गेलिक साहित्य : गेलिक साहित्य हे आयर्लंडचे म्हणजे गेलिक भाषेतील साहित्य होय. आयर्लंड ही गेलिक भाषेची जन्मभूमी. ‘ओगॅमिक’ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रूनिक लिपीत कोरलेले, इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या सुमाराचे काही छोटे लेख हा ह्या भाषेचा प्राचीनतम लिखित पुरावा. ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा आयर्लंडमध्ये शिरकाव झाल्यानंतर त्यांनी तेथे लॅटिन लिपी उपयोगात आणली (इ.स. पाचवे शतक). फुटकळ स्वरूपाचे धार्मिक लेखन नवव्या शतकापासून मिळते तथापि सु. बाराव्या शतकाच्या आरंभापर्यंत गेलिक साहित्य मुख्यतः मौखिक परंपरेने जपण्यात आले होते. फिलिड (एकवचन फिली) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यावंतांच्या वर्गाने निर्मिलेले हे साहित्य होते. फिलिड हे पेगन होते. आयर्लंडमधील राजांच्या आश्रयास ते असत. व्युत्पत्तिदृष्ट्या फिलिड ह्या शब्दाचा अर्थ ‘द्रष्टा’ असा होतो. कवींच्या ह्या वर्गाला फार मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. त्यांच्या उपरोधपर कवितेत विनाशक मंत्रासारखे सामर्थ्य आहे, अशी समजूत होती. फिलिडांच्या वर्गाला आपले साहित्य लेखनिविष्ट करण्याची इच्छा नव्हती. तसे केल्यास आपल्या व्यवसायालाच धक्का पोहोचेल, असे त्यांना वाटत होते. नवव्या-दहाव्या शतकांत आयर्लंडवर नॉर्स लोकांनी केलेल्या हल्ल्यांत ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी धर्मप्रसारार्थ लिहिलेल्या लॅटिन साहित्याचे फार मोठे नुकसान झाले परंतु गेलिक साहित्य मात्र त्याच्या मौखिक परंपरेमुळे अबाधित राहिले. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात अँग्लो-नॉर्मनांनी आयर्लंडवर स्वारी केली व हळूहळू आयर्लंड इंग्लंडच्या ताब्यात गेले. आयर्लंड ह्या अवमानित अवस्थेतून जात असताना तेथील साहित्यालाही अवनत दशा प्राप्त होत होती. राजांचा भक्कम आश्रय नाहीसा झाला होता व छोट्या छोट्या सरंजामदारांच्या आधाराने कवींना जगावे लागत होते, त्यांच्या स्तुतिपर कवने लिहावी लागत होती. बाराव्या शतकानंतर केवळ अर्थार्जनासाठी लिहिलेल्या बऱ्याचशा कवितेत कवींचा अस्सल जिव्हाळा प्रत्ययास येत नाही, ह्याचे हे एक प्रमुख कारण.

मौखिक परंपरा नष्ट होऊन गेलिक साहित्याचा नाश होऊ नये, ह्या हेतूने ख्रिस्ती मठांतील संन्याशांनी ते लेखनबद्ध करावयास सुरुवात केली होती. त्यामुळेच आज बरेचसे प्राचीन गेलिक साहित्य अभ्यासकांस उपलब्ध झालेले आहे. ह्या गद्यपद्यात्मक साहित्यात इतिहास, आख्यायिका, संतचरित्रे, चारणकाव्य, वैद्यक, कायदा ह्यांसारख्या विषयांवरील लेखन इत्यादींचा अंतर्भाव होतो.

