एऊजेन्यो मोंतोलेमोंतोले, एऊजेन्यो : (१२ ऑक्टोबर १८९६–१२ सप्टेंबर १९८१). इटालियन कवी. जेनोआ शहरी जन्मला. जेनोआ येथेच त्याने शालेय शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धात एक लष्करी अधिकारी म्हणून त्याने काम केले. ह्या युद्धानंतर तो साहित्यनिर्मितीकडे वळला. १९२२ मध्ये त्याने एक वाङ्‌मयीन पत्रिका (जर्नल) काढली होती परंतु वर्षभरातच ती बंद पडली. १९२९–३८ ह्या कालखंडात फ्लॉरेन्समधील एका ग्रंथालयाचा तो प्रमुख ग्रंथपाल होता. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात तो मिलान येथे राहावयास गेला. १९४८ मध्ये इटलीतील एका प्रसिद्ध वृतपत्राच्या (Corriere della sera) संपादकवर्गात त्याला स्थान देण्यात आले आणि तेथे त्याने संगीतसमीक्षापर लेखन लेखन केले (मोंतालेने संगीताचे शिक्षण घेतले होते).

‘कटल्‌फिश बोन्स’ (१९२५, इं. शी.) हा मोंतालेचा पहिला काव्यसंग्रह. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडातील कडवट निराशा त्यातील कवितांतून प्रत्ययास येते. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या त्याच्या काव्यसंग्रहांत (सर्व इं. शी.) –‘द हाउस ऑफ द कस्टम्स ऑफिसर अँड अदर पोएम्स’ (१९३२), ‘द ऑकेजन्स’ (१९३९), ‘द स्टॉर्म अँड अदर पोएट्री’ (१९५६), ‘द ऑफेंडर’ (१९६६) ह्यांचा समावेश होतो.

इटलीतील फॅसिस्ट राजवटीच्या काळात एर्मेतिझ्मो (हेर्मेटिझम) नावाचा जो काव्यसंप्रदाय निर्माण झाला होता, त्यातील मोंताले हा एक प्रमुख कवी होय. कवीच्या आशयाची नेमकी अभिव्यक्ती करू शकतील, असेच शब्द कवितेसाठी निवडणे आणि कवीला अभिप्रेत असलेल्या अर्थाहून वेगळ्या अशा अर्थच्छटांपासून त्यांना वेगळे करणे ही ह्या कवितेची प्रमुख प्रक्रिया असल्यामुळे ह्या संप्रदायाला एर्मेतिझ्मो हे नाव प्राप्त झाले आहे (एखादी वस्तू हवाबंद ठेवण्यासाठी जे सील केले जाते, त्याला हेर्मेटिक सील असे म्हणतात. त्यावरून हे नाव). एर्मेतिझ्मो ह्या संप्रदायातील कवींचा प्रयत्न आपला आशय एक प्रकारे बंदिस्त ठेवण्याचा होता. मानवाची स्थिती हा मोंतालेच्या कवितेचा मुख्य विषय होय. तिचे चित्र उभे करताना तो कठोर वास्तववादी होतो.

मोंतालेने शेक्सपिअर, टी.एस्. एलियट, हॉपकिन्झ, हर्मन मेल्‌व्हिल ह्यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा इटालियन भाषेत अनुवादही केला आहे. मोंतालेची कविता इंग्रजीत अनुवादिली गेली आहे.

इटलीत फॅसिझमचा उदोउदो चालू असता मोंताले मात्र त्याचा विरोधकच राहिला. त्याचे काही प्रतिकूल परिणामही त्याला भोगावे लागले. १९७५ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. 

कुलकर्णी अ. र.