एचेगाराई, होसे : (१९ एप्रिल १८३२ – ? सप्टेंबर १९१६). नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश नाटककार तसेच गणितज्ञ, अर्थशास्त्रवेत्ता व राजकारणपटू. जन्म माद्रिद येथे. त्याने आपले आयुष्य सुरुवातीस अभियांत्रिकी पेशात व नंतर अर्थशास्त्र व राजकारण या क्षेत्रांत व्यतीत केले. १८६८ नंतर त्याने स्पेनच्या मंत्रिमंडळातील अनेक मानाची पदे भूषविली. १८७४ ते १९०५ ह्या काळात त्याने साठाहून अधिक नाटके लिहिली आणि एक आघाडीचा नाटककार म्हणून कीर्ती मिळविली. १९०४ मध्ये त्याला व फ्रेदेरीक मीस्त्राल या दोघांना साहित्याचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. O locura o Santidad (१८७७, इं. भा. मॅड्मन और सेंट, १९०७) आणि El gran Galeoto (१८८१, इं. भा. द वर्ल्ड अँड हिज वाइफ, १९०८) ही त्याची दोन नाटके विशेष प्रसिद्ध आहेत. एचेगाराईची सुरुवातीची नाटके प्रामुख्याने नव-स्वच्छंदतावादी आहेत तथापि समस्याप्रधान वास्तववादी नाटके प्रचारात येताच तो तशा प्रकारची नाटके लिहू लागला. त्याच्या सर्व नाटकांची विभागणी नव-स्वच्छंदतावादी, सामाजिक समस्याप्रधान आणि चमत्कृतिपूर्ण किंवा प्रतीकात्मक या प्रकारांत करता येईल.

त्याच्या नाटकांवर ह्यूगो, द्यूमा फीस, इब्सेन, ब्यर्न्‌सॉन, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग यांसारख्या प्रख्यात नाटककारांचा तसेच स्पॅनिश साहित्याच्या सुवर्णकाळातील प्रणयप्रधान नाटकांचा प्रभाव आहे. त्याच्या नाटकांतील प्रसंग, उत्कर्षबिंदू, भाषा इ. नेटक्या बाजू जमेस धरूनही, त्यांत गतिमानता, काव्यात्मकता व स्वतंत्र दृष्टी यांचा अभाव आहे, असे म्हटले जाते. माद्रिद येथे तो निवर्तला.

सुर्वे, भा. ग.