ह्या साहित्याच्या हस्तलिखित संकलनांपैकी पुढील विशेष महत्त्वाची होत : Leabhar na h– Uidhre (संकलन सु. ११०६, इं. शी. द बुक ऑफ द डन काऊ), Leabhar Laighneach (संकलन ११६० पूर्वी, इं. शी. द बुक ऑप लिन्स्टर), Leabhar Baile an Mhota (संकलन चौदाव्या शतकाच्या अखेरीस, इं. शी. द बुक ऑफ बॅलीमोट), Leabhar Buidhe Lecain (संकलन सु. १३९०, इं. शी. द यलो बुक ऑफ लेकन), Leabhar Mor Lecain (संकलन पंधराव्या शतकाचा आरंभ).

उपर्युक्त संकलनांपैकी काही ‘ट्रिनिटी कॉलेज’ मध्ये असून काही ‘रॉयल आयरिश अकादमी’ने जतन करून ठेविली आहेत.

गद्य : गेलिक गद्यसाहित्य मुख्यतः कथात्मक असून त्यांची विभागणी ‘अल्स्टर माला’, ‘फेनिअन माला’ आणि ‘मिथ्यकथा माला’ अशा तीन वर्गांत केली जाते.

अल्स्टर माला :  ह्या मालेत शंभराहून अधिक कथांचा समावेश होतो. ह्या कथांतील घटना मुख्यतः अल्स्टरमध्ये घडून येत असल्यामुळे ह्या मालेला ‘अल्स्टर माला’ असे नाव देण्यात आले आहे. ह्या मालेतील बऱ्याचशा कथा कूखुलिन ह्या महायोद्ध्याच्या व्यक्तिरेखेभोवती गुंफिलेल्या आहेत. कूखुलिन हा एक सतरा वर्षांचा तरुण परंतु मोठमोठ्या योद्ध्यांना तो पराभूत करतो. ‘द कॅटल रेड ऑफ कूली’ ही अल्स्टर मालेतील मध्यवर्ती कथा. कॉनॉटच्या राणीला अल्स्टर राज्यातील कूली येथील एक विशिष्ट बैल हवा असतो, अल्स्टरचा राजा तो बैल देत नाही. त्यामुळे कॉनॉटची राणी अल्स्टरवर स्वारी करते. कूखुलिन अल्स्टरसाठी लढतो आणि मारला जातो. अल्स्टरच्या राजाचे ‘लाल सरदार सैन्य’ जादूच्या प्रभावामुळे निद्रिस्त राहिल्याने तो एकाकी लढलेला असतो. तथापि कूखुलिन पडल्यानंतर हे सैन्य जागे होते आणि कॉनॉटच्या सैन्याला पिटाळून लावते. पळवून नेलेला तो बैलही अल्स्टर येथे परत येतो व मरतो. वीरयुगाची मूल्ये जपणारी ही कथा मुख्यतः गद्यात असून उत्कट भावाविष्कारासाठी अधूनमधून पद्याचा वापरही केलेला आहे. ह्या कथेतील काही भागांच्या स्पष्टीकरणार्थ म्हणून आणखी काही कथा लिहिल्या गेल्या आहेत. अशा कथांतूनच ही माला उभी राहिली. अर्थातच ह्या कथा मूळ कथेशी संलग्न आहेत आणि ह्या सगळ्या कथा मिळून एक माला तयार झालेली आहे (सु. सातवे शतक). ‘द कॅटल रेड ऑफ कूली’ मध्ये व्हर्जिलच्या ईनिडसारखे एक महाकाव्य (अर्थात गद्य) आयर्लंडला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जाणवतो. तथापि त्यातील काही भागांचा अपवाद सोडल्यास त्यात वाङ्‌मयीन अभ्यासाच्या दृष्टीने फारसे हाती लागत नाही. परंतु त्यावर पुढील काळात पुनः पुन्हा संस्कार झालेले असल्यामुळे बदलत्या गेलिक शैलीचा एक आलेख त्यातून दिसतो. ‘दियर्द्री’ ही अल्स्टर मालेतील एक शोककथा. अल्स्टरचा राजा काँखूअर ह्याच्या आश्रयास असलेल्या फिलिम ह्या चारणाची दियर्द्री ही एक सौंदर्यसंपन्न मुलगी. तिच्या सौंदर्यामुळे अल्स्टरवर आपत्ती येऊन अनेक योद्धे प्राणास मुकतील, असे भाकीत एका द्रूइडाकडून (धर्मश्रेष्ठी) ती लहान असतानाच केले जाते. ते ध्यानी घेऊन तिला ठार करावे, असा आग्रह राजाचे अनेक सैनिक धरतात. तथापि दियर्द्री वयात आल्यावर तिच्याशी विवाह करण्याचा विचार काँखूअरच्या मनात असल्यामुळे तो तिचा वध करण्याऐवजी तिला एका गुप्त स्थळी पाठवून देतो. तेथे एका दाईखेरीज कोणतीही मानवी सोबत तिला नसते. पशुपक्ष्यांच्या सहवासात दियर्द्री वाढते. वयात आल्यानंतर ती दाईला नवऱ्यासंबंधीच्या स्वतःच्या अपेक्षा सांगते. त्याचे गाल रक्तासारखे लाल असावेत, कांती बर्फासारखी शुभ्र, केस डोमकावळ्यासारखे काळे. नीश हा काँखूअरचा पुतण्या ह्या वर्णनाशी जुळणारा असल्याचे दाई सहज सांगते. पुढे दियर्द्री नीशला भेटते आणि आपल्या दोन भावांच्या साहाय्याने नीश तिला स्कॉटलंडला पळवून नेतो. सूडाने पेटलेला काँखूअर अभयाचे खोटे वचन देऊन त्यांना अल्स्टरला बोलावतो आणि नीशचा व त्याच्या भावांचा शिरच्छेद करतो पण वचनभंग करणाऱ्या काँखूअरवर प्रत्यक्ष त्याच्या निकटवर्तीयांचा विश्वास राहत नाही. शोकविव्हल दियर्द्री एक विलापिका गाऊन आत्महत्या करते. ह्या शोकात्म कथेवर श्रेष्ठ आयरिश नाटककार ⇨ जॉन मिलिंग्टन सिंग  ह्याने लिहिलेली दियर्द्री ऑफ द सॉरोज (१९१०) ही शोकात्मिका विख्यात आहे. 


