ओडिसी : प्राचीन महाकवी ⇨होमरचे अभिजात ग्रीक महाकाव्य. डॅक्टिलिक हेक्झॅमीटरमध्ये ह्या महाकाव्याचे एकूण चोवीस सर्ग आहेत. ट्रोजन युद्धावरून परतणारा ओडिस्यूस (त्याचेच रोमन नाव यूलिसीझ) हा इथाकाचा राजा त्याचा नायक आहे. घरी परतताना ओडिस्यूसवर कोसळणारी संकटे, त्याचे इथाका  येथे पुनरागमन आणि त्याची पत्नी पनेलपी हिच्याशी  त्याचे घडून येणारे पुनर्मीलन हा ओडिसीचा कथाविषय.

ऑलिंपस पर्वतावर भरलेल्या देवसभेचे वर्णन महाकाव्याच्या आरंभीच आले आहे. तीत ओडिस्यूस हाच चर्चेचा विषय आहे. ओडिस्यूसला घर सोडून वीस वर्षे झाली आहेत, तर ट्रॉयचे युद्ध संपून दहा वर्षे उलटली आहेत. तो परतीच्या मार्गावर असताना विवाहाच्या अभिलाषेने त्याला कॅलिप्सो नावाच्या समुद्रदेवतेने एका बेटावर अडकवून ठेवलेले आहे. यातून ओडिस्यूसची सत्वर सुटका करावी, असे आवाहन झ्यूस ह्या देवांच्या राजाला अथीना ही देवता करते. नंतर ती पुरुषवेषात इथाका येथे जाऊन ओडिस्यूसचा पुत्र टेलेमॅकस ह्याची गाठ घेते. ओडिस्यूसच्या दीर्घकालीन अनुपस्थितीचा फायदा घेऊन पनेलपीशी विवाह करू इच्छिणाऱ्या अनेकजणांचा उपसर्ग  पनेलपी आणि टेलेमॅकस सहन करीत  असतात. अथीना टेलेमॅकसला ओडिस्यूसचा शोध घेण्याचा सल्ला देते आणि त्याच्या वीरवृत्तीला आवाहन करते. परिणामतः आतापर्यंत भांबावलेला टेलेमॅकस त्या उपद्रवी लोकांना धीटपणे तोंड देऊ लागतो. दुसऱ्या सर्गात टेलेमॅकस इथाकातील लोकांची सभा घेतो आणि पनेलपीच्या मागे लागणाऱ्या विवाहेच्छुकांना त्यांच्या उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा विफल प्रयत्‍न करतो . ह्या सर्गाच्या अखेरीस अथीना पुन्हा वेषांतर करून टेलेमॅकसला भेटते आणि ओडिस्यूसचा शोध घेण्यासाठी ती  दोघे  गुप्तपणे इथाका सोडतात.

