दिंडस : ज्या माशांना सर्वसाधारणपणे ‘अँकोव्ही’ म्हणतात त्यांपैकीच हा एक मासा आहे. याचे शास्त्रीय नाव अँकोव्हिएला ट्राय असे आहे. एनग्रॉलिडी मत्स्यकुलातील सर्व माशांना अँकोव्ही म्हणतात. या माशांचे ⇨ हेरिंग माशांशी साम्य आहे.

दिंडस (अँकोव्हिएला ट्राय)

दिंडस भारताच्या दोन्ही किनाऱ्‍यांवर आढळतो. हा ६–१० सेंमी. लांब असतो. शरीर दोन्ही बाजूंनी दबलेले तुंड (मुस्कट) टोकदार आणि पुढे आलेले असते. दोन्ही जबड्यांवर दात असतात. शल्कांची (खवल्यांची) मांडणी पद्धतशीर असते. शरीराचा रंग रुपेरी असून त्यात मधून मधून जांभळ्या रंगाच्या छटा असतात. डोळ्याच्या समोरून पुच्छ पक्षाच्या (शेपटीच्या पराच्या) बुडापर्यंत एक फिकट रुपेरी पट्टा गेलेला असतो. पश्चकपालाच्या मागे एक काळा ठिपका असतो. पार्श्वरेखेवर ३२–३५ शल्क असतात. दिंडस प्लवकांवर (पाण्यात तरंगणाऱ्या सूक्ष्म प्राणी व वनस्पतींवर) उपजीविका करतो कोळंब्या हे याचे मुख्य खाद्य असले, तरी पॉलिकीट कृमी व लहान मासेदेखील तो खातो. हे नोव्हेंबर–मार्च या काळात अंडी घालतात. मासेमारीत हे फार मोठ्या प्रमाणावर पकडले जातात. ऑगस्ट–डिसेंबर हा मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर मासेमारीचा हंगाम असतो. हा खाद्यमत्स्य आहे.

दिंडस ज्या एन्‌ग्रॉलिडी कुलातील आहे त्या कुलातील मासे उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांतील समुद्राच्या उथळ पाण्यात राहतात. नदीमुखाजवळील मचूळ पाण्यात ते वारंवार जातात. उष्ण प्रदेशातील काही अँकोव्ही गोड्या पाण्यात राहणारे आहेत. अँकोव्ही माशांचे कित्येक वंश असून १०० पेक्षा जास्त जाती आहेत. भारताच्या समुद्रात सु. १५–१६ जाती आढळतात.

अँकोव्ही हे लहान मासे असून त्यांचे शरीर सडपातळ असते. लांबी सु. १०–१५ सेंमी. असून शरीराचा रंग सामान्यतः रुपेरी असतो बाजूंवर फिक्कट पट्टे असतात. तोंड मोठे व तुंड टोकदार असते. दात लहान असतात.

हे मासे पुष्कळ अंडी घालतात. ती लांबट व पारदर्शक असून पाण्यावर तरंगत असतात. अंडी सु. दोन दिवसांत फुटतात आणि बाहेर पडलेले डिंभ (भ्रूणानंतरची प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील पूर्व अवस्था) तळाशी जातात. पिल्ले व प्रौढ मासे प्लवकजीवांवर उपजीविका करतात आणि त्यांची वाढ झपाट्याने होते. या माशांचे लहानमोठे थवे असतात.

हे मासे पकडण्याचा उद्योग पुष्कळ देशांत महत्त्वाचा आहे. खाण्याकरिता या माशांचा उपयोग करतात. कुरचूक (ठिसूळ) हाडे, तेलकट मांस आणि विशिष्ट स्वाद यांमुळे हे मासे पुष्कळ लोकांना आवडतात. तेलात मसाला घालून त्यात हे मासे साठवून ठेवतात किंवा ते खारवून पिंपात भरून ठेवतात. इतर मासे पकडण्याकरिता लहान अँकोव्ही माशांचा आमिष म्हणून उपयोग करतात.

यार्दी, ह. व्यं.