फेनिअन माला : फेनिअन, हा शब्द ‘फिअन’ ह्या मूळ गेलिक शब्दावरून आलेला आहे. ‘योद्ध्याचे पथक’ हा त्याचा अर्थ. फिन मॅक्‌कूल आणि ‘फेनिअन’ ह्या नावाने ओळखले जाणारे त्याचे सहकारी योद्धे ह्यांच्याभोवती ह्या मालेतील कथा गुंफिलेल्या आहेत. फिन मॅक्‌कूलचा मुलगा ‘अशीन’ किंवा ‘ओसियन’ (कालांतराने परंपरा ह्या ओसियनला एक श्रेष्ठ गेलिक कवी म्हणून ओळखू लागली. अनेक बॅलड्स त्याचे म्हणून सांगण्यात येऊ लागले). ओसियनचा मुलगा ऑस्कर, फिन मॅक्‌कूलचा पुतण्या डीरमॅट इ. व्यक्तिरेखा ह्या मालेतील कथांत आहेत. ह्या कथांची रचना तेराव्या शतकाच्या आरंभी झाली असावी. ह्या कथाही गद्यातच आहेत. त्यांच्यावरील ख्रिस्ती संस्कार स्पष्ट आहेत. फेनिअन कथांचा नायक फिन मॅक्‌कूल हा ख्रिस्ती नसला, तरी ख्रिस्ती तत्त्वांचा आदर्श त्याच्या व्यक्तिरेखेतून आविष्कृत होतो. मॅक्‌कूलचा ओसियन हा मुलगा अखेरीस ख्रिस्ती होतो, असे ह्या कथांतून दाखविले आहे. An Bhruidhean Chaorthainn (इं. शी. द हॉस्टेल ऑफ द रॉवन ट्री) आणि ‘द पर्सूट ऑफ डीरमॅट अँड ग्रॅनी’ ह्या फेनिअन मालेतील दोन लक्षणीय कथा. ‘द पर्सूट’ म्हणजे स्वच्छंदतावादी वळणाने मांडलेले अल्स्टर मालेतील दियद्रीच्या कथेचेच एक वेगळे रूप होय. ग्रॅनीचा विवाह वृद्ध फिन मॅक्‌कूलशी ठरलेला असतो. तरूण ग्रॅनीला हा विवाह मान्य नसतो. फिन मॅक्‌कूलचा पुतण्या डीरमॅट ह्याला ती स्वतःला पळवून न्यावयास भाग पाडते. फिन मॅक्‌कूल त्यांचा पाठलाग करतो. अनेक साहसांतून पार पडून तो डीरमॅटला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. अखेरीस कपटकारस्थानाने तो डीरमॅटला ठार मारतो. फेनिअन मालेतील कथा रचणारे भूतकाळाकडे स्मृत्याकुल होऊन पाहत आहेत, असे वारंवार जाणवते. 

