पीत्रार्क

पीत्रार्क : (२० जुलै १३०४ – १८ किंवा १९ जुलै १३७४). पश्चिमी प्रबोधनकाळातील विख्यात इटालियन कवी आणि विद्वान. तो आरेत्सो येथे जन्मला. त्याचे घराणे मूळचे फ्लॉरेन्सचे असले, तरी काही राजकीय कारणांमुळे पीत्रार्कच्या वडिलांना फ्लॉरेन्स सोडून जावे लागले होते (१३०२). पीत्रार्कच्या जन्मानंतर त्याचे वडील आपल्या कुटुंबीयांसह द. फ्रान्समधील ॲव्हीन्यों येथे आले. ॲव्हीन्योंजवळील कार्पेत्रास येथे आरंभीचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांच्या इच्छेनुसार पीत्रार्क माँटपील्यर येथे कायद्याच्या अभ्यासासाठी आला तथापि १३२० मध्ये तो बोलोन्या विद्यापीठात दाखल झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर (१३२६) पीत्रार्कने कायद्याचे अध्ययन सोडून दिले व तो ॲव्हीन्यों येथे परतला. माँटपील्यर येथे असताना पीत्रार्कच्या कविमनावर त्रूबदूरांच्या कवितेचा प्रभाव पडला बोलोन्या येथील वातावरणही काव्यनिर्मितीला पोषकच होते. कायद्याचा अभ्यास करीत असताना व्हर्जिल, सिसेरो ह्यांसारख्यांच्या अभिजात साहित्यकृतींचे साक्षेपी वाचन त्याने केले होते. ॲव्हीन्यों येथे आल्यानंतर काव्यनिर्मिती आणि विद्याव्यासंग ह्यांत तो रमला. धर्मोपदेशकांच्या कनिष्ठ श्रेणीतील एक पद त्याने मिळविल्यामुळे तो आर्थिक दृष्ट्याही निश्चिंत झाला. १३२७ मध्ये एक सुंदर स्त्री त्याच्या पाहण्यात आली आणि तो तिच्या प्रेमात पडला. ही स्त्री विवाहित होती आणि पीत्रार्कचे तिच्यावरील प्रेम एकांगीच राहिले. तथापि ‘लॉरा’ ह्या नावाने ती पीत्रार्कच्या काव्यात चिरस्थायी झालेली आहे. ह्या स्त्रीचे मूळचे नाव लॉर द नॉव्ह असे असल्याचे सांगतात. १३३३ पासून पीत्रार्कने फ्रान्स, ब्राबांट, फ्लँडर्स, ऱ्हाईन लँड आदी ठिकाणी प्रवास करून दुर्मिळ किंवा अनुपलब्ध अशा अभिजात साहित्यकृतींच्या (मुख्यत: लॅटिन) हस्तलिखितांचा शोध घेतला. १३३७ मध्ये त्याने रोमला पहिली भेट दिली. एका भव्य सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून त्याने रोमकडे पाहिले. १३४१ मध्ये रोमकडून कविसम्राट म्हणवून घेण्याचा योग त्याला आला. हा सन्मान स्वीकारून ॲव्हीन्यों येथे परतल्यानंतर एका गंभीर मानसिक संघर्षातून त्याला जावे लागले. आपली धर्मश्रध्दा अपुरी आहे ऐहिक सुखांवर मात करण्याची क्षमता आपल्यात नाही लॉरासंबंधीचे आपले प्रेम उदात्त असले, तरी तो एक प्रमादच आहे अशा जाणिवेने तो व्यथित झाला. ह्याच सुमारास घेरार्दो ह्या त्याच्या भावाने घेतलेल्या संन्यासामुळे ही जाणीव तीव्रतर झाली. त्यातच काही जिवलग मित्रांच्या मृत्यूमुळे त्यास एकाकी वाटू लागले. त्याच्या ह्या मनःस्थितीचे प्रतिबिंब Secretum meum ह्या त्याच्या आत्मचरित्रात्मक ग्रंथात पडलेले आहे. ह्या मानसिक संघर्षातून त्याने काढलेला निष्कर्ष मात्र यूरोपातील मानवतावादी चळवळीमागील भूमिकेच्या एका महत्त्वपूर्ण अंगावर प्रकाश टाकणारा आहे. ह्या जगाच्या  तसेच स्वतःच्या विविध ऐहिक व्यवहारांत गुंतलेल्या प्रमादशील माणसालासुध्दा ईश्वराकडे जाणे शक्य आहे, हा तो निष्कर्ष.

रोम ही राजधानी असलेला अखंड इटली हे पीत्रार्कचे एक स्वप्न होते. १३४७ मध्ये रोमचा सत्ताधीश झालेल्या कॉला द ऱ्येंत्सी ह्या अखंड इटलीवादी लोकनेत्याला त्याने त्यासाठीच पाठिंबा दिला परंतु ह्या सत्ताधिशाची कारकीर्द अल्पजीवी ठरली. त्याला दिलेल्या पाठिंब्यामुळे पीत्रार्कचे आणि पोपचे संबंध बिघडले. १३४८ मध्ये लॉराचा मृत्यू झाला जीवनाची क्षणभंगुरता त्याला ह्या वेळी विशेषत्वाने जाणवली. १३५० मध्ये तो पूर्णतः विरक्त झाला. पीत्रार्कने फ्लॉरेन्स विद्यापीठात शिकविण्यासाठी यावे, अशी श्रेष्ठ इटालियन साहित्यिक बोकाचीओ ह्याची इच्छा होती परंतु पीत्रार्ककडून ती पुरी झाली नाही. १३५२ नंतर ॲव्हीन्यों  सोडून तो इटलीत आला आणि मिलान, व्हेनिस, पॅड्युआ येथे राहिला. पॅड्युआ येथील त्याच्या आश्रयदात्याने त्या शहराजवळील आर्का येथे त्याला काही जमीन दिली. तेथे बांधलेल्या घरातच पीत्रार्कची अखेरची वर्षे गेली.

