रूबेन दारीओ: (१८ जानेवारी १८६७–६ फेब्रुवारी १९१६). ख्यातकीर्त निकाराग्वन कवी. मूळ नाव फेलिक्स रूवेन गार्लिआ सारमीएंतो. जन्म निकारग्वातील मेतापा येथे. बालवयापासूनच तो कथा-कवितांचे लेखन करू लागला. ‘रूवेन दारीओ’ हे त्याने स्वतःसाठी घेतलेले टोपण नाव. कोवळ्या वयात त्याने केलेल्या लेखनातूनही त्याच्या तीव्र कल्पनाशक्तीचा प्रत्यय येतो. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापासून आपला देश सोडून त्याने ठिकठिकाणी भ्रमंती केली. व्वेनस एअरीझ येथील वातावरण त्याला साहित्यनिर्मितीच्या दृष्टीने विशेष चैतन्यशील वाटले. तेथे अनेक तरून साहित्यिक त्याच्या भोवती जमले त्यांनी त्याला आपले नेतृत्व बहाल केले. तेथे आल्यानंतर पत्रकारी आणि राजनैतिक सेवेच्या निमित्ताने यूरोपात त्याने बराच प्रवास केला. पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर यूरोपमधील आपले वास्तव्य त्याने संपविले. त्या वेळी त्याची प्रकृती बरीच खालावली होती आणि आर्थिक स्थितीही अत्यंत प्रतिकूल होती. त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी उत्तर अमेरिकेत व्याख्यानांचा एक दौरा करावयाचे त्याने ठरविले परंतु त्या दौऱ्याचा आरंभ झाल्यानंतर न्यूयॉर्क येथे तो न्यूमोनियाने आजारी पडला. मायदेशी परत आल्यावर लवकरच लेओन येथे त्याचे निधन झाले.

रूबेन दारीओचा पहिला महत्त्वपूर्ण ग्रंथ Azul (१८८८, इं. शी. ब्लू) हा होय. स्पॅनिश-अमेरिकन साहित्यातील नव्या मनूचा अग्रदूत म्हणून ह्या ग्रंथाला मान्यता मिळाली. त्यात रूबेन दारीओच्या कविताबरोबरच त्याचे गद्यलेखनही अतंर्भूत आहे. त्यातील कवितांवर फ्रेंच साहित्यातील ‘ल पर्नास’ ह्या साहित्यसंप्रदायाचा ‘कलेकरिता कला’ ह्या भूमिकेचा प्रभाव दिसून येतो. आपल्या गद्यलेखनात स्पॅनिशमधील गुंतागुंतीची पारंपारिक वाक्यरचना टाकून साध्या, सुटसुटीत वाक्यरचनेचा त्याने स्वीकार केला.

ब्वेनस एअरीझमध्ये असताना रूवेन दारीओच्या वाङ्‌मयीन वर्तुळातील तरूण साहित्यिकांनी त्याच्या नेतृत्वाखाली ‘मॉडर्निझम’ (इ.अर्थ) हा काव्यसंप्रदाय उभा करण्याची धडपड केली. ह्या काव्यसंप्रदायाने प्राचीन काव्यप्रकारांचे पुनरूज्जीवन करून त्यांना अधिक नितळ स्वरूप दिले. काव्यभिव्यक्ती अधिक प्रवाही करण्यासाठी नव्या छंदांचाही वापर केला. जिवंत रूपके, सुभग नादमयता, एका इंद्रियसंवेदनेचे वर्णन करण्यासाठी अन्य इंद्रियसंवेदनेचा आधार घेणे (उदा., मखमली आवाज), स्वच्छंदतावादी कवितेत वापरून गुळगुळीत झालेली शब्दकळा कटाक्षाने टाळणे, वाक्यरचना सुटसुटीत करणे ही मॉडर्निझमची काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत. ह्या काव्यसंप्रदायाने स्वच्छंदतावादाची जीर्ण झालेली शब्दकळा अव्हेरली असली, तरी स्वच्छंदतावादी प्रवृत्ती, फ्रेंच प्रतीकवाद व ‘ल पार्नास ’ ह्यांचे संश्लेषण स्पॅनिश-अमेरिकन मुशीत घालून केले होते, असे म्हणता येईल.

Prosas profanas y oytas poemas (१८९६, इं. शी. प्रोफेन हिमस अँड अदर पोएम्स) ह्या त्याच्या दुसऱ्या ८ महत्वपूर्ण काव्यसंग्रहावर फ्रेंच प्रतीकवाद्यांचा प्रभाव दिसून येतो.

यूरोपमधील वास्तव्याचाही प्रभाव त्याच्यावर पडला. कलाक्षेत्रापलीकडील जगाबद्दल त्याला अगत्य निर्माण झाले स्पॅनिश जगाची एकात्मता त्याला महत्वाची वाटू लागली. स्पॅनिश-अमेरिकेच्या भवितव्याचा विचार तो करू लागला आणि मानवी अस्तित्वाचे मूलभूत प्रश्नही त्याच्या मनाला भिडू लागले. ह्याचा प्रत्यय त्याच्या Cantos e de vida y esperanzd (१९०५, इं. शी. साँग्ज ऑफ लाइफ अँड होप) ह्या काव्यसंग्रहातून येतो.

रूबेन दारीओने सु. शंभर कथा लिहिल्या. त्याच्या कथांतून त्याने ग्रीक-रोमन मिथ्यकथांचा उपयोग केला आहे. तसेच उपर्युक्त तीन विशेष उल्लेखनीय काव्यसंग्रहांव्यतिरिक्त त्याचे अन्य काही काव्यसंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. समीक्षात्मक लेखनही त्याने केले.

त्याचे समग्र साहित्य १९७१ साली दोन खंडांत प्रसिद्ध झाले. त्याच्या काही वेचक कवितांचा इंग्रजी अनुवाद १९६५ मध्ये प्रसिद्ध झाला.

संदर्भ : 1. Fiore, D. A. Ruben Darlo in Search of Inspiration : Greco Roman Mythology in His Stories and Plays, 1963.

2. Schade, G. D. Gonzalez-Gerth Ed. Ruben Dario : Centennial Studies, 1970.

3. Watland C. D. Poet Errant : A Biography of Ruben Dario, 1965.

कुलकर्णी, अ. र.