मिथ्यकथा माला : ह्या मालेत पेगन देवदेवतांच्या कथा आहेत. ह्या देवदेवतांचे उल्लेख अल्स्टर आणि फेनिअन मालांतील कथांतही येतात. ‘थूआहा दे देअनान’ ही समूहवाचक संज्ञा आयरिश पेगन देवतांना लावण्यात येते. थूआहा दे देअनान म्हणजे ‘दाना देवतेचे लोक’, आयरिश देवदेवतांचा वंश हा दानापासून सुरू झाला असे मानतात. दानाचा मुलगा नूआथा हा सर्व देवांचा प्रमुख. दाग्थाचे महत्त्व नूआथाच्या खालोखाल ब्रिगिट, अँगस, मिडीर, ऑग्मा आणि तांबडा बोव्ह ही दाग्थाची मुले. ब्रिगिट ही अग्निदेवता, अँगस ही प्रेमदेवता, मिडीर हा पाताळाचा अधिपती एटेन ही त्याची पत्नी. ऑग्मा हा वक्तृत्व आणि साहित्य ह्यांचा देव. ओगॅमिक लिपीचा जनक तोच, अशी पारंपरिक श्रद्धा. तांबडा बोव्ह हा दाग्थानंतर दाग्थाच्या स्थानी आला. लेअर हा समुद्राचा देव. हे सारे देव मानवी जीवनात अधूनमधून हस्तक्षेप करतात, अशी श्रद्धा होती. फोव्हॉर किंवा फाहॉरिअन हे देवांचे शत्रू होते.

‘द ड्रीम ऑफ ऑग्मा’, ‘द वूइंग ऑफ ऐटन’, ‘द फेट ऑफ द चिल्ड्रन ऑफ लेअर’ ह्या मिथ्यकथा मालेतील काही कथा. ‘द बॅटल ऑफ मॉयच्यूरा’ ह्या कथेत देवांनी फोव्हॉरांचा पराभव कसा केला ह्याचा वृत्तान्त आलेला आहे. 

धार्मिक गद्य : ख्रिस्ती मठांतील नियम, नीतिबोध, संतचरित्रे इ. लेखनाचा अंतर्भाव ह्यात करता येईल. ह्या लेखनाचे वाङ्‌मयीन मोल विशेष नाही. संतचरित्रांतील कल्पनारंजन लक्षणीय आहे. चमत्कारांवर त्यांचा भर आहे परंतु त्यांत प्राचीन आयर्लंडमधील दैनंदिन जीवनाचे बरेच तपशील आलेले असल्यामुळे आयरिश समाजेतिहासाच्या अभ्यासकांना ते उपयुक्त ठरतील. स्वप्नवर्णन हा धार्मिक गद्याचा आणखी एक प्रकार. एखाद्या देवदूताच्या मार्गदर्शनाने स्वर्गनरकाचे दर्शन घडणे, अशा प्रकारची ही स्वप्ने. Fis Adamnain (इं. शी. द व्हिजन ऑफ ॲडम्‌नन) हे अशा स्वप्नवर्णनाचे एक उल्लेखनीय उदाहरण.

