काश्तेलू ब्रांकू, कामीलू : (१६ मार्च १८२५—१ जून १८९०). पोर्तुगीज कादंबरीकार. जन्म लिस्बन येथे. बालपणीच पोरका झाल्यामुळे काही काळ त्याचा प्रतिपाळ त्याच्या नातेवाईकांनी केला. वयाच्या अठराव्या वर्षी ओपोर्तो येथे तो वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी गेला. तेथे अनेक प्रेमप्रकरणांमुळे त्याची अपकीर्ती झाली आणि तशाच एका प्रकरणी त्याला तुरुंगवास भोगावा लागला. धर्मोपदेशक होण्याचा विचार त्याने एकदा केला होता. तथापि तो सोडून त्याने लेखनास वाहून घेतले. पुढे पोर्तुगालच्या राजाने त्याला व्हाय्‌काउंट केले. आयुष्याच्या अखेरीस त्याला अंधत्व आले होते व उत्तर पोर्तुगालमधील मीन्यू प्रांतात साउ मिगेल द सेद येथे त्याचे वास्तव्य होते. तेथेच त्याने आत्महत्या केली.

त्याने सु. दोनशे ग्रंथ लिहिले. त्यांत नाटके, चरित्रे, कादंबऱ्या, साहित्यसमीक्षा इत्यादींचा समावेश होत असला, तरी मुख्यतः कादंबरीकार म्हणूनच तो प्रसिद्ध आहे. त्याच्या जीवनातील वादळी घटनांवरच त्याच्या अनेक कादंबऱ्या आधारलेल्या आहेत. उदा., Amor de perdicao (१८६२, इं.शी. लव्ह ऑफ पर्डिशन), Os misterios de Lisboa (१८५४, इं.शी.द मिस्टरीज ऑफ लिस्बन), Novelas doMinho (३ खंड, १५७५–७७, इं.शी.स्टोरीज ऑफ द मीन्यू), A Queda d’ um anjo (१८६६) ह्या त्याच्या आणखी काही उल्लेखनीय कादंबऱ्या.

श्रेष्ठ कादंबरीकाराची सर्जनशीलता त्याच्यापाशी नव्हती. सांकेतिक संविधानक, विस्कळित रचना, अवास्तव भावविवशता यांसारखे दोष त्याच्या कादंबऱ्यांत आढळतात. तथापि उत्कृष्ट गद्यशैलीमुळे त्या आजही वाचल्या जातात.

कुलकर्णी, अ.र.