गोट्हेल्फ, येरेमीआस : (४ ऑक्टोबर १७९७ — २२ ऑक्टोबर १८५४). स्विस कादंबरीकार. खरे नाव आल्बेर्ट बिटसिउस. जर्मन भाषेतून लेखन. जन्म मुर्टन (फ्रायबर्ग) येथे. बर्न व गटिंगेन येथे धर्मशास्त्राचा अभ्यास. १८३२ पासून ल्यूत्सलफ्ल्यू येथे लोकशिक्षणाचे कार्य त्याने केले उदारमतवादला त्याने विरोध केला. लोकशिक्षणाच्या प्रेरणेतून तो लिहू लागला. Der Bauernspiegel (१८३७) ही कादंबरी लिहून त्याने ग्रामीण जीवनावरील कादंबरीचा पाया घातला. Wie Uli der Knecht gluecklich wird (१८४१, इं. भा. अल्-रिक द फार्म सर्व्हंट, १८८६), Uli der Paechter (१८४९, इं. शी. उली द फार्मर) ह्या त्याच्या अन्य काही कादंबऱ्या. ‘Elsi, die seltsame Magd’ (१८५०, इं. शी. एल्सी, द स्ट्रेंज मेड) ही त्याची एक उल्लेखनीय कथा.

त्याच्या उपर्युक्त साहित्यातून बर्न व त्याच्या आसमंतातील ग्रामीण जीवन ह्यांचे वास्तववादी दर्शन घडते. सूक्ष्म निरीक्षण, प्रभावी व्यक्तिरेखन, विलोभनीय वर्णने आणि विनोद ही त्याच्या लेखनाची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. त्यातील बोधवादी दृष्टी मात्र स्पष्टपणे दिसून येते. ल्यूत्सलफ्ल्यू येथेच तो निवर्तला. 

घारपुरे, न. का.