तिसऱ्या व चौथ्या सर्गांत टेलेमॅकस कित्येक वर्षे अज्ञात असलेल्या आपल्या वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. प्रथम तो पीलॉसच्या नेस्टॉर ह्या राजाकडे जातो आणि पीयसिस्ट्रेटस ह्या त्याच्या मुलाला बरोबर घेऊन मेनेलेअस आणि हेलन ह्यांच्या भेटीसाठी  स्पार्टाला पोहोचतो. कॅलिप्सो ह्या समुद्रदेवतेने ओडिस्यूसला अडकवून ठेवल्याची माहिती  टेलेमॅकसला मेनेलेअसकडून समजते. दरम्यानच्या ताळात इथाकामध्ये अँटिनाउस  हा विवाहेच्छुकांचा पुढारी टेलेमॅकसला ठार मारण्याचा कट रचतो. पनेलपीला हा कट समजतो परंतु ती निद्रिस्त असताना अथीना देवतेने पाडलेल्या एका स्वप्नामुळे तिला धीर येतो. पाचव्या सर्गात झ्यूसच्या आज्ञेमुळे ओडिस्यूस कॅलिप्सोच्या तावडीतून सुटल्याचा कथाभाग येतो. ओडिस्यूस आपला पुढील प्रवास करीत असताना त्याच्यावर नाराज असलेला, भूकंप आणि समुद्र ह्यांचा देव पोसायडन हा प्रचंड वादळ निर्माण करून त्याचा तराफा उद्ध्वस्त करून टाकतो.ओडिस्यूस फिआशियनांच्या (ग्रीक मिथ्यकथांत वर्णिलेले शांतताप्रेमी लोक) शीर्या नामक बेटावर येतो. सहाव्या सर्गात फिआशियन राजकन्या नाउसिका हिच्या स्वप्‍नात येऊन अथीना तिला तिचा विवाहदिन जवळ आल्याचे सूचित करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील कपडे नदीवर धुण्यासाठी नेण्याचा सल्ला देते. नाउसिका नदीवर आल्यानंतर तिला नग्‍नावस्थेतील ओडिस्यूस दिसतो. ती त्याला कपडे आणि अन्न देऊन राजवाड्यात आपल्या आईवडीलांस – राजा अल्सिनोअस आणि राणी आरेटे ह्यांस भेटण्यास  सांगते. सातव्या सर्गात ओडिस्यूस नाउसिकाच्या आईवडिलांस भेटतो. एक वेगवान जहाज देऊन त्यांची पाठवणी करण्याचे ते वचन देतात. ओडिस्यूसच्या सन्मानार्थ अल्सिनोअसने दिलेली मेजवानी आणि आयोजिलेल्या क्रीडास्पर्धा ह्यांचे वर्णन आठव्या सर्गात आहे. ह्या प्रसंगी एका आंधळ्या चारणाने गायिलेले ट्रॉयच्या लढाईचे गीत ऐकून ओडिस्यूसच्या डोळ्यांत आसवे उभी राहतात. नवव्या सर्गात तो आपण कोण आहोत, हे अल्सिनोअसला सांगतो आणि भावविवश होऊन आपल्या भ्रमंतीचे वर्णन उपस्थितांना ऐकवू लागतो. ओडिसीचे नऊ ते बारा हे सर्ग ह्या वर्णनांनीच व्यापले आहेत. कमळे खाणारे लोक, सायक्लोपनामक रानटी जमातीच्या एकाक्ष, नरमांसभक्षक लोकांशी त्याने केलेला मुकाबला, ओडिस्यूसच्या सहकाऱ्यांचे डुकरांत रूपांतर करणारी  पण ओडिस्यूसवर प्रेम करणारी सर्सी ही समुद्रदेवता, तिच्या तावडीतून सुटल्यानंतर ओडिस्यूसची हेडीझला – मृतांच्या जगाला – भेट, तेथे सर्सीच्या बेटावर अपघाताने मरण पावलेल्या एका सहकाऱ्याचे दर्शन आणि त्याच्या विनंतीवरून त्याचे दफन करण्यासाठी सर्सीकडे पुनरागमन, पुढील प्रवासात आपल्या मघुर गीतांनी दर्यावर्द्यांना  भुलवून त्यांचा नाश घडवून आणणाऱ्या सायरिन नावाच्या समुद्रदेवतांचा त्याने टाळलेला धोका, सिल्ला ह्या एका खडकावर राहणाऱ्या राक्षसिणीने खाऊन टाकलेले त्याचे सहकारी इ. अद्‍भुत घटना ह्या तीन सर्गांत आलेल्या आहेत. त्यांतील पूर्वदीपन तंत्राचा उपयोग लक्षणीय आहे.

तेरा ते चोवीस ह्या पुढील बारा सर्गांत फिआशियनांच्या जहाजात बसून ओडिस्यूस इथाकास परततो व पनेलपीशी आणि त्याच्या पित्याशी  त्याचे पुनर्मीलन घडते, हा कथाभाग आहे. इथाकाला येताच ओडिस्यूस यूमिअस ह्या आपल्या निष्ठावंत सेवकाची  गाठ घेतो. यूमिअसकडे टेलेमॅकसही येऊन दाखल होतो. ओडिस्यूस टेलेमॅकसला आपली ओळख देतो आणि ते पनेलपीच्या मागे लागणाऱ्या विवाहेच्छुकांचा कसा निकाल लावावा, ह्याची योजना आखतात. टेलेमॅकसला ठार मारण्याचा कट फसतो (सर्ग तेरा ते सोळा), सतरा ते वीस हे सर्ग मुख्य प्रसंगाची पूर्वतयारी म्हणता येतील. त्यात भिकाऱ्याच्या वेषात ओडिस्यूसचा राजवाड्यात प्रवेश, स्वतःची ओळख न देता त्याने घेतलेली पनेलपीची भेट, पनेलपीला पडणारे पुढील सुखकारक घटनांचे स्वप्‍न, तिच्या स्वयंवराची तयारी इत्यादींचे वर्णन आहे.

