तरणक­ : समुद्रात राहणाऱ्या प्राण्यांची स्पष्टपणे वेगवेगळी स्वाभाविक निवासस्थाने असतात व ती समुद्राच्या निरनिराळ्या भागांत वा क्षेत्रात असतात. भरती व ओहोटी यांच्या मर्यादांच्यामध्ये असणाऱ्या भागाला अंतरावेलीय क्षेत्र म्हणतात. या क्षेत्रात अनेक जातींचे प्राणी राहतात. किनाऱ्यापासून दूर असणारा समुद्राचा मोकळा उघडा भाग हे तलप्लावी क्षेत्र होय. या क्षेत्राचे दोन भाग पडतात : एक समुद्राच्या पृष्ठाजवळचा भाग असून सूर्यप्रकाश जेथपर्यंत खोल जाऊ शकेल (७६–१८३ मी.) तेथपर्यंत हा भाग पसरलेला असतो व त्याला प्रकाश–क्षेत्र म्हणतात. दुसरा त्याच्या खालचा भाग होय. हा सतत काळोखात असून त्याला अप्रकाश–क्षेत्र म्हणतात. सागराचा तळ हे नितल–क्षेत्र होय.

या क्षेत्रांतील प्राण्यांचे तीन वर्ग पडतात : प्लवक, तरणक आणि नितलवासी. प्लवक हे तरंगणारे आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारे सूक्ष्मजीव होत. हे प्राणी अन्नाकरिता प्रकाशसंश्लेषण (कार्बन डाय–आक्साइड वायू व पाणी यांच्यापासून सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत हरितद्रव्याच्या मदतीने अन्नाची निर्मिती) करणाऱ्या शैवलांवर अवलंबून असल्यामुळे फक्त प्रकाश–क्षेत्रातच आढळतात [⟶ प्लवक].

पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला पोहत जाऊ शकणाऱ्या आणि वाटेल तेथे जाण्याची कुवत असणाऱ्या प्राण्यांचा तरणकांमध्ये समावेश होतो. यांची प्रमुख लक्षणे पुढे दिल्याप्रमाणे आहेत : गती देण्याचे सामर्थ्य असलेली व चांगली वाढ झालेली विशिष्ट इंद्रिये माध्यमाचा (पाण्याचा) प्रतिरोध कमी करण्यासाठी असलेला शरीराचा चातीसारखा आकार द्विपार्श्व सममिती (एका पातळीने शरीराचे दोन समान भाग होतील अशी स्थिती) व अपारदर्शक पण स्पष्ट दिसण्याजोगे रंग असलेले शरीर. यांचा कंकाल (हाडांचा सांगाडा) अपारदर्शक असतो आणि स्नायू व विशिष्ट ज्ञानेंद्रिये यांची चांगली वाढ झालेली असते. स्किड सारखे काही शीर्षपाद, बहुसंख्य मासे, सागरी कूर्म (कासव), समुद्री सर्प, देवमासे, सील आणि पोहणारे इतर काही प्राणी ही तरणकांची उदाहरणे म्हणून देता येतील. तरणकांतील शाकाहारी प्राणी प्रकाश–क्षेत्राजवळ किंवा प्रकाश क्षेत्रातच राहतात, पण मांसाहारी तरणक सगळ्या तलप्लावी क्षेत्रात आढळतात. खोल अप्रकाश–क्षेत्रात केवळ मांसाहारी तरणकच राहतात.

समुद्राच्या तळावर सरपटणाऱ्या किंवा तेथे बिळे करणाऱ्या अथवा स्थानबद्ध असणाऱ्या प्राण्यांचा नितलवासींमध्ये अंतर्भाव होतो. स्पंज, प्रवाळ, बार्नेकल, खेकडे, तारामीन, कालवे, गोगलगायी, कृमी इ. प्राणी नितल–क्षेत्रात राहणारे आहेत [⟶ नितल जीवसमूह].

कर्वे, ज. नी.