पास्कोली , जोव्हान्नी : (३१ डिसेंबर १८५५ -६ एप्रिल १९१२). इटालियन कवी व विद्वान. जन्म सान माउरो रोमान्या येथे. तो बारा वर्षांचा असतानाच एका अज्ञात व्यक्तीकडून त्याच्या वडिलांचा खून झाला. त्यानंतर वर्षभरातच त्याची आई निवर्तली आणि पुढे काही भावंडेही मरण पावली. परिणामतः त्याचे सारे बालपण दुःखात आणि दारिद्र्यात गेले. प्रारंभीचे शिक्षण चर्चने चालविलेल्या शाळांमधून झाल्यानंतर तो बोलोन्या विद्यापीठात दाखल झाला व तेथे विख्यात इटालियन कवी जोइवे कार्दूतची ह्याच्या अध्यापनाचा लाभ त्याला मिळाला. ग्रीक-लॅटिन भाषांवर पास्कोलीने प्रभुत्व मिळविले होते. क्रांतिकारक राजकीय विचारांचा प्रभाव आरंभी त्याच्या मनावर होता व १८७९ मध्ये राजकीय अराजकाचा प्रचार-पुरस्कार करीत असल्याच्या आरोपावरून त्याला कही महिने तुरुंगवासही घडला होता. त्यानंतरच्या काळात जगातील दुष्ट प्रवृत्तींचा विचार विशेष खोलवर जाऊन करण्याची आवश्यकता त्याला जाणवली आणि मानवी जीवनाभोवती असलेल्या गूढतेच्या वलयाने त्याच्या चिंतनशील मनाचा ताबा घेतला. १८८९ पासून तो अध्यापनक्षेत्रात शिरला आणि इटलीतील विविध शाळांतून आणि विद्यापीठांतून त्याने ग्रीक, लॅटिन आणि इटालियन साहित्यांचे अध्यापन केले. १९०५ मध्ये बोलोन्या विद्यापीठाच्या सेवेतून कार्दूतची निवृत्त झाल्यानंतर तेथे इटालियन साहित्याच्या अध्यासनावर पास्कोलीची नियुक्ती करण्यात आली आणि तेथे तो आमरण राहिला.

पास्कोली तरुण वयातच काव्यलेखनाकडे वळला. त्याची जन्मभूमी आणि शोकात्म बालपण ह्यांनी त्याच्या कवितेचा आशय आकारला आहे. रोमान्याचे रंगरूप तीतून उत्कटपणे उमटले परंतु जन्ममृत्यूच्या गूढाची एक सखोल जाणीवही तिने व्यक्त केली. त्याला निसर्गाची ओढ होती तथापि त्याने घडविलेल्या निसर्गदर्शनातूनही खिन्नतेचा एक स्रोत सतत प्रत्ययास येतो. अबोल शेते, पक्ष्यांच्या रिकाम्या घरट्यांतून डोकावणारे एखादे पीस, मूक अरण्यातून एकटाच गाणारा पक्षी आणि एकाकी, विस्तृत भूमीवरून वाहत जाणारा वारा पास्कोलीच्या कवितांतून आढळतात. आपल्या वेदनेत त्याने निसर्गाला सहभागी करून घेतलेले आहे. कवितेतून रूपास येणाऱ्या निसर्गचित्राचे बारीकसारीक तपशीलही त्याने कलात्मकतेने टिपले आहेत. हे करीत असताना इटालियन कवितेची शब्दकळा विस्तारण्याचे कार्य त्याच्या हातून स्वाभाविकपणे घडून आले. त्यासाठी बोलभाषेतले तसेच आर्ष शब्द त्याने वापरले विविध पक्ष्यांचे ध्वनी त्यांच्या विशुद्ध स्वरूपात आणि निसर्गातील घडामोडींतील ताल आणि लय आपल्या कवितांतून प्रत्ययकारीपणे निर्माण करून दाखविली. प्रभावी प्रतिमासृष्टी आणि अन्वर्थक प्रतीकात्मकता ही पास्कोलीच्या कवितेची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये होत.

Myricae (१८९१), Canti di Castelveccio (१९०३), Poemi Conviviali (१९०४) व Poemi del Risorgimento… (१९१३) हे पास्कोलीचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह होत.

पास्कोलीने लॅटिनमध्येही कविता रचिल्या. विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ इटालियन कवी गाब्रिएले दान्नून्त्स्यो ह्याने ऑगस्टन युगानंतरचा श्रेष्ठ लॅटिन कवी म्हणून पास्कोलीचा गौरव केला आहे. बोलोन्या येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ.र.