हॅन्स क्रिश्चन अँडरसन

अँडरसन, हॅन्स क्रिश्चिन : (२ एप्रिल १८०५ – ४ ऑगस्ट १८७५). आंतरराष्ट्रीय कीर्तीचा डॅनिश परीकथाकार. त्याचा जन्म फ्यूनेन बेटावरील ओदेन्से येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील चर्मकार होते. विपन्नावस्थेला कंटाळून नशीब काढण्यासाठी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षीच तो कोपनहेगन येथे आला. तेथील ‘रॉयल थिएटर’मध्ये नट, नाटककार किंवा गायक म्हणून नाव मिळविण्याची त्याची मनीषा होती तथापि त्या बाबतीत तो अपयशी ठरला. ‘रॉयल थिएटर’ मधील जोनस कोलीन या व्यक्तीने त्याच्या शिक्षणाची मात्र सोय केली. कविता, नाटके, प्रवासवर्णने असे काही लेखन त्याने चालू ठेवले होतेच पण त्या लेखनाचे स्वागत होत नव्हते. १८३५ साली प्रसिद्ध झालेली Improvisatoren (इं. भा. द इप्रॉव्हिजेटर्स, १८४५) ही त्याची कादंबरी मात्र अत्यंत यशस्वी ठरली. याच वर्षी Eventyr fortalte for Born (इं. भा. फोर फेअरी टेल्स फॉर चिल्ड्रेन) हा त्याचा पहिला परीकथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर १८७२ पर्यंत त्याने सातत्याने परीकथालेखन केले. एकूण १६८ ⇨परीकथा त्याने लिहिल्या. त्याच्या कथांचे आवाहन जसे लहानांना, तसेच थोरांनाही होते. त्या कथा देशोदेशी पोचल्या आणि १८५० च्या सुमारास तो विश्वविख्यात परीकथाकार झाला. अनेक भाषांत त्याच्या कथांची भाषांतरे झाली. स्वतःच्या हयातीतच मिळालेले हे अमाप यश पाहून त्याला त्याचे जीवन एखाद्या परीकथेसारखेच वाटू लागले. म्हणूनच स्वतःचा आयुष्यातील आठवणी Mit Lives Eventyr (१८५५, इं. शी. द फेअरी टेल ऑफ माय लाइफ) या नावानेच त्याने लिहिल्या.

आपल्या परीकथालेखनाच्या आरंभीच्या काळात त्याने बाळपणी ऐकलेल्या काही कथाच आपल्या शैलीत पुन्हा लिहून काढल्या. ‘द टिंडर बॉक्स’, ‘द ट्रॅव्हलिंग कंपॅनिअन’, ‘द वाइल्ड स्वान्स’ यांसारख्या कथांचा त्यांत समावेश होतो. काही परदेशी कथांचाही त्याने उपयोग करून घेतला. ‘द एंपरर्स न्यू क्लोद्स’ ही कथा याचे उत्तम उदाहरण आहे. ही कथा मूळची स्पॅनिश परंतु आपल्या नवनिर्माणक्षम प्रतिभेने अँडरसनने तिला एक आगळेच रूप दिले. हळूहळू त्याने स्वतंत्र कथा-निर्मिती सुरू केली. या कथांतच त्याच्या प्रतिभेची खरी ओळख पटते.

त्याच्या कथांत पशू, पक्षी, झाडे, फुले आणि अनेक अचेतन वस्तू बोलक्या होतात. त्यांतील कल्पनारम्य जग बालवाचाकंच्या मनांची पकड घेते तर त्यांतून उलगडत जाणारे मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान प्रौढांना आकर्षित करते. ‘द लिट्ल इडाज फ्लॉवर’ या कथेत स्वप्नात रंगून गेलेल्या एका बालकाच्या कल्पनाशक्तीचे दर्शन तो विलक्षण कौशल्याने घडवितो. ‘थंबेलिना’, ‘द लिट्ल मरमेड’, ‘द स्टोरी ऑफ अ मदर’ या हृदयस्पर्शी कथांतून स्त्रीहृदयाचे हळुवारपणे केलेले विश्लेषण आढळते. पुरुष-स्वभावाचे चित्रण ‘द स्टेडफास्ट टिन सोल्जर’, ‘द फर ट्री’ अशांसारख्या कथांतून दिसते. ‘द कॉलर’सारख्या काही कथा मनुष्यस्वभावातील दोषांवर प्रकाश टाकतात. अँडरसनच्या परीकथांचे जग हे जगातील वास्तवतेचेच प्रतीक होय. तो एक जादूचा आरसा आहे त्यात लहान थोरांना आपल्या प्रतिमा दिसतात.

वर उल्लेखिलेल्या Improvisatoren या कादंबरीखेरीज Kun en spillemand (१८३७, इं. भा. ओन्ली अ फिडलर, १८४५), De to Baronesser (१८४८, इं. भा. द टू बॅरनिसिस, १८४८) अशा काही कादंबऱ्या त्याने लिहिल्या तथापि त्याचे कादंबरीलेखन विशेष महत्त्वाचे नाही. कवी आणि नाटककार म्हणून तर तो पूर्णपणे अपयशी ठरला.

त्याने लिहिलेली प्रवासवर्णने मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत. प्रवासाविषयी त्याला नेहमीच उत्साह वाटे. स्वीडन, स्पेन, पोर्तुगाल इ. देश त्याने पाहिले होते. प्रवासात त्याने जे पाहिले ते वाचकांसमोर आपल्या जिवंत शैलीने उभे केले. En Digters Bazar (१८४२, इं. भा. अ पोएट्स बझार, १८४६) I Sverring (१८५१, इं. भा.पिक्चर्स ऑफ स्वीडन, १८५२) इ. प्रवासवर्णनपर पुस्तके याची उत्तम साक्ष देतात. कोपनहेगन येथे तो मरण पावला.

संदर्भ : 1. Burnett, C. B. The Shoemaker’s Son-The Life of Hans Christian Andersen, New York, 1943.

2. Toksvig, Signe, The Life of Hans Christian Andersen, London, 1933.

यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.) कुलकर्णी, अ. र.(म.)