देलेद्दा, ग्रात्स्या : (२७ सप्टेंबर १८७५–१५ ऑगस्ट १९३६). इटालियन कादंबरीकर्त्री. सार्डिनियातील नूओरो येथे जन्म. रूढ अर्थाने तिचे शिक्षण असे झालेच नाही. वयाच्या सतराव्या वर्षापासून ती लेखन करू लागली. तिच्या बहुतेक कादंबऱ्यांना सार्डिनियाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. सार्डिनियाचा प्रदेश आणि तेथील आदिम वातावरण देलेद्दाच्या कादंबऱ्यांतून इटालियन साहित्यात प्रथम प्रकटले. व्यक्तींच्या अंतर्मनांतील मोह आणि पाप ह्यांमुळे घडून येणारे शोकात्म परिणाम तिच्या कादंबऱ्यांतून तिने प्रामुख्याने चित्रित केलेले आहेत. एलिआस पोर्तोलू (१९३०) ही तिची सर्वश्रेष्ठ कादंबरी. ⇨ जोव्हान्नी व्हेर्गानंतर इटालियन साहित्यातील वास्तववादाची (व्हेरीस्मो) देलेद्दा ही सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी समजली जाते. १९२६ साली साहित्याचे नोबेल पारितोषिक तिला देण्यात आले. रोममध्ये ती निधन पावली.

कुलकर्णी, अ.र.