पारिनी,जुझेप्पे : ( २२ किंवा २३ मे १७२९ -१५ ऑगस्ट १७९९). इटालियन कवी. जन्म बोसीसीओ ह्या गावी. शिक्षण मिलानला बार्नबाइट पंथाच्या शिक्षणसंस्थेत झाले. (१७४० – ५२ ). १७५२ मध्ये त्याच्या कवितांचा बोलबाला मिलानच्या वाङमयीन वर्तुळांत झालेला होता. १७५४ मध्ये धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतल्यानंतर ड्युक गाब्रिओ सेर्बेल्लोनी ह्याच्या घरात तो शिक्षक म्हणून काम करू लागला. तेथे तो आठ वर्षे होता. त्या निमित्ताने इटलीतील उमरावी जीवन त्याला अगदी जवळून निरखता आले. ड्यूकच्या घरात पारीनीला मिळणारी वागणूकही फारशी चांगली नवती. तथापि ह्या काळात त्याने उत्तम काव्यलेखन केले. त्यात काही सुंदर उद्देशिकांचा समावेश होता. ll Giorno (इं. शी. द डे ) ह्या आपल्या सर्वश्रेष्ठ दीर्घकाव्याची रचना त्याने ह्याच काळात सुरू केली. १७६२ मध्ये ड्यूकच्या नोकरीतून तो मुक्त झाला. त्यानंतर मिलानमधील एक ऑस्ट्रियन मंत्री काउंट फर्मिआन ह्याच्या आश्रयाने Gazzetaa di Milano ह्या नियतकालिकाचे त्याने संपादन केले. मिलान येथे वक्तृत्व शास्त्राचा प्राध्यापक म्हणूनही त्याने काम केले ( १७६९ – ९९). १७९६ मध्ये नेपोलियनने ऑस्ट्रियनांना इटलीतून हुसकावून लावून इटलीवर फ्रांसचे वर्चस्व प्रस्थापित केले. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व श्रीमंत, उमराव वर्गांतील मंडळींबद्दल मनात अढी असलेल्या पारीनीने मिलानमध्ये घुसणाऱ्या फ्रेंच फौजांना मुक्तिदूत मानले. त्यानंतर तो मिलानच्या नगरपरिषदेचा ( टाऊन कौन्सिल )सदस्य होता परंतु फ्रेंचांबद्दल त्याचा लवकरच भ्रमनिरास झाला आणि नगरपरीषेदेतून त्याला दूर व्हावे लागले (१७९९). मिलान येथे तो निधन पावला. उपर्युक्त ll Giorno ह्या दिर्घकाव्यावर पारीनीची कीर्ती मुख्यत्वेकरून अधिष्ठित आहे. चार भागांच्या ह्या उपरोधप्रचुर काव्यात एका तरुण उमरावाच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन केलेले आहे. उमराव वर्गातील मंडळींचे पोकळ, भ्रष्ट जीवन ह्या काव्यातून परखडपणे उघड करण्याचा पारीनीचा हेतून होता तसेच गरीब आणी श्रीमंत ह्यांच्यातील विषमताही त्याला दाखवून द्यावयाची होती. पारीनीची शैली साधी पण प्रभावी आणि डौलदार अशी आहे. इटालियन साहित्यातील श्रेष्ठ दीर्घकाव्यांत ह्या काव्याची गणना होते. ह्या काव्याचे पहिले दोन भाग अनुक्रमे १७६३ आणि १७६५ मध्ये प्रसिद्ध झाले, तर नंतरचे दोन १८०१ मध्ये प्रकाशित झाले. पारीनीच्या काव्यातील प्रभावी उपरोध लक्षात घेऊन त्याला ‘ इटलीचा अलेक्झांडर पोप ‘ असेही म्हटले जाते.

              

कुलकर्णी, अ. र.