लोर्का, फेथेरीको गार्सीआ : (५ जून १८९८-१९ किंवा २०  ऑगस्ट १९३६). स्पॅनिश कवी आणि नाटककार. स्पेनमधील फ्वेंते व्होकेरोस येथे एका शेतकरी कुटुंबात जन्मला. वडील शेतकरी, तर आई एका शाळेत शिक्षिका होती. लोर्काला संगीताची खूप आवड होती. पियानोवादनाचे आरंभीचे धडे त्याने त्याच्या आईकडेच घेतले. त्याचे आरंभीचे शिक्षण ग्रानादा येथील जेझुइट शाळेत झाले. त्यानंतर १९१४ मध्ये कायद्याच्या अन्यायासाठी ग्रानादा विद्यापीठात त्याने प्रवेश घेतला. तथापि कायद्यापेक्षा लेखन, चित्रकला, पियानो आणि गिटारवादन ह्यांतच त्याला विशेष रस होता. ग्रानादा विद्यापीठात शिकत असतानाच तो कविता करू लागला. तथापि त्याचे प्रसिद्ध झालेले पुस्तक (‘इंप्रेशन्स अँड लँडस्केप्‌ स’, १९१८, इं.शी) मात्र गद्य होते. स्पेनमधील कॅस्टील येथे तो गेला असताना तेथे आलेले अनुभव त्याने ह्या पुस्तकात मांडले आहेत. १९१९ मध्ये त्याने माद्रिद विद्यापीठात प्रवेश घेतला. ह्या विद्यापीठातील ‘रेसिडन्स ऑफ स्कॉलर्स’ (इं.अर्थ) ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लेखकांच्या आणि कलावंतांच्या मंडळात त्याला स्थान मिळाले. विख्यात चित्रकार साल्वादोर दाली आणि कवी रॅफेएल आल्बेर्ती ह्यांच्यासारख्या मित्रांचा लाभ त्याला ह्या विद्यापीठात झाला. लोर्काच्या कवितांना स्पेनमधल्या विविध वाङ्‌मयीन वर्तुळांतून मान्यता मिळू लागली, ती ह्याच काळात. ‘कविता ही वाचण्यासाठी असते, तिला पुस्तकात कोंडली, की ती निष्प्राण होते’, असे तो म्हणत असे. त्यामुळे काव्यवाचन करणे तो अधिक पसंत करी. तथापि १९२१ मध्ये ‘बुक ऑफ पोएम्स’ (इं.शी.) हा त्याचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. त्याआधी, १९१९ मध्ये ‘बटरफ्लाइस ईव्हिल स्पेल’ (इं.शी.) हे त्याचे पहिले नाटक त्याने लिहिले (प्रयोग १९२०). ग्रानादा येथे १९२२ मध्ये भरलेल्या लोकसंगीतमहोत्सवात संगीताचा प्रेमापोटी लोर्काने भाग घेतला. मान्वेल दे फाल्ल ह्या नामवंत संगीतकाराबरोबर त्याने त्या वेळी काम केले. लोकसंगीतात-विशेषतःजिप्सी संगीतात-त्याला जे स्वारस्य निर्माण झाले, त्यातूनच त्याचे १८ ‘जिप्सी बॅलड्स’ (१९२८, इं. शी.) लिहिले गेले. पारंपरिक स्पॅनिश बॅलडसारखा कविताप्रकार हाताळताना अनेक नव्या प्रतिमांचा वापर करून त्याने त्या काव्यप्रकाराला नवे चैतन्य प्राप्त करून दिले. ह्या कवितांनी त्याला आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवून दिली. कविता लिहीत असताना त्याचे नाट्यलेखनही चालू होतेच. १९२७ मध्ये रंगभूमीवर आलेल्या मारिआना पिनेदा ह्या त्याच्या पद्यनाट्याने नाटककार म्हणून त्याला मोठे यश प्राप्त करून दिले. साल्वादोर दालीने त्याच्या नेपथ्याची बाजू सांभाळली होती. ह्याच वर्षी बार्सेलोना येथे त्याने त्याच्या चित्रांचे प्रदर्शनही भरविले. १९२९ मध्ये तो फ्रान्स, इंग्लंड आणि स्कॉटलंडमार्गे न्यूयॉर्कला आला. कोलंबिया विद्यापीठात त्याने वास्तव्य केले. १९३०  मध्ये तो स्पेनमध्ये परतला. न्यूयॉर्क लोर्काला फारसे आवडले नाही. न्यूयॉर्कबद्दलची त्याची ही प्रतिक्रिया ‘द पोएट इन न्यूयॉर्क’ (१९३०, इं.शी.) मधील अतिवास्तववादी कवितांतून प्रत्ययास येते. अतिवास्तववादी पद्धतीने त्याने लिहिलेल्या ‘व्हेन फाइव्ह यीअर्स पास’ (इं.शी. लेखन १९२९/३०, प्रयोग १९४५, १९५४) ह्या नाटकातूनही ती जाणवते. ‘द शूमेकर्स प्रॉडिजस वाइफ’ (इं.शी. पहिले लेखन १९२६ नंतरचे संस्कातिर लेखन १९३१-३२) हेही ह्याच सुमाराचे नाटक.

