थॉरील्या इ मोराल, होसे : (२१ फेब्रुवारी १८१७ – २३ जानेवारी १८९३). स्पॅनिश कवी व नाटककार. व्हॅलादोलिड येथे जन्मला. शिक्षण माद्रिद, टोलिडो व व्हॅलादोलिड येथे झाले. १८३६ मध्ये तो माद्रिद येथे आला आणि त्याने स्वतःला काव्यलेखनास वाहून घेतले. प्रसिद्ध स्पॅनिश नाटककार मार्यानो होसे दे लार्रा (१८०९–३७) ह्याच्या निधनावर लिहिलेल्या विलापिकेमुळे थॉरील्या कवी म्हणून प्रथम प्रकाशात आला. कांतॉस देल त्रॉव्हादॉर (१८४०–४१) हा त्याचा विशेष उल्लेखनीय कवितासंग्रह. थॉरील्याची कविता स्वच्छंदतावादी वळणाची असून प्रवाही, नादवती शैली ही तिची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. कथाकवी म्हणून तो विशेष प्रभावी ठरला. अनेक लोककथांना आणि आख्यायिकांना त्याने काव्यरूप दिले. एकोणिसाव्या शतकातील स्पॅनिश कवितेवर त्याने आपला ठसा उमटविला. तथापि दॉन व्हान तेनॉरिऑ (१८४४) ह्या त्याच्या पद्यनाटकामुळे आज तो विशेष ओळखला जातो. दॉन व्हानच्या प्रसिद्ध आख्यायिकेतच नवे नाट्यचैतन्य थॉरील्याने ओतले. एकोणिसाव्या शतकात विविध यूरोपीय भाषांत लिहिल्या गेलेल्या स्वच्छंदतावादी नाट्यकृतींत हे नाटक महत्त्वाचे गणले जाते.

१८५५ मध्ये तो मेक्सिकोत वास्तव्यासाठी गेला. तेथे सम्राट माक्सिमीलिआन ह्याचा त्याला आश्रय लाभला तेथे राष्ट्रीय रंगभूमीची उभारणी करण्याचे कार्य त्याच्याकडे सोपविले गेले. १८६६ मध्ये तो स्पेनला परतला, तेव्हा त्याची लोकप्रियता कमी झालेली होती. तथापि १८८९ मध्ये ग्रानाडा येथे राष्ट्रकवी म्हणून त्याचा सन्मान करण्यात आला. माद्रिद येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.