कास्तील्योने, बाल्दास्सारे : (६ डिसेंबर १४७८ – २ फेब्रुवारी १५२९). इटालियन मुत्सद्दी आणि साहित्यिक. जन्म इटलीतील मांतोव्हा शहरी. शिक्षण मांतोव्हा आणि मिलान येथे. मिलानचा ड्यूक लूदो‌व्हीको स्फोर्त्सा (१४५१—१५०८) ह्याच्या दरबारी राहून दरबारी ‌रीतिरिवाजांचा त्याने अभ्यास केला आणि नंतर त्याच ड्यूककडे १४९९ पर्यंत नोकरी केली. त्यानंतर मांतोव्हाच्या मार्क्विसच्या सेवेत काही वर्षे राहिल्यावर तो ग्वीदोबाल्दो दा माँतेफेल्त्रो ह्या ऊर्बीनोच्या ड्यूककडे आला. तेथे असताना महत्त्वाच्या अनेक राजनैतिक कामगिऱ्या त्याने पार पाडल्या. ग्वीदोबाल्दोच्या मृत्यूनंतर (१५०८) त्याच्या पुतण्याकडे (फ्रांचेस्को मारीआ देल्ला रोव्हेरे) ड्यूकपद आले. त्याने कास्तील्योनेला आपला प्रतिनिधी म्हणून पोपच्या दरबारी पाठविले (१५१३). १५१६ मध्ये पोप लीओ दहावा ह्याने फ्रांचेस्कोला ड्यूकपदावरून दूर केल्यामुळे फ्रांचेस्कोसह तो मांतोव्हास आला. त्यानंतर दोन वर्षांनी मांतोव्हाचा प्रतिनिधी म्हणून त्यास रोमला पोपच्या दरबारी पाठविण्यात आले. १५२४ मध्ये पोप क्लेमेंट सातवा ह्याने त्याला स्पेनच्या पाचव्या चार्ल्सच्या दरबारी आपला प्रतिनिधी म्हणून पाठविले. स्पेनमध्येच टोलीडो येथे तो निवर्तला.

लॅटिनमध्ये काही विलापिका आणि इटालियनमध्ये काही सुनीते व एक एक्लॉग अशी काही काव्यरचना त्याने केली असली, तरी त्याची कीर्ती त्याच्या Il libro del cortegiano (१५२८, इं. भा. द बुक ऑफ द कोर्टिअर, १५६१) ह्या गद्यग्रंथावरच अधिष्ठित आहे. मार्च १५०७ मध्ये ऊर्बीनोच्या राजवाड्यात आदर्श दरबारी कसा असावा, ह्यासंबंधी झालेली चर्चा संवादरूपाने सांगण्याची ग्रंथकर्त्याची भूमिका आहे. १९ पुरुष आणि ४ स्त्रिया ह्या चर्चेत सहभागी आहेत. रोज संध्याकाळी, अशी चार दिवस ही चर्चा होते म्हणून ग्रंथाची विभागणी चार खंडांत केलेली आहे. पहिल्या खंडात आदर्श दरबारी होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा आहे. दुसऱ्यात मैदानी खेळ, संगीत, बुद्धिबळे इ. दरबारी मंडळींच्या मनोविनोदनाचे आदर्श प्रकार तसेच संभाषणकला, आत्मसंयमन वगैरे संकीर्ण विषय यांचे विवेचन आहे. दरबारी स्त्री कशी असावी, याचा परामर्श तिसऱ्या खंडात असून चौथ्यात आदर्श दरबारी हा राजाशी कोणत्या प्रकारचे संबंध ठेवतो आणि प्रत्यक्ष राजाच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत हे सांगितले आहे. ईश्वर‌मीलनाच्या अंतिम उद्दिष्टाकडे विकसित होत जाणाऱ्या प्रेमाच्या विविध अवस्थांचेही ह्यात विवेचन आहे.

प्रबोधकालीन इटालियन साहित्यातील एक अभिजात गद्यकृती म्हणून उपर्युक्त ग्रंथ ओळखला जातो. तत्कालीन सामाजिक, राजकीय आणि तत्त्वचिंतनात्मक विचारांचे प्रतिबिंब त्यात आढळते. यूरोपीय वाङ्मयातही हा ग्रंथ मान्यता पावलेला असून त्याचे इंग्रजी भाषांतर सर टॉमस हॉबी यांनी १५६१ मध्ये केले आहे. इतर यूरोपीय भाषांतही त्याचे अनुवाद झाले आहेत.

आहलूवालिया, राजेंद्र ‌सिंह (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)