स्पेनमध्ये प्रजासत्ताकाची राजवट (सेकंड रिपब्लिक) आल्यानंतर लोर्काच्या नाट्यलेखनाला मोठा वाव मिळाला. लोर्काने स्थापन केलेल्या ‘ला बार्राका’ ह्या विद्यार्थ्याच्या नाटकमंडळीला राष्ट्रीय खात्याकडून आर्थिक साहाय्य होऊ लागले. १९३२ ते १९३५ ह्या काळात हे विद्यार्थी उत्तमोत्तम नाटके अशिक्षित, श्रमिक आणि शेतकरी ह्यांच्या पुढे सादर करीत. दिग्दर्शनाची आणि संगीताची बाजू लोर्काच सांभाळीत असे. रंगभूमीचा खूप मोठा अनुभव ह्या काळात लोर्काला मिळाला. ब्लड वेंडिग (१९३३ , इं.भा. १९५८), येर्मा (१९३४), ‘दोना रोसिता द स्पिन्स्टर, ऑर द लँग्वेज ऑफ द फ्लॉवर्स’ (१९३५, इं.शी.), ‘द हाउस ऑफ बर्नार्डा आल्बा’ (१९३६, इं.शी.) ह्या त्याने लिहिलेल्या नाटकांच्या मागे ह्या अनुभवाचाही भक्कम आधार होता.

स्पेनमध्ये १९३५-३६ ह्या कालखंडात प्रजासत्ताकाच्या विरोधात असलेल्या फॅसिस्ट प्रवृत्तींनी जोर धरला होता खून पडत होते. प्रजासत्ताकाविषयी आस्था असणाऱ्यांसाठी ग्रानादामध्ये सुरक्षित वातावरण नव्हते. अशा परिस्थितीत मित्र विरोध करीत असतानाही लोर्का माद्रिद सोडून ग्रानादात आला. १८ जुलै १९३६ रोजी स्पॅनिश मोरोक्कोमध्ये असलेल्या लष्कराने जनरल फ्रान्सिस्को फ्रँको ह्याच्या नेतृत्वाखाली स्पेनच्या प्रजासत्ताक सरकारविरुद्ध उठाव केला. दोन दिवसांनी ग्रानादा येथील स्पॅनिश सैनिकांनी बंड केले. विरोधकांच्या हत्त्या सुरू झाल्या. लोर्काकडेही बंडखोरांचा मोर्चा वळला. आपल्या एका मित्राच्या घरी त्याने आश्रय घेतला, पण तेथून-बहुधा १९ ऑगस्ट रोजी-त्याला बंडखोरांनी ताब्यात घेऊन त्याचा वध केला. त्याचे शव कधीच हाती लागले नाही.

ज्या काळात फार थोडे आधुनिक नाटककार शोकात्मिकेसारखा नाट्यप्रकार हाताळीत होते, त्या काळात लोर्काने पद्यात शोकात्मिका लिहून ती यशस्वी करून दाखविली. लोर्काच्या पूर्वी शोकात्मिकालेखनाची परंपरा खऱ्या अर्थाने स्पॅनिशमध्ये नव्हती. सुखात्मिका आणि शोक-सुखात्मिका (ट्रॅजि-कॉमेडी) ह्यांचे लेखन होत होते. भाषेच्या फुलोऱ्यांनी नटलेली वा अतिनाट्याचे भडक रंग असलेली काही नाटके शोकात्मिका म्हणून लिहिली जात होती. त्यांचे माध्यमही गद्य असे. यूरोपीय तसेच स्पॅनिश नाटकांशी उत्तम परिचय असलेल्या लोर्काने त्या नाटकांतील जे चांगले त्याचा उपयोग आपल्या नाट्यलेखनासाठी समर्थपणे करून घेतला.

व्यक्ती आणि तिचा आसमंत ह्यांच्यातील संघर्ष हा त्याच्या नाट्यकृतींतून लक्षणीयपणे आढळणारा विषय होय. सन्मानाबाबतच्या कल्पना त्याबाबतची काटेकोर आचारसंहिता ह्यांचे स्पेनच्या दैनंदिन जीवनात एके काळी असलेले प्राबल्य लक्षात घेता, स्पेनमध्ये हा संघर्ष अधिक तीव्र असणे स्वाभाविक होते. स्पॅनिश समाजाशी आणि त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आचारसंहितेची अपरिवर्तनीयता ह्यांचे भान लोर्काला होते. त्यातूनच त्याच्या शोकात्मिका तो आकारास आणू शकला. अर्थात लोर्का ज्या समाजाबद्दल लिहीत होता, तो प्राधान्याने ग्रामीण होता आणि नंतरच्या काळात त्या समाजात महत्त्वाचे बदल घडून आले आहेत.

येर्मा ह्या त्याच्या नाट्यकृतीचा मराठी अनुवा आरती हवालदार ह्यांनी चांगुणा ह्या नावाने केला आहे.

संदर्भ : 1. Barea Arture, Lorca : The Poet and His People, London, 1944.

           2. Campbell, Roy, Lorca : An Appreciation of His Poetry, New York, 1952.

           3. Duran, M.Ed., Lorca : A Collection of Critical Essays, Englewood Cliffs (N.J.), 1962.

           4. Honig, Edwin, Garcia Lorca, Norfolk (conn), 1944, Rev, 1963.

           5. Lima, R.The Theatre of Garcia Lorca, New York, 1963.

 

कुलकर्णी, अ.र.