बास्क भाषा : पिरेनीझ पर्वतराजीच्या अतिपश्चिम टोकाला तिच्या उत्तर व दक्षिण उतारावर फ्रान्सच्या नैर्श्रत्य व स्पेनच्या ईशान्य कोपऱ्यात बोलली जाणारी बास्क या नावाने ओळखली जाते. तिचे भाषिक ह्या भाषेला अस्केरा, अस्कारा, एस्कुआरा म्हणतात. अतिप्राचीन काळी हे नाव हेउस्कारा असे होते.

बास्कचे अंशतः परस्परसदृश असे अनेक भेद आहेत. पण या एकंदर भाषेचे वैशिष्ट्य हे, की तिचा यूरोपातल्या कोणत्याही भाषाकुटुंबाशी जरासुद्धा संबंध नाही, एवढेच काय पण जगातल्या कोणत्या भाषाकुटुंबात तिचा अंतर्भाव करावा हे त्यामुळे भाषाशास्त्रज्ञांना अजूनही कळलेले नाही. इंडो-यूरोपियनांच्या आक्रमणापूर्वी आयबेरियातील आदिवासी जमातींकडून बोलल्या जाणाऱ्या एखाद्या भाषेचा तो अवशेष असावा, असे त्यांचे अनुमान आहे. परंतु काही सुटक शब्द तसेच स्थलनामे सोडल्यास आयबेरियाची इंडो-यूरोपियनपूर्व कोणतीही माहिती संशोधकांना नाही. त्यामुळे तूर्त तरी हा भाषिक वर्गीकरणाचा प्रश्न बाजूला पडलेला आहे. काही अभ्यासकांनी एका अमेरिकन इंडियन भाषेशी जवळीक दाखवण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला आहे.

फ्रेंच व स्पॅनिश यांसारख्या दोन महान सांस्कृतिक भाषांच्या निकट संपर्कात असल्यामुळे बहुसंख्य बास्क लोक द्विभाषिक आहेत. त्यामुळे त्यांची मूळ संख्या हळूहळू कमी होत जाण्याची शक्यता आहे, हे खरे असले तरीही त्यांच्यातील जननसंख्येचे प्रमाण एवढे आहे, की अद्याप तसा परिणाम दिसून आलेला नाही . फ्रान्समध्ये १९२१ साली तिचे भाषिक १,१४,०१७ होते तर १९२६ साली ते १,०७,२७८ होते. या उलट स्पेनमध्ये १८७७ साली ते ७,५४,५३६ तर १९२० च्या अखेरीस ते ११,२२,३४५ होते. आज एकंदर भाषिकांपैकी चार-पंचमांश स्पेनमध्ये असून एकपंचमांश फ्रान्समध्ये आहेत. कित्येक हजार स्थलांतरित बास्क लोक अमेरिकेत असून त्यांनी आपली भाषा प्रयत्नपूर्वक टिकवून धरली आहे.

बास्क बोली ध्वनिविचार, रूपविचार, वाक्यविचार आणि शब्दसंग्रह या दृष्टीने परस्परांपेक्षा कित्येकदा इतक्या भिन्न आहेत, की त्या सर्वांना लागू पडेल असे सर्वसाधारण वर्णन देता येणे कठीण आहे. त्यामुळे पुढे दिलेली रूपरेषा पुसटच आहे.

ध्वनिविचार : स्वर : आ इ ए उ ओ

व्यंजने : प फ ब फ (घर्षक), त थ द स, श च ज, क ख ग, ह, म न ञ, ङ, र ल (दन्त्य व तालव्य), य व.

लेखनासाठी रोमन लिपी वापरली जाते. पण तिची काही वैशिष्ट्ये आहेत : g ग, z स, tx च, j स्पेनमधल्या बोलीत घर्षक ख, तर फ्रेंच बास्कमध्ये य, h स्पेनमध्ये अनुच्चारित, फ्रान्समध्ये ह.

व्याकरण: नामात लिंगभेद नाही. अनेकवचन सामान्यतः क् हा प्रत्यय लागून होते आणि विभक्तिरूपे निरनिराळे संबंधदर्शक प्रत्यय लावून होतात. निश्चित निर्गुण विशेषण नामाच्या शेवटी ‘आ’ हा प्रत्यय जोडून होते : गिसोन् ‘माणूस’, गोसोन‘(तो) माणूस’, गिसोना गांदिक ‘माणसासाठी’.

विशेषण विकाररहित असून ते नामानंतर येते : गिसोन् एदेर् बात् ‘माणूस चांगला एक’.

सर्वनामे नी ‘मी’, ही ‘तू’, गु ‘आम्ही’, सु ‘तुम्ही’ पण सु हे आदरार्थी वापरले जात असल्यामुळे सुएक हे नवे अनेकवचन तयार करण्यात आले आहे.

वाक्यरचना बरीच क्लिष्ट आहे.

संदर्भ : 1. Cohen, M. Meillet, A. Les langues du monde, Paris, 1952.

2. Pei, M. The World’s Chief Languages, London, 1954.

कालेलकर, ना. गो.