  

संकीर्ण गद्य : स्फूर्तीचे स्वरूप, भाषेचे मूळ ह्यांसारख्या विषयांचा फिलिडांनी विचार केला होता, असे त्रुटित स्वरूपात आढळलेल्या काही लेखनावरून दिसून येते. छंद आणि शैली ह्यांसंबंधीही विचार आलेले आहेत.

  

कायदा आणि वैद्यक ह्या विषयांचा अभ्यास प्राचीन आयर्लंडमध्ये होत होता. हे ज्ञानही मौखिक परंपरेनेच दिले जात असावे. तथापि काही विधिसंहिता मिळतात. त्यांची आर्ष भाषा पाहता त्या फार प्राचीन काळी तयार झाल्या असाव्यात, असे अनुमान केले जाते. Senchas Mar (इं. शी. ग्रेट ओल्ड लॉ बुक) ही विधिसंहिता त्यांत विशेष महत्त्वाची. आयर्लंडचा संत पॅट्रिक ह्याच्या अध्यक्षतेखाली एका मंडळाने ही संहिता तयार केली, असे मानले जाते. तत्कालीन वैद्यकाची कल्पनाही वैद्यांचे समाजातील स्थान आणि त्यांच्यावरील कायदेशीर जबाबदाऱ्या ह्यांबाबतच्या विधिविषयक विवेचनातून मिळते.

  

सतराव्या शतकात Annala Rioghachta Eireann (इं. शी. द ॲनल्झ ऑफ द फोर मास्टर्स) हे आयर्लंडच्या १६१६ पर्यंतच्या इतिहासाच्या सर्व उपलब्ध सामग्रीचे अत्यंत महत्त्वाचे संकलन मायकेल ओ क्लेरी ह्याच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले. जेफ्री कीटींग (सु. १५७०—१६४६) ह्याने लिहिलेला Foras Feasa ar Eirinn   हा खऱ्याखुऱ्या अर्थाने आयरिशमधील पहिला इतिहासग्रंथ मानला जातो. त्याची भाषाशैली साधी, सोपी पण प्रभावी वाटते.

  

Pairliment ChloinneTomais (इं. शी. पार्लमेंट ऑफ क्लॅन टॉमस) ह्या सतराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या उपरोधिकेने गद्यशैलीच्या विकासास लक्षणीय हातभार लावला. ही उपरोधिका गद्यपद्यमिश्रित असली, तरी तीत गद्याला प्राधान्य आहे. सत्ताधारी आणि देशातील कृषकवर्ग ह्यांवर ह्या उपरोधिकेत टीका आहे. 

ह्यांशिवाय गेलिकमध्ये काही रोमान्स लिहिले गेले. मध्ययुगीन आयरिश साहित्यातून, तसेच अन्य भाषांच्या साहित्यांतून ह्या रोमान्सचे विषय घेतलेले दिसतात. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत गेलिक भाषेतील साहित्याचा ऱ्हास सुरू झाला. काही थोडे धार्मिक स्वरूपाचे लेखन सोडले, तर गेलिक साहित्याची निर्मिती जवळजवळ थांबलीच होती, असे म्हणता येईल. 


