इलिअड : एक अभिजात ग्रीक महाकाव्य. ते ⇨ होमरने लिहिले असे परंपरेने मानण्यात येते. इ. स. पू. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात ते रचले गेले असावे. इ. स. पू. दुसऱ्या शतकात ॲरिस्टार्कस ह्या अलेक्झांड्रिया येथील ग्रंथालयाच्या ग्रंथपालाने त्याची चोवीस खंडांत विभागणी केली, असे म्हटले जाते. हेक्झॅमीटरमधील १५,६७४ कविता ह्या महाकाव्यात आहेत. इलिअडचा अर्थ ट्रॉयवरील काव्य असा होतो. ट्रोजनांचे ग्रीकांबरोबर झालेले युद्ध हा या महाकाव्याचा विषय. तथापि आकिलीझ या ग्रीक महायोद्धयाचा क्रोध आणि त्याचा युद्धावर झालेला परिणाम त्यात प्राधान्याने चित्रित केलेला आहे. त्या दृष्टीने ते आकिलीझचे क्रोधकाव्य ठरते. आकिलीझची क्रोधकहाणी थोडक्यात अशी :ग्रीकांचा सरसेनापती ॲगमेनॉन याने क्रायसीइस ही एका अपोलोपूजकाची मुलगी युद्धात पळवून आणलेली असते. तिला परत करण्याची तिच्या पित्याची विनंती ॲगमेनॉन धुडकावतो. परिणामत: अपोलोच्या कोपामुळे ग्रीक सैन्यात प्लेगची साथ सुरू होते. नाइलाजाने ॲगमेनॉन क्रायसीइसला परत पाठवावयास तयार होतो. परंतु तिच्या बदली ब्रायसीइस नावाची आकिलीझकडे असलेली गुलाम स्त्री आपण ताब्यात घेणार असल्याचे उन्मत्तपणे घोषित करतो. अपमानित आकिलीझ संतापाने युद्धातून अंग काढून घेतो. या घटनेचे गंभीर परिणाम ग्रीक सैन्याला भोगावे लागतात. ट्रॉयचा राजपुत्र हेक्टर ह्याच्या नेतृत्वाखाली लढणारे ट्रोजन सैन्य ग्रीकांना नामोहरम करते.

अंतिम विजय आपलाच आहे, अशा आत्मविश्वासाने लढणाऱ्या ग्रीक सैन्याला ट्रोजनांचा वेढा पडतो. किनाऱ्याशी अडकून पडलेल्या ग्रीकांच्या नौदलावर अग्‍निवर्षाव करून ट्रोजन त्याचा नाश करू लागतात. सूडाच्या भावनेने संतप्त झालेला आकिलीझ समाधानाने हे दृश्य पाहत राहतो. आकिलीझला पुन्हा युद्धात आणण्याचे प्रयत्‍न ॲगमेनॉन करून पाहतो पण त्यास यश येत नाही. शेवटी पट्रोक्लस हा आकिलीझचा मित्र आकिलीझचे चिलखत चढवून युद्धात भाग घेण्याची अनुज्ञा त्याच्याकडून मिळवतो आणि ट्रोजनांना मागे हटवतो. तथापि लढाईच्या धुमश्चक्रीत तो हेक्टरकडून मारला जातो. मित्रवधाचा सूड घेण्यासाठी आकिलीझ युद्धात भाग घेतो आणि हेक्टरला ठार करतो. ट्रॉयचा राजा प्रायम ह्याने पुत्रशव प्राप्त होण्यासाठी बऱ्याच विनवण्या केल्यानंतरच ते त्याच्या स्वाधीन केले जाते आणि गंभीर वातावरणात हेक्टरचे दफन होते. ह्या सर्व कथाभागाचा कालावधी एकावन्न दिवसांचा आहे.

इलिअडची  गणना जगातील श्रेष्ठ अशा अभिजात महाकाव्यांत केली जाते. ग्रीक साहित्येतिहासाच्या आरंभस्थानी ⇨ ओडिसी  या महाकाव्याबरोबरच इलिअडचीही गणना होते. या महाकाव्यात युद्धवर्णने आणि वादविवादांचे चित्रण अनेकवार आले आहे. त्यांतून होमरचे युद्धशास्त्र आणि वक्तृत्वशास्त्र ह्यांचे उत्तम ज्ञान प्रत्ययास येते. होमरच्या निवेदनशैलीत कथानक शीघ्र गतीने, पण परिणामकारकपणे पुढे नेण्याची क्षमता आढळते. महाकाव्यातील व्यक्तिरेखनात तो मूलभूत अशा मानवी भावभावनांस सहृदयतेने स्पर्श करतो. ह्या अभिजात ग्रीक महाकाव्याचा आदर्श ⇨ व्हर्जिलसारख्या पुढील काळातील लॅटिन महाकवींनाही अनुकरणीय वाटला.

संदर्भ: Hutchins, Robert Maynard, Ed. The Iliad of Homer The Odyssey, Chicago, 1952.

हंबर्ट, जॉ. (इं.) ; कुलकर्णी, अ. र. (म.)