ग्रीक भाषा : ग्रीक ही इंडो-यूरोपियन कुटुंबातील एक अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. ती बाल्कन द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील प्रदेशात आणि त्याच्या आजूबाजूच्या असंख्य बेटांत बोलली जात होती व अर्वाचीन रूपात आजही बोलली जाते. मात्र या प्रदेशातील मूळ रहिवासी इंडो-यूरोपियन बोलणार नव्हते. ग्रीक किंवा तत्सम बोली बोलणाऱ्या लोकांची या प्रदेशावरील आक्रमणे इ.स.पू. दुसऱ्या सहस्रकात सुरू झाली. ग्रीक इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांतील शेवटचे (डोरिक) आक्रमण इ.स.पू. १२oo च्या सुमारास झाले.

ग्रीकचा जुन्यात जुना पुरावा इ.स.पू. सातव्या शतकातील आहे, असे पूर्वी मानले जात होते. तो म्हणजे कलशावरील कोरीव लेखन. इलिअड  ओडिसी  ही महाकाव्ये अत्यंत प्राचीन असली, तरी त्यांचा काळ निश्चित करता येत नव्हता. परंतु काही वर्षांमागे क्रीट बेट व ग्रीस येथे सापडलेल्या कोरीव विटांवरून ‘लीनिअर ए’ व ‘लिनिअर बी’ या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या लेखनाचा शोध लागला आणि १९५२ मध्ये मायकेल व्हेंट्रिस यांना त्याचा उलगडा करण्यात यश येऊन लीनिअर बीमध्ये असलेले मायसीनियन ग्रीक या नावाने ओळखले जाणारे ग्रीकचे इ.स.पू. १४५o ते १२oo च्या दरम्यानचे रूप आपल्याला मिळाले. हा ग्रीक पुरावा निदान भारतातील इंडो-यूरोपियन पुराव्याइतकाच जुना आहे.

प्रादेशिक भेद : साहित्यिक व लिखित परंपरेच्या प्रारंभकाळी, म्हणजे इ.स.पू. ७oo ते ४oo च्या दरम्यान प्रत्येक ग्रीक शहराला स्वतःची स्वतंत्र बोली होती पण कोणतीही बोली इतर बोलींच्या भाषिकांना न समजण्याइतकी भिन्न नव्हती. या बोलींची भौगोलिक वाटणी पुढीलप्रमाणे होती : (१) आयोनियन ॲटिक. (अ) आयोनियन : ह्या बोली आशिया मायनरच्या दोदेकापोल भागात वापरल्या जात. हिरॉडोटसच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे चार भाग हाते : मिलेट, एकेझ, सामोस व किओस. त्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट नाहीत. शिवाय सिक्लाडीझच्या काही भागांत, अबे बेटात, अनेक वसाहतींत आणि थेट इटलीपर्यंत त्या पसरल्या होत्या. आयोनियनचा लेखननिर्मितीसाठी उपयोग इ.स.पू. ६oo पासूनचा आहे. ग्रीक संस्कृतीचा उदय सर्वांत आधी आयोनियातच झाला त्यामुळे तेथे लिपिबद्ध अशी सर्वमान्य भाषा आढळते.

(आ) ॲटिक : ही पुष्कळ प्रमाणात आयोनियनसारखी आहे. तिचा शिलालेखात पुरावा इ.स.पू. ७oo पासूनचा आहे. इ.स.पू. पाचव्या शतकापासून तिच्यात समृद्ध साहित्य आढळते. प्रांरभी ते आयोनियनने प्रभावित झालेले आहे. ग्रीक पुरावा देताना साधारणपणे ॲटिकचीच उदाहरणे देण्याचा प्रघात आहे कारण जवळजवळ पूर्णपणे माहित असलेली अशी ही एकच बोली आहे. शिलालेख, ज्यांचे वाचन विशेष विश्वासपात्र आहे असे वृत्तबद्ध साहित्य, प्लेटोचे ग्रंथ आणि कमीअधिक प्रमाणात व्यवस्थित राहिलेले ॲटिक ग्रंथ यांमुळे ॲटिकच्या भाषिक पुराव्याचे मूल्य फार मोठे आहे. शिष्ट लोकांच्या बोलण्यातील आणि साहित्यिकांनी वापरलेली ही अथेन्सच्या उच्च वर्गीयांची भाषा संस्कारयुक्त आहे. तेथील सामान्य जनतेच्या भाषेची मात्र कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