काव्य : Faeth Fiada (इं. शी. क्राय ऑफ द डीअर) आणि Amra (इं. शी. यूलॉजी) ही आरंभीच्या गेलिक काव्यरचनेची दोन उदाहरणे. ह्यांपैकी पहिली रचना संत पॅट्रिकने केली, असे परंपरा मानते आणि आयर्लंडचा एक महत्त्वाचा प्राचीन कवी दल्लान फॉर्गेल ह्याच्या नावावर ‘यूलॉजी’ मोडते. आयरिश संत कोलंबा हा ‘यूलॉजी’चा विषय. ह्या रचनांमधून तालबद्धता आणि अलंकृतता हे शैलीविशेष प्रत्ययास येतात. अनुप्रासावर विशेष भर दिसतो. छंदशास्त्राच्या दृष्टीने प्राचीन गेलिक कविता अभ्यसनीय आहे. अवयवसंख्यने (सिलॅबल्स) नियंत्रित होणारी, विवक्षित व्यंजनांबरोबरच यमके साधणारी (उदा., शब्दाच्या अखेरीस II ही व्यंजने आल्यास तो शब्द m, nn, ng व rr अशी व्यंजने अखेरीस येणाऱ्या शब्दांबरोबरच यमकांकित होऊ शकत असे), दोन ओळींतील दुवा अनुप्रासांनी साधणारी अशी रचनादृष्ट्या वैविध्यपूर्ण कविता ह्या भाषेत लिहिली गेली आहे.

  

फिलिडांनी रचिलेल्या प्राचीन गेलिक कवितेत स्तवनिका, विलापिका, छंदोबद्ध वंशावळी ह्यांचा समावेश होतो. पुष्कळदा कवितेत जाणीवपूर्वक दुर्बोधता आणण्याचा फिलिडांचा प्रयत्न असे. अशा प्रकारच्या दुर्बोधतेमुळे फिलिडांच्या कवितेतील जिवंतपणा हरवला.

  

चर्चच्या सेवेत असलेल्या धर्मोपदेशकांनी काही धार्मिक स्वरूपाची काव्यरचना केली परंतु तीही शुष्क वाटते. ईश्वरभक्तीने भारलेल्या काही थोड्या कवितांत मात्र केवळ उत्कटतेचाच नव्हे, तर आत्मपरतेचाही प्रत्यय येतो. अशी कविता लिहिणारे कवी अज्ञातच राहिले आहेत. आत्मपरतेच्या संदर्भात Pangur Ban (सु. नववे शतक) ही भावकविता उल्लेखनीय आहे. ह्या कवितेत लिन्स्टरमधील एक विद्वान स्वतःची तुलना एका पांढऱ्या शुभ्र मांजराशी करतो. आत्मपर गेलिक कवितेचे पहिले उदाहरण म्हणून गेलिक साहित्याचे विख्यात संशोधक आर्. फ्लॉवर ही भावकविता नमूद करतात.

  

गेलिकमध्ये दर्जेदार निसर्गकविताही लिहिली गेली. तीत निसर्गप्रेम आणि धर्मभावना एकमेकांत मिसळून गेली आहेत. ख्रिस्ती मठवासीयांप्रमाणे फिलिडांनीही निसर्गकविता लिहिली. फिलिडांच्या काही निसर्गकवितांवर स्कँडिनेव्हियन कवितांचे संस्कार आढळतात.

  

विविध प्रकारची माहितीही पद्यात संकलित केली गेली. Dindshenchus हे अशाच प्रकारचे एक महत्त्वपूर्ण संकलन. आयर्लंडमधील अनेक स्थळे आणि त्यांच्याशी संबद्ध असलेल्या आख्यायिका त्यात अंतर्भूत आहेत.

