दान्नून्त्स्यो, गाब्रिएले : (१२ मार्च १८६३–१ मार्च १९३८). इटालियन कवी, नाटककार, कादंबरीकार व राजकारणी लढवय्या. इटलीतील पेस्कारा ह्या शहरी त्याचा जन्म झाला. विद्यार्थिदशेत असतानाच तो कविता लिहू लागला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी प्रिमो व्हेरे (१८७९, इं. शी. इन अर्ली स्प्रिंग) हा त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या कांतो नूओव्होने (१८८२, इं. शी. न्यू कँटोज) कवी म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित केली. अभिजात छंदांची सफाईदार हाताळणी, अभिजात साहित्यकृतींतील विपुल निर्देश, प्रखर देशभक्ती, निसर्गाच्या विविध रूपांना सहजपणे गीतात्म करण्याचे सामर्थ आणि विशेषत: जीवनाबद्दलची उत्कट आसक्ती ही त्याच्या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये ह्या आरंभीच्या काव्यसंग्रहांतूनही प्रत्ययास येतात. शुभ्र, भक्कम दात भूमातेने निर्मिलेल्या फळांवर रोवून त्यांचा मनसोक्त आस्वाद घेण्याचे आवाहन दान्नूनत्स्योने कांतो नूओव्होच्या अगदी आरंभीच केलेले आहे. अनेक रंगांचा, प्रकाशांचा आणि व्हागनरच्या संगीतातील सखोल अनुनादांचा एकत्र स्फोट झाल्याचा प्रत्यय कांतो नूओव्होने समीक्षकांना दिल्याचे नमूद झालेले आहे. विख्यात नव–अभिजाततावादी इटालियन कवी ⇨ जोझ्वे कार्दूत्‌ची ह्याच्या कवितेचा – विशेषत: ‘ बार्‌बॅरिअन ओड्‌स’ (इं. अर्थ) ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्याच्या उद्देशिकांचा – लक्षणीय प्रभाव दान्नून्त्स्योच्या सुरुवातीच्या कवितेवर स्पष्टपणे जाणवतो. पुढे नीत्शे, डॉस्टोव्हस्की, माटरलिंक इत्यादिकांच्या साहित्याचे आणि विचारांचे संस्कारही त्याच्या वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्वावर झाले. तथापि साहसी, बेडर वृत्तीने जीवनाचा उपभोग घेणे ही दान्नून्त्स्योची प्रकृती होती आणि मूलत: तीतूनच त्याची कविता अगदी स्वाभाविकपणे अवतरलेली होती तिचा आशय हा त्याच्या व्यक्तिगत जीवनाचाच आशय होता. त्याच्या प्रतिभेचे परिपक्व स्वरूप ‘लाउदी’…(संपूर्ण इं. अर्थ प्रेजिस ऑफ द स्काय, ऑफ द सी, ऑफ द अर्थ अँड ऑफ हीअरोज) ह्या त्याने आयोजिलेल्या काव्यसंग्रहमालेतील अल्सिओनीसारख्या काव्यसंग्रहात विशेषत्वाने प्रत्ययास येते. तस्कनीमधील वसंत ऋतूच्या विविध दर्शनांनी चेतविलेल्या संवेदना शब्दांतून पुन्हा जागृत करण्याचा प्रयत्न त्यात दान्नून्त्स्योने केला आहे.

इंद्रियजन्य सुखांची कांक्षा, कमालीची अहंकेंद्रितता, क्रौर्य, पशुता ह्यांबद्दलचे आकर्षण आणि हे सारे व्यक्त करणारा एक आदिम, आक्रमक सूर ही दान्नून्त्स्योच्या काव्याची सर्वसाधारण वैशिष्ट्ये आहेत.तथापि त्याच्या कवितेने इटालियन भाषेच्या अनेक सुप्त शक्ती जागृत केल्या.

