पोलित्स्यानो, आंजेलो : (१४ जुलै १४५४–२८ किंवा २९ सप्टेंबर १४९४). प्रबोधनकालीन इटालियन कवी आणि विद्वान. मूळ नाव आंजेलो आंब्रोजीनी. तस्कनीतील माँतेपूलचानॉ किंवा मॉन्स पोलिशिआनस ह्या त्या जन्मस्थळावरून पोलित्स्यानो हे त्याचे नाव आलेले आहे (पोलिशिएनस आंजेलस हे त्या नावाचे लॅटिन रूप). पोलित्स्यानो दहा वर्षांचा असतानाच त्याच्या वडिलांचा खून झाला. विपन्नावस्थेत शिक्षणासाठी तो फ्लॉरेन्सला आला. तेथे थोर, व्यासंगी अध्यापकांच्या मार्गदर्शनाने त्याने ग्रीक आणि लॅटिन ह्या भाषांवर प्रभुत्व मिळविले. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच तो त्या भाषांतून तसेच इटालियन ह्या आपल्या मातृभाषेतून काव्यरचना करू लागला ग्रीक महाकवी होमर ह्याच्या इलिअड ह्या महाकाव्याचा लॅटिन पद्यानुवादही त्याने करावयास सुरुवात केली. पहिल्या दोन सर्गांचा अनुवाद त्याने फ्लॉरेन्सचा सत्ताधीश लोरेन्झो दे मेदीची ह्याला अर्पण केला. फ्लॉरेन्स हे इटालियन प्रबोधनाचे एक महत्त्वाचे केंद्र होते आणि लोरेन्झो हा विद्याकलांचा मोठा चाहता होता. पोलित्स्यानोला त्याने केवळ आश्रयच दिला नाही, तर त्याला आपला मित्र मानले प्येअरो आणि जोव्हान्नी ह्या आपल्या दोन पुत्रांचा शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली वेळोवेळी काही राजनैतिक जबाबदाऱ्याही त्याच्यावर सोपविल्या. तथापि १४७९ मध्ये पोलित्स्यानोचे लोरेन्झो कुटुंबाशी असलेले संबंध बिघडले. त्यानंतर वर्षभर पोलित्स्यानोने उत्तर इटलीत भ्रमंती केली. मँट्युआ येथे कार्डिनल गोनद्झागा ह्याचा आश्रय त्याला लाभला. तथापि १४८० मध्ये त्याच्या लोरेन्झोशी समझोता झाला आणि फ्लॉरेन्स विद्यापीठातील ग्रीक-लॅटिन साहित्यांच्या अध्यासनी त्याची नेमणूक करण्यात आली. १४८६ मध्ये फ्लॉरेन्सच्या कॅथीड्रलचा कॅनन म्हणूनही त्याची नियुक्ती झाली. आपले उर्वरित आयुष्य मुख्यत:

फ्लॉरेन्स विद्यापीठाच्या सेवेत त्याने घालविले. लॉरेन्स येथेच तो निवर्तला.

पोलित्स्यानोच्या ग्रीक-लॅटिन कवितेत सुभाषितात्मक/चतुरोक्तिपर लघुकाव्ये (एपिग्रॅम्स) सर्वाधिक आहेत. छंदांवरील प्रभुत्व, वेचक शब्दकळा व ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यसृष्टीतील मार्मिक संदर्भ ही त्याच्या ह्या काव्यलेखनाही वैशिष्ट्ये होत. लॅटिनमध्ये त्याने काही विलापिका आणि उद्देशिका लिहिल्या. लोरेन्झोच्या निधनानंतर पोलित्स्यानोने त्या प्रसंगावर लिहिलेली उद्देशिका प्रसिद्ध आहे. त्याने इटालियन भाषेत लिहिलेल्या भावगीतांतून त्याच्यातील उत्कट भावकवीला वाव मिळाला. ह्या गीतांत सु. तीस नृत्यगीतांचा समावेश आहे. स्त्रांबोतो आणि बाल्लाता ह्यांसारखे साधेसुधे गीतप्रकारच पोलित्स्यानोने कलात्मकपणे हाताळले. पोलित्स्यानोच्या इटालियन काव्यरचनेत ‘स्टँझाज फॉर द टूर्नामेंट’ ह्या इंग्रजी शीर्षकार्थाचे काव्य विशेष उल्लेखनीय आहे. लोरेन्झोचा भाऊ ज्यूल्यानो मेदीची ह्याच्या गौरवार्थ लिहावयास घेतलेले हे काव्य पोलित्स्यानोकडून अपूर्ण राहिलेले आहे. ग्रीक-लॅटिन अभिजात साहित्यांच्या संस्कारांनी ही कविता संपन्न झालेली असली, तरी तिचा गाभा इटालियन आहे. पोलित्स्यानोच्या श्रेष्ठ रचनांत तिचा अंतर्भाव होतो. मँट्युआ येथे कार्डिनल गोनद्झागा ह्याच्या आश्रयास असताना पोलित्स्यानोने ऑर्फिअस आणि यूरिडायसी ह्यांच्या कथेवर आधारलेली ऑर्फिओ ही नाट्यकृती लिहिली. इटालियन भाषेतील, लौकिक स्वरूपाची अशी ही पहिली नाट्यकृती होय. फ्लॉरेन्स विद्यापीठात आपल्या अध्यासनावरून त्याने लॅटिनमध्ये दिलेली चार अभिभाषणे (१४८२, १४८३, १४८५ आणि १४८६ ह्या वर्षी) महत्त्वपूर्ण ठरली. हीसिअड, होमर आणि व्हर्जिल ह्या ग्रीक-लॅटिन कवींची काव्ये, व काव्येतिहास हे ह्या व्याख्यानांतील विषय होते. काव्येतिहास सांगताना आरंभीच कवितेचे दैवी स्वरूप आणि आदिम जगावर सुसंस्कार करण्याचे तिचे सामर्थ्य पोलित्स्यानोने कल्पकतेने वर्णिले आहे. नंतर श्रेष्ठ अशा ग्रीक-लॅटिन कवींच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. दान्ते, पीत्रार्क, बोकाचीओ आणि काव्हालकांती ह्या इटालियन कवींचाही त्याने निर्देश केला आहे. ही सारी व्याख्याने पद्यबद्ध आहेत. अभिजात साहित्यपरंपरेला पुढील पिढ्यांतील साहित्यिकांनी स्वतंत्र दृष्टिकोणाची जोड देऊन तिचा विकास-विस्तार करावा, अशी पोलित्स्यानोची भूमिका होती. अभिजात साहित्यकृतींतील संदिग्ध उताऱ्यांचा अर्थ लावण्याचा तसेच त्यांतील पाठचिकित्सेचा प्रयत्न त्याने Miscellanea ह्या नावाने लिहिलेल्या शंभर टिपणांतून केला. त्याची भाषाशास्त्रीय दृष्टीही ह्या टिपणांतून स्पष्ट होते. एपिक्‌टीटस, हिरोडिअन अशा काही अभिजात साहित्यिकांच्या कृतींचे त्याने इटालियनमध्ये अनुवादही केले.

कुलकर्णी, अ. र.