  

बाराव्या शतकात फिलिडांची जागा चारणांनी घेतली. ब्रिअन बोरू (९४१—१०१४) ह्या आयरिश राजाच्या कारकीर्दीत बहुधा चारणांच्या काव्यरचनेस चालना मिळाली असावी, असे आर्. फ्लॉवर ह्यांच्यासारख्या अभ्यासकांचे मत आहे. बाराव्या शतकात झालेल्या अँग्लो-नॉर्मनांच्या स्वाऱ्यांमुळे आयर्लंडमधील जीवन उद्ध्वस्त झाले. तेथील राजे पदच्युत झाले. ह्या घटनांचा प्रतिकूल परिणाम फिलिडांच्या व्यवसायावर झाला. शिवाय फिलिड व्हायचे म्हणजे बारा वर्षांच्या विशिष्ट अभ्यासक्रमातून पार पडावे लागे. त्यामुळे वीणा (हार्प) वाजवून गीते गाणाऱ्या चारणांचा व्यवसाय चांगला चालू लागला. तथापि फिलिडांनी संपादिलेली सामाजिक प्रतिष्ठा चारणांना नव्हती. चारणांनी आपल्या कविता मुख्यतः आयर्लंडमधील श्रीमंत व प्रतिष्ठित लोकांच्या आश्रयाने लिहिल्या. साहजिकच त्यांत स्तुतिपरता प्रामुख्याने आढळते.

  

फिलिडांची कविता दुर्बोध होती. त्यांनी वापरलेले छंदही गुंतागुंतीचे, अवघड आणि विपुल होते. चारणांच्या कवितेत छंदांची संख्या मर्यादित झाली, तसेच काव्यरचना करीत असताना भाषेच्या प्रचलित रूपाचे भान त्यांनी आवर्जून ठेवले. तथापि चारणांनी कवितेचे नियम अत्यंत काटेकोर केले. अलंकारांचा हव्यास हे त्यांच्या कवितेचे एक लक्षणीय वैशिष्ट्य ठरले. आश्रयदात्यांची स्तुती हेच कवीचे प्रमुख कर्तव्य झाल्यामुळे कवितेचे आशयक्षेत्र संकुचित झाले. तिचे स्वरूप एकसुरी, कंटाळवाणे झाले. काही अपवाद वगळता चारणकाव्य सामान्यच आहे. अशा अपवादांत मरी ओ डॅली (सु. १२२०) ह्या कवीने आपल्या पत्नीच्या निधनावर लिहिलेली श्रेष्ठ विलापिका अंतर्भूत करता येईल. ‘काल रात्री माझा आत्मा मला दुरावला’ अशा अर्थाच्या ओळीने आरंभ होणारी ही विलापिका गेलिक कवितेचे एक लेणे होय, असा अभ्यासकांचा निर्वाळा आहे.

अँग्लो-नॉर्मनांच्या सहवासामुळे गेलिक कवितेत दरबारी प्रेमाचा नवा प्रवाह आला. ह्या प्रभावातून रचण्यात आलेल्या काही दर्जेदार कविता टी. एफ्. ओरॅहिली ह्यांनी १९२६ मध्ये संकलित केल्या.

  