दान्नून्त्स्योच्या कथा–कादंबरीलेखनावर एकोणिसाव्या शतकातील श्रेष्ठ इटालियन कादंबरीकार ⇨ जोव्हान्नी व्हेर्गा ह्याचा प्रभाव जाणवतो. व्हेर्गाने सिसिलीतील शेतकऱ्यांच्या जीवनाभोवती आपल्या कादंबऱ्यांची कथानके गुंफली दान्नून्त्स्योने आपल्या नोव्हेल देल्ला पेस्कारा (१९०२) ह्या कथासंग्रहात पेस्कारा ह्या आपल्या जन्मभूमीची, तेथील कृषिजीवनाची चित्रे रंगविली. विख्यात फ्रेंच कथाकार मोपासां ह्याचा प्रभावही त्याच्या कथालेखनावर जाणवतो. इल पीआचेरे (१८८९, इं. भा. द चाइल्ड ऑफ प्‍लेझर, १८९८), इल ट्रीओंफो देल्ला मोतें (१८९४, इं. भा. द ट्रायंफ ऑफ डेथ, १८९६) ह्या दान्नून्त्स्योच्या काही उल्लेखनीय कादंबऱ्या. द चाइल्ड ऑफ प्‍लेझरचा नायक दान्नून्त्स्योच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक रंग घेऊन वावरताना दिसतो. दान्नून्त्स्योच्या नंतरच्या कादंबऱ्यांतही ह्या–ना–त्या रूपात तो स्वत:च अवतरल्याचे सामान्यत: दिसून येते. द ट्रायंफ ऑफ डेथवर नीत्शेच्या विचारांचा प्रभाव आहे.

त्याने इटालियन आणि फ्रेंच भाषांत नाटकेही लिहिली. ला फील्या दी योरीओ (१९०४, इं. भा. द डॉटर ऑफ योरीओ, १९०७) ही इटालियन शोकात्मिका त्याची श्रेष्ठ नाट्यकृती म्हणून ओळखली जाते तथापि श्रेष्ठ नाटककारांत दान्नून्त्स्योची गणना केली जात नाही.

इटलीच्या संसदेचा (पार्लमेंट) तो काही काळ सदस्य होता (१८९७–१९००). तथापि राजकारण हा त्याच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचाच एक पैलू होता. विलासी जीवनपद्धतीमुळे त्याला अतोनात कर्ज झाले होते. धनकोंना चुकविण्यासाठी तो फ्रान्समध्ये पळाला (१९१०) आणि तेथील वाङ्‌मयीन वर्तुळात त्याने स्वत:साठी स्थान मिळविले. पहिल्या महायुद्धाचा आरंभ झाल्यानंतर तो इटलीत परतला (१९१५) व इटलीने दोस्तांच्या बाजूने युद्धात उतरले पाहिजे, असे आग्रहपूर्वक प्रतिपादू लागला. इटली युद्धात उतरल्यानंतर एक लढवय्या म्हणून त्याने प्रथम भूसेनेत आणि नंतर हवाई दलात काम केले. हवाई दलात वैमानिक म्हणून त्याने केलेल्या पराक्रमी कामगिरीमुळे इटलीतील त्याची प्रतिमा उजळून निघाली. इटलीप्रमाणे फ्रान्स व ब्रिटन ह्या देशांनीही सैनिकी सन्मानचिन्हे देऊन त्याचा गौरव केला. युद्धविरामानंतर भरलेल्या शांतता परिषदेत, इटलीसहित सर्व दोस्त राष्ट्रांनी, फ्यूमे (रियेका) हे ऑस्ट्रिया–हंगेरीकडून मिळविलेले शहर यूगोस्लाव्हियाला देण्याचा घेतलेला निर्णय दान्नून्त्स्योला रुचला नाही आणि हे शहर इटलीकडेच आले पाहिजे, अशी भूमिका घेऊन १२ सप्टेंबर १९१९ रोजी सु. ३०० स्वयंसेवकांसह त्या शहरात शिरून तेथे त्याने आपला अंमल बसविला. १९२० च्या डिसेंबरमध्ये इटालियन सरकारने स्वत: हस्तक्षेप करून तेथून त्याला दूर होण्यास भाग पाडले. तथापि ह्या घटनेमुळे इटालियन जनतेला त्याच्या देशभक्तीबद्दल वाटणारी आदराची भावना आणखी उत्कट झाली. फ्यूमे प्रकरणामुळे इटलीतील फॅसिस्ट प्रवृत्तींना चालना मिळाली. मूसोलिनीच्या फॅसिस्ट सरकारला दान्नून्त्स्योची सहानुभूती लाभली. १९२४ मध्ये इटालियन सरकारने ‘प्रिन्स ऑफ मोंते नेव्होसो’ ही पदवी त्याला दिली. आपल्या आयुष्याची अखेरची वर्षे इटालियन रिव्हिएरावरील गार्दोने येथे त्याने घालविली.

कुलकर्णी, अ. र.