ओर्तेगा इ गासेत, होसे : (९मे १८८३ –१८ ऑक्टोबर १९५५). स्पॅनिश विचारवंत. जन्म माद्रिद येथे. त्याचे वडील एक प्रसिद्ध पत्रकार होते. माद्रिद विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्या विषयाच्या विशेष अध्ययनासाठी तो जर्मनीत गेला आणि लाइपसिक, बर्लिन, मारबर्ग या विद्यापीठांत विद्यार्थी म्हणून राहिला. जर्मनीत नव-कांटमताचा फार मोठा प्रभाव त्याच्यावर पडला. स्पेनला परतल्यावर माद्रिद विद्यापीठातील तत्त्वमीमांसा ह्या विषयाच्या अध्यासनासाठी त्याची नियुक्ती आली (१९१०). राजकारण, तत्त्वज्ञान आदी विषयांवरील त्याच्या विचारप्रवर्तक लेखनामुळे त्याची कीर्ती स्पेनबाहेरही पसरली. १९२३ मध्ये Revista de Occidente हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जर्नल त्याने काढले. तत्त्वज्ञान, विज्ञान आणि वाङ्मय ह्यांसारख्या क्षेत्रांतील अद्ययावत प्रवाहांचा परिचय करून देणे, हा ह्या जर्नलचा प्रमुख हेतू. ह्याच साली प्रिमो दे रिव्हेरा स्पेनचा हुकूमशहा झाल्यानंतर त्याने माद्रिद विद्यापीठ सोडले. १९३१ मध्ये त्याने एक राजकीय गट उभारला आणि स्पेनच्या संविधानसमितीचा सदस्य म्हणून तो निवडून आला. तथापि १९३३ मध्ये तो राजकारणातून निवृत्त झाला व स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू झाल्यानंतर (१९३६) स्पेन सोडून फ्रान्स, अल्जीरिया, पोर्तुगाल या देशांत जाऊन राहिला. १९४५ मध्ये तो स्पेनला परतला. माद्रिद येथेच त्याचे निधन झाले.
Meditaciones del Quijote (१९१४), Espana invertebrada (१९२२, इं. भा. इन्व्हर्टिब्रेट स्पेन, १९३७), El tema de nuestro tiempo (१९२३, इं. भा. द मॉडर्न थीम, १९३३), La deshumanizacion del arte ideas sobre la novela (१९२५, इं. भा. द. डीह्मूमनायझेशन ऑफ आर्ट अँड नोट्स ऑन द नॉव्हेल, १९४८), La rebelion de las masas (१९३०, इं.भा. द रिव्होल्ट ऑफ द मासेस, १९३२), Mision de la universidad (१९३०, इं. भा.मिशन ऑफ द युनिव्हर्सिटी, १९४६), Historica como sistema (१९४१, इं. शी. टुवर्ड्स ए फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी) हे त्याचे महत्त्वाचे ग्रंथ.
मुख्यत: वर्तमानपत्रांतील लेख, मासिक, व्याख्याने ह्यांद्वारा त्याने आपल्या विचारांचा प्रसार केला. स्पेनच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि राजकीय समस्यांचे चिकित्सक विश्लेषण त्याने केले. तसेच सामाजिक मूल्यांच्या संदर्भात कलेच्या विशुद्ध तत्त्वांची चर्चा करून तिचे अवमानवीकरण कसे झाले आहे, हे दाखवून दिले. द रिव्होल्ट ऑफ द मासेस ह्या ग्रंथामुळे त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त झाली. स्पेनमध्ये त्यावेळी प्रतिगामी शक्तींविरुद्ध झगडणाऱ्या बुद्धिमतांचा संदर्भ ह्या ग्रंथास आहे. ह्या ग्रंथात ओर्तेगाने जनसामान्यांच्या हाती सामाजिक सत्ता कशी व कोणत्या तऱ्हेन जात आहे आणि तिचे भलेबुरे परिणाम काय होणार आहेत, हे स्पष्ट केले आहे. आधुनिक तंत्रविज्ञानात निष्णात असणारा आणि सत्तावान होणारा नवा तंत्रज्ञ मूलतःच कसा नीतिहीन आणि संस्कृतिहीन असा सुशिक्षित रानवट राहतो, याचे अत्यंत मार्मिक व भेदक विश्लेषण ओर्तेगाने सादर केले आहे. विसाव्या शतकात जीवनवादी (व्हायटॅलिस्ट) तत्वज्ञान मांडणाऱ्यांमध्ये ओर्तेगाची कामगिरी मोठी आहे. जीवन हे अंतिम वास्तव असून ज्ञाता व ज्ञात यांचे बौद्धिक कोड्यात टाकणारे द्वैत त्याच्यात वितळून जाते, असा महत्त्वपूर्ण विचार त्याने फार विस्तृतपणे विशेषतः ‘टूवर्ड्स ए फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी ’ या ग्रंथात मांडला आहे. द मॉडर्न थीम हा ओर्तेगाचा छोटासा तत्त्वज्ञानविषयक निबंधांचा संग्रह विशेष उल्लेखनीय आहे. विवेकवाद, सापेक्षतावाद आदी आधुनिक प्रणालींचा समाचार घेताना ओर्तेगाने त्याचे जीवनवादी तत्त्वज्ञान याठिकाणी हिरिरीने मांडले असून क्रांतिकारकतेचया पूर्णपणे विरोधी असे युग सुरू होत आहे, असे सखोल चिकित्सेतून दाखविले आहे.
ओर्तेगाचे सारेच लिखाण मूलभूत प्रश्नांना हात घालणारे, विलक्षण प्रभावी आहे आणि त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जात आहे. ओर्तेगा हा नीत्शेनंतरचा बहुतेक सर्वांत श्रेष्ठ यूरोपीय लेखक आहे, ही आल्बेअर काम्यूने केलेली त्याची प्रशंसा लक्षणीय आहे.
कुलकर्णी, अ. र. कुलकर्णी, अनिरूद्ध
“