(२) ॲकिअन (आर्केडो-सिप्रिअट) – सायप्रसच्या बोलीतील शिलालेख इ.स.पू. पाचव्या-चौथ्या शतकांतील असून त्यांची लेखनपद्धती अवयवप्रधान आहे. त्यामुळे त्यांना एक विशेष महत्त्व आहे. आर्केडियनची काही वैशिष्ट्ये आयोनियनप्रमाणे आहेत. पॅम्फिलियन बोलीतही काही लेख असून ती आर्केडो-सिप्रिअटशीच संबंधित आहे.

(३) ईशान्येकडील बोली – (बिओशिआ, थेसाली, लेझ्बॉस आणि आशिया मायनरची एओलियन शहरे) – ॲल्सीअस, सॅफो (इ.स.पू. सातव्या शतकाचा शेवट) या लझ्बियन कवींनी आपली जन्मभूमी जे लेझ्बॉस बेट तेथील बोली वापरली आहे. ही एओलियन साहित्यिक भाषा होय. थेसालियन व बिओशियन यांची माहिती विशेषतः शिलालेखांतून होते. बिओशियन शिलालेखांत विशिष्ट काळची व विशिष्ट प्रदेशातील वैशिष्ट्ये सूक्ष्मपणे नमूद केलेली आहेत.

(४) पश्चिमेकडील बोली – डोरिक बोली एकमेकींपासून बऱ्याच वेगळ्या आहेत. साहित्यिक निर्मिती लवकर न झाल्यामुळे प्रत्येक शहाराची बोली सारखीच महत्त्वाची झाली. डोरिक बोलींची माहिती मुख्यतः शिलालेखांतूनच मिळते पण प्रमाण भाषा नसल्यामुळे ती अनिश्चित आहे. डोरिक प्रदेशाची व्याप्ती पुढीलप्रमाणे आहे : लकोनीअ व तिच्या वसाहती, मायसीनी, ऑर्‌गॉस, कॉरिंथ व तिच्या वसाहती आणि कॉर्सिर व सिराक्यूस, मेगारा आणि तिच्या वसाहती क्रीट (जिथे प्रत्येक स्थानाची स्वतंत्र वैशिष्ट्ये आहेत), डोरियन बेटे (इजीअन, कॉस, थीर इ.).

वायव्येच्या ईपायरस, ईटोल्य, लॉक्रिडस, फेसिडस येथील बोलींत फक्त शिलालेखच आहेत. त्यांपैकी डेल्फायचे (डेल्फीचे) लेख विशेष प्रसिद्ध आहेत. ऑलिंपियाचे शिलालेख एओलियन बोलीत आहेत.

होमरच्या इलिअड  व ओडिसी  या महाकाव्यांचा गाभा ग्रीक साहित्यिक परंपरेच्या पूर्वीचा आहे. होमर भूतकालीन घटनांबद्दल बोलत असला, तरी त्याला डोरिक आक्रमणाची माहिती नाही. त्यांचे भाषिक स्वरूप आयोनियनसारखे वाटले, तरी त्यांखालील थर एओलियनचा आहे. होमरची ग्रीक ही कोणत्याही विशिष्ट प्रदेशातील किंवा काळातील आहे, असे निश्चितपणे सांगता येणार नाही. मात्र या काव्यांची रचना नियमबद्ध भाषिक स्वरूपात असून हे नियम काव्यरचनेच्या बऱ्याच पूर्वीपासून अस्तित्वात असावेत, असे दिसते. या काव्यात बरीच प्राचीन व परंपरागत एओलियन रूपे टिकून आहेत आणि इतर कोणत्याही यूरोपीय ग्रंथापेक्षा ही काव्ये अधिक पुरातन आहेत. या भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात निर्गुण विशेषण अद्याप तयार झालेले नाही.

प्रादेशिक बोली टिकू शकल्या नाहीत. इ.स.पू. चौथ्या शतकापासून अथेन्सच्या बोलीवर आधारलेली आणि सहज जाणवणाऱ्या आयोनियनच्या परिणामाने (विशेषतः शब्दसंग्रहाने) प्रभावित अशी एक सर्वमान्य भाषा अस्तित्वात आली होती. तिला ‘कोइनेऽ’ हे नाव होते. अर्वाचीन ग्रीक बोली या कोइनेऽचीच परिवर्तित रूपे आहेत.