पीत्रार्कची आरंभीची काव्यरचना लॅटिन आहे. आपल्या आईच्या निधनानंतर Epistolae metricae (१३१८ किंवा १३१९) ह्या नावाने त्याने लिहिलेल्या कविता त्याच्या आज उपलब्ध असलेल्या अगदी आरंभीच्या कवितांपैकी होत. Africa हे दुसऱ्या प्यूनिक युध्दावर लिहिलेले महाकाव्य. हेही लॅटिनमध्येच आहे. सिपिओ ॲफ्रिकॅनस हा ह्या महाकाव्याचा नायक. व्हर्जिलच्या ईनिडसारखे श्रेष्ठ महाकाव्य निर्मिण्याच्या महत्त्वाकांक्षेने पीत्रार्कने हे महाकाव्य १३३८ च्या सुमारास लिहिण्यास घेतले, असे म्हणतात. ते तो पूर्ण मात्र करू शकला नाही. Rime आणि Trionfi ही त्याची इटालियन भाषेतील काव्यरचना होय. लॉराला उद्देशून रचलेल्या कविता Rime मध्ये अंतर्भूत असून त्यांचे दोन विभाग करण्यात आले आहेत. पहिल्यात लॉरा हयात असताना रचिलेल्या कविता असून दुसऱ्यात तिच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या कवितांचा समावेश आहे. पीत्रार्कच्या ह्या भावकवितांतून त्याच्या भावजीवनाचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा एक आलेखच आपणास गवसतो. लॉराबद्दल वाटणाऱ्या प्रेमाचे ऐहिक स्वरूप, त्यात हळूहळू येत गेलेली विशुध्दता आणि लॉराच्या निधनानंतर ईश्वरसन्मुख झालेले मन हे सारे ह्या भावकवितांनी उत्कटपणे व्यक्तविले आहे. पीत्रार्कपूर्वीच्या भावकवितेच्या परंपरेतील जे जे सुंदर, ते सारे त्याच्या कवितेत आळून आले असून अभिजाततावादी दृष्टीचे एक नवे परिमाणही तिला प्राप्त झाले आहे. आपल्या साऱ्याच कृतींवर पुन:पुन्हा संस्कार करण्याची पीत्रार्कची पध्दत होती परंतु ह्या कविता तो हयातभर संस्कारीत राहिला. ह्या कवितांत सुनीतांचे प्रमाण सर्वाधिक आहे. अत्यंत रेखीव घाटाच्या ह्या रचनेने सुनीतरचनेतील पूर्णत्वाची एक नवीच पातळी गाठली एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला. पीत्रार्कीय सुनीतातील एकूण चौदा ओळींचे दोन भाग – पहिला आठ ओळींचा (ऑक‌्टेव्ह) तर दुसरा सहा ओळींचा (सेस्टेट) – केले जातात. पहिल्या भागात भावविषय आणि त्याने निर्मिलेला एखादा प्रश्न वा संदेह व्यक्तविला जातो दुसऱ्यात त्याचे निराकरण केले जाते. ऑक्‌टेव्ह आणि सेस्टेट यांचे अनुक्रमे चार-चार आणि तीन-तीन ओळींचे दोन भाग केल्याचेही अनेकदा दिसते. पीत्रार्कच्या सुनीतरचनेचे अनुकरण इटलीत आणि इटलीबाहेरही फार मोठ्या प्रमाणावर झालेले आहे [→ सुनीत]. Trionfi मध्ये पार्थिव वासनेकडून ईश्वराप्रत क्रमशः होणारा प्रवास सशब्द केलेला आहे.

पीत्रार्कच्या लॅटिन गद्यलेखनात उपर्युक्त  Secretum meum व्यतिरिक्त  De viris illustribus (१३३८-३९–विविध विख्यात व्यक्तींची चरित्रे), De vita solitaria (१३४६ – एकांतमय जीवनाचा आनंद) अशा काही ग्रंथांचा समावेश होतो.

अस्ताला जाणारे मध्ययुग आणि नवे प्रबोधन ह्यांच्या सीमारेषेवर असलेला पीत्रार्क हा ‘पहिला आधुनिक मानव’ म्हणून अनेकदा ओळखला जातो.

संदर्भ : 1. Bishop, Morris Petrarch and His World, London, 1964.

     2. Campbell, T. Life and Times of Petrarch, London. 1843.

     3. Cayley, C. B. The Sonnets and Stanzas of Petrarch, London, 1879.

     4. Foscolo, Ugo, Essays on Petrarch, London, 1823.

     5. Phelps, Ruth S. The Earlier and Later Forms of Petrarch’s Canzoniere, Chicago, 1925.

     6. Robinson, J. H. Rolfed, H. W. Petrarch The First Modern Scholar and Man of Letters, New York, 1974.

     7. Whitfield, J. H. Petrarch and the Renascence, 1943.

     8. Wilkins, E. H. The Making of the Canzoniere and other Petrarchan studies, Rome, 1951.

कुलकर्णी, अ. र.