किंताना, मान्वेल होसे : (११ एप्रिल १७७२ – ११ मार्च १८५७). स्पॅनिश कवी आणि देशभक्त. जन्म माद्रिद येथे. शिक्षण सालामांका विद्यापीठात. कायद्याचा पदवीधर झाल्यानंतर माद्रिदमध्ये काही काळ त्याने वकिली केली. तथापि तो लवकरच वाड्‌मयाकडे वळला आणि कवी म्हणून प्रसिद्धीस आला. त्याच्या उदारमतवादी राजकीय मतांमुळे सातवा फेर्नांडिय सत्तेवर असताना त्याला तुरुंगवास भोगावा लागला होता (१८१४ – २०). तथापि स्पेनमधील उदारमतवाद्यांच्या कारकीर्दीत (१८२०–२३) त्याची मुक्तता होऊन तो शिक्षण संचालकपदावर नेमला गेला. दुसऱ्या इझाबेलाचा शिक्षक म्हणूनही त्याने काम केले. स्पेनची राणी झाल्यानंतर, १८५५ मध्ये दुसऱ्या इझाबेलाने किंतानाला समारंभपूर्वक राजकवी केले.

देशभक्तीच्या भावनेने भारलेल्या त्याच्या उद्देशिका विशेष प्रसिद्ध आहेत. ‘Al armamento de las Provincias espanolas contra los franceses’ (इं. शी. टू द आर्मिंग ऑफ द स्पॅनिश प्रॉव्हिन्सिस, १८०८) ही नेपोलियनच्या आक्रमणाने स्पेन व्यापल्यावर रचिलेली प्रखर प्रतिकारवादी उद्देशिका विशेष गाजली. El Duque de Viseo (१८०१) आणि Pelayo (१८०५) ह्या त्याच्या दोन शोकात्मिकांपैकी दुसरी काहीशी यशस्वी ठरली. स्वच्छंदतावादाच्या वाढत्या प्रभावकाळातही तो निष्ठावंत नव-‌अभिजाततावादीच राहिला. त्याच्या उत्कृष्ट गद्यलेखनात लॉर्ड हॉलंड ह्यास स्पेनच्या राजकीय परिस्थितीबद्दल त्याने १८२३-२४ ह्या काळात लिहिलेली पत्रे (१८५२) आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींची शब्दचित्रे (Vidas de Espanoles celebres, ३ खंड, १८०७ –३३) यांचा समावेश होतो. माद्रिद येथे तो मरण पावला.

कुलकर्णी, अ. र.