मांझोनी, आलेस्सांद्रो : (७ मार्च १७८५–२२ मे १८७३). श्रेष्ठ इटालियन कवी आणि कादंबरीकार. जन्म मिलान शहरी. तो लहान असतानाच त्याचे आईवडील विभक्त झाले (१७९२). मिलान आणि पावेसे येथील धार्मिक शिक्षणसंस्थांत तो शिकला. पुढे पॅरिसमध्ये राहत असलेल्या आपल्या आईकडे तो रहावयास गेला. तेथील वास्तव्यात (१८०५–१०) व्हॉल्तेअरसारख्या थोर यूरोपीय विचारवंतांचा प्रभाव त्याच्यावर पडला आणि धर्माच्या संदर्भात तो उदासीन बनला. तथापि मिलानला परतल्यानंतर त्याच्यात पुन्हा परिवर्तन घडून आले आणि त्याची ख्रिस्ती धर्मश्रद्धा ठाम आणि उत्कट बनली रोमन कॅथलिक पंथाचा निष्ठावंत अनुयायी म्हणून त्याने आपले उर्वरित आयुष्य वेचले. परिवर्तनोत्तर काळात त्याने लिहिलेली पाच धार्मिक स्तोत्रे उल्लेखनीय आहेत. ‘द रेसरेक्शन’, ‘द नेम ऑफ मेरी’, ‘क्रिस्मस’, ‘द पॅशन’ आणि ‘द पेंटिकॉस्ट’ ही त्यांची नावे (सर्व इं. शी.) ही स्तोत्रे त्रे द सेक्रिड हिम्‌स ह्या नावाने इंग्रजीत अनुवादिली गेली आहेत (१९०४).

आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीचा आरंभ मांझोनीने कवी म्हणून केला. त्याच्या अगदी आरंभीच्या कविता नव-अभिजाततावादी वळणाच्या आहेत. तथापि फ्रान्समधून परतल्यानंतरच्या त्याच्या कवितेवर स्वच्छंदतावादाचा प्रभाव दिसून येतो. Il Conte di Carmagnola (१८२०) आणिAdelchi(१८२२) ह्या त्याने लिहिलेल्या नाट्यकृतींत त्याची काही उत्कृष्ट भावकविता अंतर्भूत आहे. नेपोलियनच्या निधनावर मांझोनीने लिहिलेली उद्देशिकाही – ‘द फिफ्थ ऑफ मे’ (इं. शी.)- निर्देशनीय होय.

आज मांझोनीची कीर्ती I Promessi Sposi (१८२७, इं. भा. द बिट्रोद्ड, १९५१) ह्या त्याच्या ऐतिहासिक कादंबरीवर मुख्यतः अधिष्ठित आहे. सतराव्या शतकात स्पॅनिश वर्चस्वाखाली इटालियनांना भोगाव्या लागलेल्या व्यथा-वेदनांचे प्रत्ययकारी चित्रण ह्या कादंबरीत मांझोनीने केले आहे. इटालियन साहित्यातील एक श्रेष्ठ कृती म्हणून तर ह्या कादंबरीला मान्यता मिळालीच परंतु एकूण यूरोपीय साहित्यातही तिला मानाचे स्थान मिळाले. अनेक भाषांत ह्या कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. इटालियन भाषेच्या तस्कन बोलीला राष्ट्रीय भाषेचे स्थान मिळावे, ही मांझोनीची उत्कट इच्छा होती. त्या दृष्टीने उपर्युक्त I Promessi Sposi ही कादंबरी त्याने तस्कन बोलीत, पुन्हा लिहून काढली. ही पुनर्लिखित कादंबरी १८४२ मध्ये प्रसिद्ध झाली. विशुद्ध तस्कन गद्यशैलीचा आदर्श ह्या कादंबरीने निर्माण केला. ह्या शैलीचा प्रभाव अनेक इटालियन साहित्यिकांवर पडला. मांझोनीला इटलीबद्दल वाटणारे प्रेम, गोरगरिबांबद्दल वाटणारी आस्था, त्याची ख्रिस्ती धर्मश्रद्धा ह्यांचे प्रत्ययकारी दर्शन ह्या कादंबरीतून घडते.

त्याला १८६० मध्ये इटलीच्या सेनेटचा सदस्य करण्यात आले होते. मिलान येथेच तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.