सतराव्या शतकात इंग्लंडने आयर्लंडमधील सरदार-सरंजामदारांची उरलीसुरली सत्ता संपुष्टात आणली आणि चारणांचा एक मोठा आधार तुटला. त्यामुळे त्यांना जनसामान्यांकडे वळावे लागले. ह्याचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे चारणांच्या बंदिस्त आणि शिस्तबद्ध छंदव्यवस्थेत सैलपणा आला. त्यांच्या कवितेचा घाट मात्र अवघडच राहिला. विशेष म्हणजे सतराव्या शतकातील प्रबोधनाच्या वातावरणाचा चारणांच्या काव्यरचनेला स्पर्शच झाला नाही. त्यांची मने जुन्या परंपरांतच गुंतून पडली होती. १६१६ ते १६२४ पर्यंत दक्षिण आयर्लंड व उत्तर आयर्लंड येथील कवींमध्ये काव्यरचनेतील श्रेष्ठत्वाचा वाद कवितेच्याच माध्यमातून चालला होता. १६५० च्या सुमाराला चारणांचा काव्यसंप्रदाय जवळजवळ नष्टच झाला. चारणांनंतरच्या कवींना खऱ्या अर्थाने लोककवी म्हणता येईल. कोणाच्या आश्रयाने त्यांनी कविता लिहिली नाही. ह्या कवितेत उत्कट देशभक्तीचा जोमदार आविष्कार प्रथम आढळतो, तसेच इंग्लंडने आयर्लंडवर प्रस्थापित केलेल्या सत्तेविषयी चीडही आढळते. ह्या कवींनी जे छंद वापरले, तेही लोकपरंपरेतूनच अवगत झालेल्या गीतांचे. जेफ्री कीटींग, डेव्हिड ओ ब्रूएदेअर आणि ओ रेटहाइल हे अशा कवींपैकी होत. ह्या कवींनंतर गेलिक काव्यपरंपरा मुख्यतः मन्स्टरमध्ये जिवंत राहिली. Cuirt an Mheanoiche (इं. शी. द मिड्‌नाइट कोर्ट) ही ब्रिअन मेरिमनची कविता मन्स्टर परंपरेतील. ‘हिरोइक कप्‌लेट’ गेलिक काव्यशैलीशी जमवून घेण्याचा हा एक लक्षणीय प्रयत्न. त्यानंतर गेलिक काव्यपरंपरा सातत्याने क्षीणच होत गेली.

  

गेलिक भाषा-साहित्याचे पुनरुज्जीवन : इंग्रजी सत्तेमुळे गेलिक भाषेचीही गळचेपी झाली. प्रत्यक्ष आयर्लंडमध्ये ती बोलणारे अल्पसंख्य झाले, तेव्हा तिच्या पुनरुज्जीवनाचा विचार सुरू झाला. आयरिश कवी आणि विद्वान ⇨ डग्लस हाइड  ह्याने १८९३ मध्ये ‘गेलिक लीग’ ची स्थापना केली. पुनरुज्जीवनवाद्यांनी गेलिकमध्ये लेखन करून आधुनिक गेलिक साहित्यनिर्मितीचा प्रयत्न केला. कॅनन पीटर ओ लीअरी, पॅट्रिक पीअर्स, पॅड्रेग ओ कोनेअर, टॉमस ओ क्रीऑम्हथेन, मेर्टिन ओ कॅधेन ही नावे ह्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. 

कॅनन पीटर ओ लीअरी ह्याने गेलिकमध्ये काही भाषांतरे-रूपांतरे केली. पॅट्रिक पीअर्स व पॅड्रेग ओ कोनेअर ह्यांनी गेलिकमध्ये लघुकथा लेखनाचा आरंभ केला. टॉमस ओ क्रीऑम्हथेनची An Toileanach (१९२९, इं. भा. द आयलंडमन, १९३४) ही मन्स्टरमधील एका कोळ्याची आत्मकथा गेलिकमधील श्रेष्ठ साहित्यकृतींत गणली जाते. मेर्टिन ओ कॅधेन याने Cre na Cille (१९४९) ही ग्रामीण जीवनावरील एक प्रभावी कादंबरी लिहिली. ब्रेंडन बेहनने An Giall  हे नाटक लिहिले. द हॉस्टेज (१९५८) ह्या नावाने त्याचे इंग्रजीत रूपांतर झाले. थोडी भावकविताही लिहिली गेली. तथापि आधुनिक गेलिक साहित्याने वाङ्‌मयीन उंची फारशी गाठली नाही, असेच सर्वसाधारणतः दिसून येते. 

संदर्भ :  1. Dillon, M. Early Irish Literature, 1948. 

            2. Flower, R. The Irish Tradition, 1947. 

            3. Greene, D. O’ Connor, F. Ed. A Golden Treasury of Irish Poetry, 1967. 

            4. Hyde, Douglas, A Literary History of Ireland, III Ed., London, 1903. 

कुलकर्णी, अ. र.