लेओपार्दी, जाकोमो : (२९ जून १७९८-१४ जून १८३७). थोर इटालियन कवी आणि विद्वान. जन्म रेकानाती येथे एका उमराव घराण्यात. त्याचे वडील अव्यवहारी व दुबळ्या स्वभावाचे होते. आईची वृत्ती वर्चस्व गाजविण्याची होती. लेओपार्दींची बौद्धिक क्षमता फार मोठी होती आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या ज्ञानसाधनेस सतत उत्तेजन दिले. त्यांच्या उत्कृष्ट ग्रंथालयाचा लाभ लेओपार्दीला घेता आला. परिणामतः वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षीच तो थोर विद्याव्यासंगी बनला. ग्रीक-लॅटिन ग्रंथांचा त्याने कसोशीने अभ्यास केला होता. त्या भाषांतील अनेक अभिजात ग्रंथांचे इटालियन अनुवाद त्याने वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत करून टाकले होते. अनेक विद्वत्ताप्रचुर भाष्येही त्याने लिहिली होती. ह्याच कालखंडात त्याने काही इटालियन काव्यरचनाही केली. तथापि अविरत अध्ययनामुळे त्याची प्रकृती खालावली व दृष्टीही क्षीण झाली. पाठीच्या कण्याशी संबंधित अशी एक शारिरीक विकृतीही त्याच्यात निर्माण झाली. एक प्रकारच्या मानसिक विषण्णतेनेही त्याला ग्रासले आणि उर्वरित आयुष्यात ती त्याचा पाठपुरावा करीत राहिली. खालावलेल्या प्रकृतीमुळे आपल्या अध्ययनाचा वेळही त्याला बराच कमी करावा लागला आणि आत्मभिव्यक्तीसाठी कवितेकडे तो अधिकाअधिक वळत चालला.

प्रेमात आलेले अपयश आणि अन्य दुःखद अनुभव ह्यांमुळे १८१७ व १८१८ ह्या दोन वर्षांत मोठ्या मानसिक यातनांतून त्याला जावे लागले. रेकानातीमधील जीवन त्याला असह्य होत चालले होते. १८२२-२३ मध्ये त्याने रोमला भेट दिली, पण तेथेही न रमल्याने तो आपल्या गावी परतला. १८२५ मध्ये सिसरोच्या ग्रंथांचे संपादन करण्याचे काम स्वीकारून तो मिलानला गेला. पुढे बोलोन्या, फ्लॉरेन्स, पीसा या स्थळांनाही त्याने भेटी दिल्या. १८३३ मध्ये तो नेपल्समध्ये स्थायिक झाला. तेथेच त्याचे निधन झाले.

रेकानातीसारख्या गावी, इटलीतील सांस्कृतिक जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असूनही लेओपार्दीने जी कविता लिहिली, ती एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ व मौलिक अशा इटालियन कवितेत अंतर्भूत केली जाते. इतकेच नव्हे तर स्फूर्ती, प्रेरणा आणि आदर्श ह्यांसाठी विसाव्या शतकातील इटालियन कवीही लेओपार्दीकडे वळलेले दिसतात. त्याच्या कवितेतून आधुनिकतेचा प्रत्यय तर येतोच पण वाड़्मयीन व्यासंगामुळे कवितेतील भावगेयता हरवून जाण्याऐवजी ती अधिक उत्कटही कशी होऊ शकते, ह्याचीही प्रचीती येते. त्याने लिहिलेली कविता विपुल म्हणता येण्यासारखी नाही. Canzoni हा त्याचा काव्यसंग्रह १८२४ मध्ये प्रसिद्ध झाला. Versi (१८२६) हा त्यानंतरचा काव्यसंग्रह. १८३१ मध्ये प्रकाशित झालेल्या I Cantiह्या त्याच्या काव्यसंग्रहात त्याच्या प्रतिभेचे विशेष परिपक्व असे रूप पाहावयास मिळते. निराशेची गडद छाया लेओपार्दीच्या कवितेवर पडलेली आहे. जीवन ही एक फार मोठी वंचना असून ह्या वस्तुस्थितीचे भान ठेवण्यात माणसाचे मोठेपण आहे, ही भावना त्याने व्यक्त केली आहे. स्थळकाळाच्या अनंतत्वात आत्मनाश साधणे हे मानवी जीवनातील दुःखाच्या समस्येचे उत्तर असल्याचेही त्याने म्हटले आहे. अत्यंत हळव्या आणि सखोल व्यासंगी अशा एका कवीच्या विचारभावनांचे सत्त्व, उदात्त काव्यरूपाने आपल्यासमोर येत असल्याचे त्याच्या कविता वाचताना तीव्रतेने जाणवते. त्याच्या कवितेतील शब्दांतून निर्माण होणारी सांगितिकता ‘दुःखाचे विरेचन’ घडवून आणते, असाही अनुभव येतो. 

कुलकर्णी, अ. र.