जोव्हान्नी व्हेर्गाव्हेर्गा, जोव्हान्नी : (२ सप्टेंबर १८४०–२७ जानेवारी १९२२). इटालियन कथा-कादंबरीकार आणि नाटककार. जन्म सिसिलीतील कातानिआ येथे एका जमीनदार कुटुंबात. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच व्हेर्गाने काही कादंबऱ्या लिहिल्या होत्या तथापि परिणामकारक वाङ्‌मयीन वातावरणाचे संस्कार आपल्यावर व्हावेत, म्हणून तो फ्लॉरेन्सला पाच वर्षे राहिला (१८६५ – ७०). तेथे त्याने Storia di una capinera  (इं. शी. स्टोरी ऑफ लिनेट) ही आजही लोकप्रिय असलेली कादंबरिका लिहिली. १८७० ते १८८५ या कालवधीत तो मिलान येथे याहिला. Eva आणि Tigre reale  (इं. शी. रॉयल टायग्रेस) ह्या त्याच्या दोन्ही कादंबऱ्या ह्याच कालखंडातल्या (१८७३). तथापि श्रेष्ठ कथा-कादंबरीकार म्हणून इटालियन साहित्यात त्याची प्रतिमा प्रस्थापित झाली, ती Vita dei campi (कथासंग्रह – १८८०, इं. शी. लाइफ इन द फील्डस्),  Novelle rusticane  (कथासंग्रह – १८८३, इं. भा. लिट्‌ल नॉव्हेल्स ऑफ सिसिली, १९२५), I Malavoglia (कादंबरी – १८८१, इं. भा. द हाउस बाय द मेड्‌लर ट्री, १९५०) आणि Mastro Don Gesualdo (कादंबरी – १८८९) ह्या त्याच्या साहित्यकृतींमुळे! व्हेर्गाच्या सिसिलियन कथांनी एक नवा वास्तववादी प्रवाह इटालियन साहित्यात आणला. सिसिलियन शेतकरी आणि कोळी ह्यांच्या जीवनाभोवती ह्या कथा गुंफण्यात आल्या आहेत. त्यांची साधीसुधी बोली भाषा, अभिव्यक्तीच्या नेमकेपणावर भर देणारा मितव्यय आणि त्याला अनुरूप अशी कथेची संरचना, ही ह्या कथांची काही लक्षणीय वैशिष्ट्ये. कथानिवेदनाच्या ओघातील लेखकाचे भाष्य व्हेर्गाने कटाक्षाने टाळलेले आहे. त्याच्या व्यक्तिरेखा थेट वाचकांसमोर येतात आणि कथेत सहजपणे वावरू लागतात. व्हेर्गाला त्याच्या विविध व्यक्तिरेखांविषयी वाटणारी आस्था आणि अनुकंपा त्याच्या कथा-कादंबऱ्याच्या अंत:सुरातून मात्र वाचकाच्या हृदयापर्यंत पोहोचते. Cavalleria rusticana (१८८४) ही त्याची नाट्यकृती होय.

कातानिआ येथे तो निधन पावला.      

                   

कुलकर्णी, अ. र.