ग्रीकने इंडो-यूरोपियनची रूपपद्धती संस्कृतइतकी टिकवून धरली नसली, तरी इंडो-यूरोपियन स्वरपद्धती मात्र तिने अधिक चांगल्या रितीने सुरक्षित ठेवली. भारतीय व इराण भाषासमूहांइतकीच ग्रीकही इंडो-यूरोपियनच्या अभ्यासाला अपरिहार्य आहे.

ध्वनिविचार : स्वर – आ, इ, उ, ए, ओ (ऱ्हस्व व दीर्घ).

स्वरसंयोग – आइ, एइ, ओइ, आउ, एउ, ओउ.

व्यंजने : क्, ख्, ग्, ङ्, त्, थ्, द्, न्, प्, फ्, ब्, म्, य्, र्, ल्, व्, स्, झ्.

लेखनपद्धती : ग्रीक ध्वनिपद्धती तुलनात्मक व्याकरणाच्या आधाराने पुनर्घटित करता यते परंतु केवळ लिपिचिन्हांवरून मात्र हे चित्र आपल्याला मिळत नाही.

ग्रीक लिपीत स्वरवैशिष्ट्य दाखविणारी काही चिन्हे आहेत.

दोन चिन्हांना श्वासचिन्ह म्हणतात. त्यांपैकी एक मृदुश्वासचिन्ह असून त्याचा उच्चारावर परिणाम होत नाही. दुसरे कठोर श्वासचिन्ह असून ते स्वराबरोबर आल्यास त्या स्वरापूर्वी ‘ह्’ हा वर्ण गृहीत धरला जातो. शब्दारंभीचे नेहमी कठोरश्वासयुक्त लिहिले जातात.

आघातचिन्हे तीन आहेत : तीव्र, गंभीर व मध्यम. तीव्राघात शेवटच्या तीन अवयवांपैकी एकावर येऊ शकतो मध्यम दोन अवयवांपैकी एकावर व गंभीर फक्त शेवटच्या अवयवावर येऊ शकतो. साधारणपणे संस्कृत व ग्रीक शब्दांतील प्रमुख आघातात एकवाक्यता आढळते, पण ग्रीक आघात शेवटच्या तीन अवयवांपलीकडे जाऊ शकत नसल्यामुळे त्याचे कार्य मर्यादित झाले आहे.


रूपविचार : रूपविचारात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दपूर्व अव्यय, उभयान्वयी अव्यय, उद्‌गारवाचक यांचा प्रामुख्याने विचार होतो. या ठिकाणी मात्र नाम, सर्वनाम व क्रियापद यांची काही रूपे नमुन्यादाखल दिली आहेत.

नाम : नाम पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी एकवचनात, द्विवचनात किंवा अनेकवचनात आणि प्रथमा (कर्ता), द्वितीया (कर्म), चतुर्थी (संप्रदान), षष्ठी (स्वामित्व) किंवा संबोधन यांपैकी एका विभक्तीत असते.

पुल्लिंगीपातेऽर (सु. पितृ-पितर्) या नामाची रूपे येथे दिली आहेत :

 

एकवचन

द्विवचन

अनेकवचन

प्र.

ओपातेऽर्

तोऽपातेरे

ओइ पातेरेस्

द्वि.

तोन्पातेऽरा

तोउस् पातेरास्

च.

तोऽपात्री

तोइन्पातेरोइन्

तेइस पात्रासि(न्)

ष.

तोउपात्रोस

तोइन् पातेराेइन्

तोइन् पातेराेऽन्

सं.

पातेर्

पातेरेस्

सर्वनाम: सर्वनामात पुरुषवाचक, स्ववाचक, परस्परवाचक स्वामित्ववाचक, दर्शक, प्रश्नार्थक, अनिश्चित, संबंधदर्शक हे प्रकार आहेत. प्रथम व द्वितीय पुरुषवाचक सर्वनामांची रूपे पुढीलप्रमाणे :

 

एकवचन

द्विवचन

अनेकवचन

प्र.

एगोऽ–सु

नोऽ–स्फोऽ

एऽमेइस्–उमेइस्

द्वि.

एमे, मे–से, से

नोऽ–स्फोऽ

एमास्–उमास्

च.

