दिव्हीना कोम्मेदीआ : जगद्‌विख्यात इटालियन महाकवी दान्तेकृत महाकाव्य. ‘डिव्हाइन कॉमेडी’ हा ह्या महाकाव्याच्या शार्षकाचा इंग्रजी पर्याय रूढ आहे. स्वतः दान्तेने ह्या महाकाव्याला कोम्मेदीआ एवढेच शीर्षक दिलेले होते.  ‘डिव्हाइन’ किंवा  ‘ईश्वरी’ हे आदरार्थी विशेषण पुढील काळात लावले गेले. मध्ययुगीन रूपककाव्यांच्या परंपरेतील हे महाकाव्य आहे. १३०८ च्या सुमारास दान्तेने ते लिहावयास घेऊन १३२१ मध्ये पूर्ण केले.

ह्या महाकाव्याचे एकूण तीन खंड : ‘इनफेर्नो ’ (इं. अर्थ, हेल ) ‘पुर्गातोरीओ’ (इं. अर्थ पर्‌गेटरी) आणि  ‘पारादिसो ’ (इ. अर्थ, पॅराडाइस), प्रत्येक खंड ३३ सर्गांचा असून उपोद्घातासाठी एका स्वतंत्र सर्गाची योजना केली आहे. म्हणजे एकूण १०० सर्गांचे हे महाकाव्य आहे, ३ हा आकडा ख्रिस्ती ट्रिनिटीचे प्रतीक. महाकाव्याचे तीन खंड, प्रत्येक खंडातील सर्गसंख्या तीन या पटीतील असणे, ह्यातील प्रतीकार्थ स्पष्ट आहे. हे महाकाव्य ‘कोम्मेदीआ’ किंवा ‘सुखात्मिका’ ठरते ते अशासाठी, की ह्यात कवी नरकाच्या प्रदेशांतून निघून अखेरीस स्वर्गापर्यंत येऊन ठेपतो.

महाकवी दान्तेचा परलोकाकडील प्रवास, हा ह्या महाकाव्याच्या वरपांगी विषय. १३०० साल गुड फ्रायडे हा दिवस. एका घनघोर अरण्यात आपली सैरावैरा भ्रमंती चालू असल्याचे कवीला जाणवते. अस्वस्थ चित्ताने एक रात्र काढल्यानंतर सूर्यप्रकाशाने चमचमणाऱ्या एका टेकडीजवळ तो येतो. ही टेकडी कवीला चढून जावयाची असते परंतु तीन हिंस्र श्वापदे –चित्ता, सिंह आणि लांडगी–त्याच्या मार्गात अडथळे आणतात. अशा परिस्थितीत कुमारी मेरी, सेंट ल्यूसी आणि दान्तेचे जिच्यावर अलोट प्रेम हाेते, ती बीआट्रिस रोमन महाकवी व्हर्जिल ह्याला दान्तेच्या साहाय्यार्थ पाठवितात. व्हर्जिल दान्तेला नरकाच्या प्रदेशातून पर्‌गेटरी पर्वतावर घेऊन जातो. ह्या पर्वताच्या शिखरावर त्याला स्वर्गाकडे दृष्टी लावून उभी असलेली बीआट्रिस भेटते. ती त्याला स्वर्गात घेऊन जाते ईश्वराचा साक्षात्कार घडविते.

दान्तेचा हा प्रवास म्हणजे रूपकार्थाने निश्चयपूर्वक ईश्वराप्रत जाऊ इच्छिणाऱ्या कोणत्याही आत्म्याचा आध्यात्मिक प्रवास म्हणता येईल. घनघोर अरण्य हे दिशाहीन जीवनाचे प्रतीक दान्तेचा मार्ग शोधणारी श्वापदे म्हणजे माणसाला त्याच्या आध्यात्मिक उन्नतीपासून दूर खेचणारे लोभ, लालसा, गर्व ह्यांसारखे दुर्गुण व्हर्जिल म्हणजे विवेक, तत्त्वज्ञान बीआट्रिस म्हणजे देवत्व.

‘पर्गेटरी ’ ही पश्चातापाची, उपरतीची अवस्था. मानवी विवेक आपल्याला त्या अवस्थेच्या टोकापर्यंत नेऊ शकतो त्यानंतरच्या प्रवासासाठी आधार लागतो प्रत्यक्ष देवत्वाचाच.

ह्या महाकाव्याचा रूपकार्थ त्यावर लादल्यासारखा वाटत नाही, तर तो त्याच्याशी एकात्मच असल्याचे जाणवते. ह्या महाकाव्यासाठी दान्तेने  ’तेर्झा रीमा’ ह्या वृत्ताचा वापर केला. ह्या वृत्तयोजनेत यमके एकमेकांत गुंतविली जातात आणि त्यामुळे निवेदनाचा ओघ सतत वाहता राहतो. मानवी आत्म्याच्या क्रमशः होत जाणाऱ्या उन्नतीचे चित्र कोम्मेदीआतून रेखाटण्याच्या निमित्ताने आपल्या समकालीन परिस्थितीवर भाष्य करण्याची संधीही दान्तेने घेतली. त्याच्या काळातील संस्था आणि व्यक्ती ह्यांच्यातील त्याला जाणवणारे दोष त्याने आपल्या महाकाव्यातून उघड केले आहेत स्वतःचे राजकीय आणि नैतिक तत्त्वज्ञानही मांडले आहे. ॲरिस्टॉटलच्या नीतिशास्त्राचा आणि सेंट टॉमस अक्काय्‌नस ह्या मध्ययुगीन तत्त्वचिंतकाच्या विचारांचा दान्तेवरील प्रभाव ठळकपणे जाणवतो. दान्तेने स्वतःस अवगत असलेल्या तक्कालीन ज्ञानसंचिताचा ह्या महाकाव्यासाठी उत्तम उपयोग करून घेतलेला आहे, त्यामुळे एका युगाचे चित्र अखंडपणे आपल्या डोळ्यांसमोरून सरकत जाते. व्हर्जिलबद्दल दान्तेला मोठा आदर होता. कोम्मेदीआतील परलोकचित्रणावर व्हर्जिलच्या ईनिडचा प्रभाव आहे मानवी बुद्धीचे आणि विवेकाचे प्रतीक म्हणून व्हर्जिल ह्या महाकाव्यात यावा ही बाबही ह्या आदराची सूचक ठरते. महाकाव्यलेखनाचे सफाईदार तंत्र, दान्तेचे विलक्षण भाषाप्रभुत्व आणि या संबंध महाकाव्यातून प्रतीत होणारा एक उदात्तगंभीर सूर ही या महाकाव्याची अन्य उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.

गोखले, शांता