूढ गुंतागुतीचा वेध घेण्याच्या त्याच्या प्रयत्नांचा त्याने केलेल्या व्यक्तिरेखनावर अनेकदा प्रतिकूल परिणाम झालेला दिसतो. अव्हलांश ब्रोक (१९१८-१९) ह्या त्याच्या कादंबरीत त्याच्या प्रतिभेचे उत्तम गुणधर्म सामर्थ्याने प्रकटले आहेत.

विसावे शतक : ह्या शतकाच्या पूर्वार्धात, कादंबरीलेखनच विशेष लक्ष वेधून घेते. इब्सेन, ब्यर्न्‌सॉन ह्यांसारख्या नाटककारांनी नाट्यलेखनाची समर्थ परंपरा निर्माण करून ठेविली असली, तरी नाट्यलेखनाच्या क्षेत्रात मोठी कर्तबगारी गाजविणारा नाटककार दिसत नाही. गुन्नार हेइबॅर आणि नोडलि ग्रिग (१९०२–४३) ही त्यांतल्या त्यात उल्लेखनीय नावे अपवादात्मक म्हणावी लागतील. ग्रिगवर रशियन रंगभूमीचा व साम्यवादी विचारांचा प्रभाव होता. अवर ऑनर अँड अवर पॉवर (१९३५) हे त्याचे विशेष उल्लेखनीय नाटक. ह्या सामाजिक नाट्यकृतीत ग्रिगच्या रशियातील अनुभवांची छाया आहे.

कादंबरीच्या संदर्भात ⇨ सिग्री उनसेटचे (१८८२–१९४९) नाव महत्त्वाचे. सामाजिक आणि ऐतिहासिक अशा दोन्ही प्रकारच्या कादंबऱ्या तिने लिहिल्या. नोकरी करणाऱ्या, स्वावलंबी स्त्रियांच्या व्यथा व प्रश्न आपल्या सामाजिक कादंबऱ्यांतून तिने परिणामकारकपणे मांडले. मध्ययुगीन नॉर्वेच्या इतिहासावर दोन कादंबऱ्या तिने लिहिल्या. तिच्या सामाजिक कादंबऱ्यांतून आढळून येणारी वास्तववादी दृष्टी ह्या ऐतिहासिक कादंबऱ्यांतही प्रत्ययास येते. १९२५ मध्ये रोमन कॅथलिख पंथाचा स्वीकार केल्यानंतर मनुष्य आणि ईश्वर ह्यांच्यातील नातेसंबंधाच्या विचाराला तिच्या कादंबऱ्यांतून प्रमुख स्थान प्राप्त झाले. १९२८ मध्ये तिला साहित्याचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.


ओलाफ डून (१८७६–१९३९) हा ह्या शतकांरभीचा आणखी एक श्रेष्ठ कादंबरीकार. एक सततचा संघर्ष म्हणून डूनने जीवनाकडे पाहिले, माणसांच्या विविध वृत्तींच्या आणि कृतींच्या तळाशी असलेल्या प्रेरणांचा शोध घेतला. द पीपल ऑफ जूव्हिक ही त्याची सर्वश्रेष्ठ कादंबरी. ह्या कादंबरीचे सहा खंड असून त्यांचे इंग्रजी अनुवाद असे : (१) ट्रफ ऑफ द वेव्ह्‌ज (१९३०), (२) द ब्लाइंड मॅन (१९३१), (३) द बिग बेडिंग (१९३२), (४) ओडिन इन फेअरीलँड (१९३२), (५) ओडिन ग्रोज अप (१९३४) व स्टॉर्म (१९३५). एका शेतकरी कुटुंबाच्या चार पिंढ्याची हकीकत ह्या प्रदीर्घ कादंबरीत आलेली आहे. मध्ययुगीन सागाचा वारसा सांगणारी ही कादंबरी आहे. ओल्ड नॉर्स भाषेतील उत्कृष्ट साहित्यातून प्रत्ययास येणारा जोम डूनच्या ह्या कादंबरीत आढळतो. औद्योगिकीकरणाची प्रक्रिया नॉर्वेमध्ये सुरू झाल्यानंतर कादंबऱ्यांतून श्रमिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात येऊ लागली. योहान फाल्क बेर्गे (१८७९–१९६७) ह्याने खाणकामगारांच्या जीवनाचे चित्रण क्रिस्टिआनस सेक्स्‌टस (६ खंड, १९२७–३५) सारख्या कादंबऱ्यांतून केले. फाल्क बेर्गेची वृत्ती आशावादी असून ख्रिस्ती धर्मप्रणीत औदार्यावरही त्याची श्रद्धा दिसून येते.

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात भावकवितेची निर्मिती लक्षवेधी ठरली. हॅर्मान वाइल्डन्‌व्ही (१८८६– १९५९), ओलाफ बूल (१८८३–१९३३), टोरे ओर्जासीटर (१८८६– ) आणि ओलाव्ह ऑक्रस्ट (१८८३–१९५९) ही ह्या संदर्भातील काही उल्लेखनीय नावे. वाइल्डन्‌व्हीची आरंभीची काही कविता हलकीफुलकी, खेळकर आणि नादमधुर असली, तरी त्याच्या पुढील कवितेत मात्र उत्कट धर्मभावनेचे गंभीर अंत:सूर जाणवतात. बूलच्या कवितेतील आत्मपरता विशेष गहिरी असून तिला निसर्गप्रेमाची विशेष ओढ आहे. ओर्जासीटरची काव्यरचना मुख्यत: तत्त्वचिंतनात्मक, देशभक्ती आणि धर्मभावना ह्यांचा सामर्थ्यशील आविष्कार घडविणारी. ऑक्रस्टच्या कवितेतही देशप्रेम आणि धर्मप्रवणता आढळते.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यानच्या काळात सामाजिक बांधिलकीची विशेष जाणीव असलेले साहित्यिक उदयाला आले. आर्नुल्फ अव्हरलानने (१८८९–१९६८) समाजवादाच्या प्रचाराचे एक प्रभावी साधन म्हणून कविता लिहिली, फॅसिस्टांवर हल्ले चढविले. सिग्गुर्ड होएल (१८९०–१९६१) हाही डाव्या विचारसरणीचा. कादंबरी आणि समीक्षा ही त्याची क्षेत्रे. वन डे इन ऑक्टोबर ही त्याची प्रसिद्ध कादंबरी. होएलने आपल्या कादंबऱ्यांतून मानसशास्त्राची चांगली जाण दाखविली आहे. हेल्गे क्रोग (१८८९–१९६२) हा नाटककार आणि समीक्षक. उपरोधपूर्ण समाजटीका त्याच्या नाटकांतून विशेषत्वाने आढळते. त्याचे विचारही डावीकडे झुकलेले आहेत.

टार्जेई व्हेसास (१८९७ – ), कोरा सँडल (१८८० – ) ही दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील काही उल्लेखनीय साहित्यिकांची नावे आहेत. टार्जेईने शेतकरीजीवनावर लिहिलेल्या कादंबऱ्या, त्यांतील भावगेय भाषेमुळे आणि परिणामकारक प्रतीकात्मकतेमुळे लक्षवेधी ठरल्या आहेत. द हाउस इन द डार्कं ह्या त्याच्या प्रसिद्ध कादंबरीत जर्मनांनी नॉर्वेमध्ये फौजा घुसविल्यानंतरचे वातावरण अत्यंत परिणामकारकपणे चित्रित केलेले आहे. कोरा सँडल हिने लिहिलेल्या कादंबऱ्याही दर्जेदार आहेत.

कुलकर्णी, अ. र.