लूईस दे ग्रानादा : (१५०४?-१५८८). धर्मविषयक लेखन करणारा स्पॅनिश साहित्यिक. ग्रानादा येथे जन्मला. तो ख्रिस्ती धर्मातील डॉमिनिकन पंथाचा होता आणि त्या पंथात त्याला महत्त्वाचे स्थान होते. Guia de pecadores (१५५६, इं. भा. द सिनर्स गाइड, १५९८) ह्या आपल्या ग्रंथात त्याने व्यक्तिगत धर्म आणि श्रद्धा ह्यांचे महत्त्व प्रतिपादिले. लॅटिन, फ्रेंच, जर्मन ह्यांसारख्या यूरोपीय भाषांत, तसेच जपानी भाषेतही हा गंथ अनुवादिला गेला. प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक ह्या दोन्ही धर्मपंथांतील लोकांना त्याचे ग्रंथलेखन आवडले. ख्रिस्ती धर्मन्यायपीठाकडून (इन्क्विझिशन) मात्र त्याच्याकडे संशयाने पाहिले गेले. Introduction del simbolo de la fe (१५८३, इं. शी. ॲन इंट्रोडक्शन टू द सिंबल ऑफ द फेथ) हा त्याचा ग्रंथही उल्लेखनीय आहे. प्रतिधर्मसुधारणेच्या (काउंटर-रेव्हलूशन-कॅथलिक पंथाची सुधारणा) कालखंडातील एक वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी त्याच्या लेखनातून जाणवते. लिस्बन येथे तो निधन पावला. 

कुलकर्णी, अ. र.