फेइहोओ इ माँतेनेग्रो, बेनितो जेरोनिमो : (८ ऑक्टोबर १६७६-२६ सप्टेंबर १७६४). स्पॅनिश विद्वान आणि साहित्यिक. जन्म गॅलिशियामधील ओरेन्से प्रांतातील कास्देमीरो येथे. वयाच्या चौदाव्या वर्षी बेनिदिक्तिन पंथाची दीक्षा घेऊन त्या पंथाच्या सान हूल्यान दे सामोस येथील मठात तो फ्रायर झाला. पोंतेव्हेद्रा आणि सालामांका येथे त्याने शिक्षण घेतले. ओव्हिएदो विद्यापीठात त्याने दीर्घकाळ अध्यापन केले विविध अध्यासने भूषविली.

फेइहोओची कीर्ती, त्याने लिहिलेल्या विचारप्रवर्तक निबंधांवर अधिष्ठित आहे. Teatro critico y universal (८ खंड, १७२६-३९) आणि Cartas eruditas y curiosas (५ खंड, १७४२-६०) ह्या नावांनी हे निबंध संगृहीत आहेत. साध्यासुध्या पण नेटक्या शैलीत हे निबंध लिहिलेले आहेत. निबंधांच्या द्वारे आपल्या देशबांधवांचे अज्ञान आणि त्यांची अंधश्रद्धा दूर करण्याचा फेइहोओने प्रयत्‍न केला. कला आणि विज्ञान ह्या क्षेत्रांतील स्वातंत्र्याचा त्याने पुरस्कार केला स्त्रियांकडे पाहण्याच्या संकुचित दृष्टीवर टीका केली पाखंडी लोकांचा अत्यंत तिरस्कार करणाऱ्या स्पेनसारख्या देशात राहून इंग्रजांची प्रशंसा करण्याचे धैर्य दाखविले. स्पेनबाहेरील यूरोपीय जगातील आधुनिक विचारांबाबत त्याने आपले मन खुले राखले. परिणामतः स्पेनमध्ये फेइहोओच्या विरुद्ध टीकेचे वादळ उठले. १७५० मध्ये स्पेनचा राजा सहावा फर्डिनंड ह्याने खास राजाज्ञा काढून फेइहोओवरील टीका थांबवली. स्पेनमधील उद्‍बोधनाचा (एन्‌लाइटन्‌मेंट) फेइहोओ हा अग्रदूत मानला जातो. त्याच्या कलाविषयक विचारांनी स्पॅनिश साहित्यातील स्वच्छंदतावादाला प्रेरणा दिली. स्पेनवर तसेच स्पॅनिश अमेरिकेवर त्याच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. ओव्हिएदो येथे तो मरण पावला.

कुलकर्णी, अ. र.