केलर, गोट्फ्रीट : (१९ जुलै १८१९–१५ जुलै १८९०). स्विस कादंबरीकार, कथाकार आणि कवी. जर्मन भाषेत लेखन. जन्म झुरिक (स्वित्झर्लंड) येथे एका गरीब कुटुंबात. काही काळ म्यूनिक येथे चित्रकलेचे शिक्षण घेतले (१८४०–४२). तथापि तो यशस्वी चित्रकार होऊ शकला नाही. त्यानंतर तो काव्यलेखनाकडे वळला. Gedichte (१८४६) हा त्याच्या कवितांचा पहिला संग्रह. १८४८ ते १८५० ह्या काळात त्याने झुरिक सरकारची शिष्यवृत्ती मिळवून जर्मनीतील हायड्लबर्ग येथे तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. झुरिकला परतल्यानंतर (१८५५) काही काळ (१८६१–७६) सरकारी नोकरी केली. झुरिकला परत येण्याआधी काही वर्षे बर्लिनला राहून नाट्यलेखनात आणि रंगभूमीच्या अभ्यासात मन घातले. तथापि तो नाटककार होऊ शकला नाही. Der grune Heinrich (चार खंड, १८५४-५५, इं. भा. ग्रीन हेन्री, १९६०) ह्या नावाची आत्मचरित्रात्मक कादंबरी त्याने लिहिली. ती लिहिताना गटेच्या व्हिल्हेल्म माइस्टर  ह्या कादंबरीचा आदर्श केलरपुढे होता. ह्या कादंबरीत नायकाचे बालपण व पौगंडावस्था ह्यांचे चित्रण करीत असताना केलर कलात्मक मनोधारणा सामाजिक वास्तवाशी कसे जमवून घेते, ते दाखवितो. ह्या कांदबरीनंतर तो कथालेखनाकडे वळला. Die Leute von Seldwyla (१८५६, इं. भा. द पीपल ऑफ सेल्डविला, १९२९) आणि Sieben Legenden (१८७२, इं. भा. सेव्हन लेजंड्स, १९२९) हे त्याचे काही उल्लेखनीय कथासंग्रह.द पीपल ऑफ सेल्डविलामधील प्रत्येक कथा एकेका मनोविकृतीभोवती गुंफलेली आहे. सेव्हन लेजंड्समध्ये संतांच्या आणि कुमारी मेरीच्या जीवनांतील आख्यायिभूत प्रसंगांचे केलर प्रभावी पुनःकथन करतो. १८८३ मध्ये Gesammelte Gedichte हा त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. Martin Salander (१८८६) ही कादंबरी त्याची अखेरची साहित्यकृती. समकालीन व्यापारी समाजाचे व्यंगचित्रण तीत आहे. झुरिक येथेच तो निधन पावला.                        

मेहता, कुमुद