केव्हेदो इ व्हिल्येगास, फ्रांथीस्को गोमेथ दे : (१७ सप्टेंबर १५८०–८ सप्टेंबर १६४५). स्पॅनिश साहित्यिक. जन्म माद्रिद येथे एका खानदानी कुटुंबात. आल्काला व व्हॅलादोलिड येथे शिक्षण. १६१३ मध्ये ओसूनाच्या ड्यूकने त्याला आपला सल्लागार नेमले. तथापि व्हेनिस सरकारविरुद्ध झालेल्या एका कटाच्या संदर्भात गंभीर आरोप झाल्यामुळे ह्या ड्यूकला स्पेनला परत बोलावण्यात आले (१६२०). ड्यूकप्रमाणेच केव्हेदोलाही तुरुंगवास घडला. त्यानंतरच्या काळात त्याने स्पेनचा राजा चौथा फिलिप ह्याची मर्जी संपादन केली. १६३२ मध्ये त्याला ‘राजसचिव’ ही मानाची पदवी देण्यात आली. तथापि १६३९ मध्ये राजाचा त्याच्यावर रोष झाला आणि लीआँ येथे त्याला काही वर्षे कारावास भोगावा लागला. त्याने राज्यकारभारावर लिहिलेले एक उपरोधकाव्य राजाच्या निदर्शनास आणले गेल्यामुळे ही शिक्षा झाली असे म्हणतात परंतु ही कविता केव्हेदोची होती किंवा काय, हेही निश्चित नाही. कारागृहीय जीवनात त्याची प्रकृती फारच ढासळली आणि तेथून मुक्त झाल्यानंतर (१६४३) दोन वर्षांनीच त्याचे व्हील्यान्वेव्हा दे लोस एन्‍फांतेस येथे निधन झाले.

केव्हेदोच्या साहित्यातून त्याच्या तीव्र बुद्धिमत्तेबरोबरच उत्कट भावनात्मकतेचा प्रत्यय येतो. त्याचे लेखनही वैविध्यपूर्ण आहे. समर्थ गद्यलेखक, प्रभावी उपरोधकार आणि कवी अशा नात्यांनी त्याने स्पॅनिश साहित्यावर आपला ठसा उमटविला आहे. Vida del Buscon Ilamado Don Pablos (१६२६, इं. भा. बस्कोन, द विटी स्पॅनिआर्ड, १६५७) ही त्याची पिकरस्क पद्धतीची कादंबरी त्याच्या श्रेष्ठ साहित्यकृतींपैकी एक होय. जगाबद्दलचा त्याचा उपेक्षावादी दृष्टिकोन तीव्रपणे व्यक्त करणारी ती एक प्रभावी उपरोधिकाही आहे. Suenos (व्हिजन्स) हे त्याचे उत्कृष्ट गद्यलेखन. नरक, निवाड्याचा दिवस आणि मृत्यूचे राज्य हे त्यांतील विषय. त्यांतून त्याने जगातील अनेक विसंवादांवर आपली औपरोधिक लेखणी चालविली आहे. १६०६ ते १६२२ ह्या कालखंडात ही क्रांतदर्शी निवेदने लिहिलेली असून त्याच्या उपरोधलेखनाचा विकासक्रमही त्यांतून स्पष्ट होतो. La politica de Dios (१६१७–२६) आणि La vida de Marco Bruto (१६४४) हे त्याचे राजनीतिविषयक ग्रंथ. त्याचा बोधवादी द्दष्टिकोन त्यांतून प्रतीत होतो. La politica…. या ग्रंथात त्याने राजांपुढे ख्रिस्ताचा आदर्श मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ….de Marco Bruto हे प्लूटार्कच्या ब्रूटसचरित्रावरील भाष्य होय. केव्हेदोची काव्यरचनाही विपुल आहे. सुनीते, प्रेमगीते, रोमान्स, उपरोधिका असे विविध काव्यप्रकार त्याने हाताळले, आयुष्याचे क्षणजीवित्व आणि तत्संबंधीचा भ्रमनिरास हे विषय त्याच्या कवितांतून येतात. त्याचा नीतिवादी दृष्टिकोन त्याच्या कवितांतही आहेच. शाब्दिक कोट्या, कल्पनांच्या क्लृप्त्या इ. वैशिष्ट्यांची एक भारदस्त शैली त्याने जोपासली. त्याच्या काव्यातून भावनोत्कटतेपेक्षा बौद्धिकतेचाच प्रत्यय प्राधान्याने येतो. 

कुलकर्णी, अ. र.