एमोइ, मोह–सोइ, सोइ

नोऽन्–स्फोन

एमिन्–उमिन्

ष.

एमोउ, मोउ–सोउ, सोउ

नोऽन्–स्फोन

एऽमोऽन्–उमोऽन्

क्रियापद: क्रियापदात कर्तरी, कर्मणी व अप्रत्यक्ष स्ववाचक असे तीन प्रयोग आहेत. काळांच्या तीन जोड्या आहेत : वर्तमान आणि अपूर्णभूत, भविष्य व अनद्यतनभूत आणि पूर्ण व अतिपूर्णभूत. प्रत्येक जोडीतील पहिला काळ मुख्य असून दुसरा गौण आहे. अनद्यतन हा ऐतिहासिक निवेदनाचा काळ असून वर्तमान आणि पूर्णभूत हे चालू घटनांचे काळ आहेत.

  

यांशिवाय इतर काही सूक्ष्म भेद आहेत.

पूर्णभूत व भविष्य यांचे वैशिष्ट्य आद्य अवयवाची द्विरुक्ती हे आहे, तर अतिपूर्णभूतात द्विरुक्तीशिवाय आगमही होतो.

क्रियापदाचे सहा प्रकार आहेत : विध्यर्थ, आज्ञार्थ, संभावनार्थ, इच्छार्थ, भावार्थ व धातुसाधित.

क्रियापदातही द्विवचन आहे पण प्रथमपुरुषात ते आढळत नाही.

क्रियापदांचे दोन वर्ग आहेत : विध्यर्थ वर्तमानकाळी प्रथमपुरुषी एकवचनी – ओऽकारान्त आणि दुसरा – मिकारान्त. ओऽकारान्त क्रियापदांचे दोन प्रकार आहेत : स्वरात धातू असणारा व व्यंजनात धातू असणारा. मिकारान्त क्रियापदाचे तीन प्रकार आहेत : आद्यावयवाची द्विरुक्ती करणारा, द्विरुक्ती न करणारा व शेवटी नुमि असणारा.

एइमि (सं. अस्मि) व लुओऽ ‘मी सोडतो’ ही क्रियापदे नमुन्यादाखल खाली दिली आहेत.

एस्

लु

ए.व.

द्वि. व.

अ. व.

ए. व.

द्वि. व.

अ.  व.

एइमि

एस्मेन्

लुओऽ

लुओमेन्

एइ

एस्तोन्

एस्ते

लुएइस्

लुएतोन्

लुएते

एस्ति (न्)

एस्तोन्

एइसि (न्)

लुएइ

लुएतोन्

लुओउसि (न्)

वाक्यरचना : ग्रीक ही विकारक्षम भाषा असल्यामुळे तिच्यातील शब्दांना क्रमस्वातंत्र्य आहे. बरेचसे नियम संस्कृतसारखे असले, तरी काही वैशिष्ट्येही आहेत. उदा., द्विवचनाचा उपयोग वैकल्पिक आहे. नपुंसकलिंगी अनेकवचनी नामाचे क्रियापद एकवचनात असते इत्यादी.

या भाषेचे संस्कृतशी साधर्म्य लक्षात यावे म्हणून पुढे काही शब्द दिले आहेत. कंसात संस्कृत प्रतिरूप.

दुओ (द्वा), त्रेइस्–त्रिआ (त्रय:), तेत्तारेस–तेत्तारा (चत्वार:), पेन्ते (पंच), हेक्स (षट्), हेप्त (सप्त), ओक्तोऽ (अष्टा), एन्नेआ (नव), देका (दश), हेकातोन् (शतम्), पातेर् (पिता), मेऽतेर् (माता), बिओस् (जीव:), दोमोस् (दम:), नेफोस् (नभ:), पोसिस (पति:), क्लुतोस् (श्रुत:), थेर्मोस् (धर्म:), ओनोमा (नाम), एरुथ्रोस् (रुधिर:), हुप्नोस् (स्वप्न:).

संदर्भ : 1. Brugmann, K. Trans. Abre’ge’de grammaire compareedes langues indo-europeennes, Paris, 1905.

   2. Meillet, A. Introduction a’l’e’ tude comparative des langues indo-europeennes, Paris, 1937.

   3. Ragon, E. Grammaire complete de la langue grecque, Paris, 1937.

कालेलकर, ना. गो.