मीगेल दे ऊनामूनो ई हूगो

ऊनामूनो ई हूगो, मीगेल दे : (२९ सप्टेंबर १८६४–३१ डिसेंबर १९३६). स्पॅनिश साहित्यिक आणि विचारवंत. जन्म बिलबाओ येथे. हा बास्क वंशाचा होता. माद्रिद विद्यापीठात त्याने तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. सालामांका विद्यापीठातील ग्रीकच्या अध्यासनासाठी त्याची १८९१ मध्ये निवड झाली आणि त्या अध्यासनाशी त्याचे नाव आमरण निगडित राहिले. १९०१ मध्ये विद्यापीठाचा तो रेक्टर झाला आणि स्पॅनिश भाषेच्या इतिहासासाठी असलेल्या अध्यासनावरही त्याची नेमणूक झाली. स्पेनचे अधिकृत धोरण तटस्थपणाचे असतानाही पहिल्या महायुद्धाच्या आरंभी त्याने दोस्तांची बाजू उचलून धरल्यामुळे, त्याला त्याच्या अधिकारपदांवरून दूर करण्यात आले. तथापि विद्यापीठाच्या विद्याशाखेने त्याला रेक्टरचा पूर्वाधिकार प्राप्त होईपर्यंत व्हाइस रेक्टर म्हणून नेमले. यूरोपातील बुद्धीवंतांचे नेतृत्व त्याला प्राप्त झाले. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यानंतर त्याने दोस्तांना दिलेला पाठिंबा योग्य होता असे दिसून आले. आल्फॉन्सो राजाने काँदे दे रॉमानोनेस ह्या मुत्सद्याबरोबर त्याला आपल्या भेटीस बोलावले, त्यावेळी एक राजकारणी व्यक्ती म्हणूनही त्यास मान्यता मिळाली. जनरल प्रिमो दे रिव्हेरा याच्या हुकूमशाहीला (१९२३–१९३०) त्याने उघड विरोध केल्यामुळे त्याला सर्व अधिकारपदांवरून काढून टाकण्यात आले. त्याचप्रमाणे कानेरी बेटांपैकी फ्वेर्तेव्हेनतूरा या बेटावर त्यास कैद करून ठेवण्यात आले. प्रिमो दे रिव्हेरानंतर सत्तापदी आलेल्या जनरल बेरेंगारने त्याला त्याची पदे पुनश्च देऊ केली परंतु १९३१ मध्ये प्रजासत्ताकाची स्थापना होईपर्यंत त्याने ती स्वीकारली नाहीत. प्रजासत्ताक स्थापन होताच नव्या राजकीय वातावरणात तो सालामांका येथे परत आला पण लवकरच स्पॅनिश प्रजासत्ताकातील जहालमतवाद्यांना त्याने विरोध करण्यास सुरुवात केली. १९३६ च्या लष्करी उठावाच्या वेळी त्याने जनरल फ्रँकोची बाजू घेतली.

त्याचे चिंतन मुख्यतः मृत्यूच्या समस्येभोवती केंद्रित झाले आहे. चिरंतनाचा ध्यास आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची जपणूक ह्या प्रेरणाच सर्व धर्मांच्या आणि मानवी प्रयत्नांच्या मुळाशी आहेत, असे त्याला वाटे. मानवाची ही आकांशा आणि शास्त्रीय ज्ञान यांचा समन्वय होत नसल्यामुळे माणसाला शोकात्मतेची जाणीव होत राहते, असे त्याचे मत होते. बुद्धी आणि जीवन या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत, ही त्याची धारणा होती. Del sentimiento tragico de la vida en los hombres y los pueblos (१९१३, इं. भा. द ट्रॅजिक सेन्स ऑफ लाइफ इन मेन अँड इन पीपल्स, १९२१) हा त्याचा ग्रंथ त्या दृष्टीने लक्षणीय आहे. Niebla (१९१४, इं. भा. मिस्ट, १९२८) आणि Tres novelas ejemplaresy un prologo (१९२०, इं. भा. थ्री एग्झेंप्लरी नॉव्हेल्स अँड अ प्रोलॉग, १९३०) यांसारख्या त्याच्या कादंबर्‍यांतही त्याचे जीवन आणि मृत्यू यांसंबंधीचे चिंतन आढळते. काहींना त्यात अस्तित्ववादाची छाया दिसते. El Cristo de Velazquez (१९३०) हा त्याचा काव्यग्रंथ विशेष उल्लेखनीय आहे. सर्‌व्हँटीझच्या Don Quixote या कादंबरीवरील त्याचा निबंधही, त्यातील व्यक्तिरेखांच्या तपशीलवार विश्लेषणामुळे उल्लेखनीय ठरतो. याशिवाय स्पेन आणि दक्षिण अमेरिका येथील अनेक वृत्तपत्रांतून त्याने लेखन केले. सालामांका येथे त्याचे निधन झाले. हंबर्ट, जॉ.

(इ.) पेठे, मो. व्यं. (म.) कुलकर्णी. अ. र.