एकविसाव्या सर्गात स्वयंवरासाठी ओडिस्यूसचे धनुष्य आणण्यात येते. त्यावर बाण चढवून तो बारा कुर्‍हाडींच्या  रांगेतून सोडणाऱ्याशी पनेलपी लग्न करणार असते. कोणीच यशस्वी होत नाही, हे पाहून भिकाऱ्याच्या वेषातील ओडिस्यूस टेलेमॅकसच्या परवानगीने विरोध दूर सारून पुढे होतो आणि यशस्वीपणे बाण सोडतो. यानंतर बाविसाव्या सर्गात स्वतःचे खरे रूप प्रगट करून ओडिस्यूस अँटिनाउसलाच ठार करतो. इतर विवाहेच्छुक भयभीत होऊन पळू लागतात पण त्यांनाही ठार केले जाते. हे रणकंदन चालू असताना पनेलपी मात्र अथीनाच्या प्रभावामुळे गाढ निद्रेत असते. तेविसाव्या सर्गात तिला हा आनंददायक वृत्तान्त समजतो आणि ओडिस्यूस-पनेलपीचे पुनर्मीलन होते. चोविसाव्या सर्गात ओडिस्यूसची आपल्या वृद्ध पित्याशी भेट होते.

ओडिसी आणि ⇨ इलिअड  ही दोन्ही महाकाव्ये होमरचीच असली, तरी त्यांच्या स्वरूपातील फरक लक्षणीय आहे. इलिअड शोकात्म आहे, तर ओडिसी एखाद्या सुखात्म कादंबरीसारखे आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची मानवाची धडपड हे ओडिसीचे मुख्य सूत्र, ओडिस्यूसच्या रूपाने होमरने साकार केले आहे. ओडिस्यूसचे शहाणपण स्वाभविक वाटते संपादित वाटत नाही. नैसर्गिक धीरोदात्तता आणि आत्मसंयम ह्यांचा तो स्वाभाविक परिपाक वाटतो. सर्वसामान्य माणसाप्रमाणेच आपले घर आणि पत्‍नी ह्यांची ओढ असणाऱ्या ओडिस्यूसच्या व्यक्तिमत्त्‍वातून प्रत्ययाला येणाऱ्या विलोभनिय ऐहिकतेमुळे आधुनिक वाचकालाही तो विशेष जवळचा वाटतो. ओडिसीतील कथानिरूपणाची शैली साधी, सफाईदार आणि वेधक आहे. इलिइडच्या मानाने ह्या महाकाव्याची रचनाही अधिक बांधेसूद आहे. अनेक लोककथांचा कलात्मक उपयोग होमरने ह्यात करून घेतला. ओडिसी लोकवाङ्‍मयाच्या जवळ जाणारे वाटते, याचे हे एक महत्त्वाचे कारण. पातिव्रत्या आणि शुद्ध पत्‍नीप्रेम ह्यांचा होमरने ह्या काव्यात मोठा गौरव केलेला आहे तसेच मित्रप्रेम, स्वामिनिष्ठा ह्यांचे मोलही पटवून दिले आहे. ओडिस्यूसप्रमाणेच पनेलपी, टेलेमॅकस, यूमिअस, अँटिनाउस, अथीना, कॅलिप्सो, सर्सी, आरेटे इ. व्यक्तिरेखा होमरने अतिशय जिव्हाळ्याने रंगविलेल्या आहेत. कॅलिप्सो आणि सर्सी ह्या समुद्रदेवता असल्या, तरी ओडिस्यूसवरील त्यांच्या प्रेमातून त्यांचे मानवी अंग होमरने परिणामकारकपणे दाखवून दिले आहे. पितृसत्ताक कुटुंबपद्धती रूढ असलेल्या ग्रीक समाजात पुरुषाचे वर्चस्व होतेच परंतु पति-पत्नीसंबंधातील प्रतिष्ठाही पाळली जात होती.

युरोपीय समाजात ओडिसीला लाभलेले सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. यूरोपीय मनाला आजही हे महाकाव्य वेगवेगळ्या प्रकारे अर्थपूर्ण वाटते. गाब्रिएले दान्नून्त्स्यो ह्या इटालियन साहित्यिकाला ओडिस्यूस हा नीत्शेला अभिप्रेत असणारा महामानव वाटतो, तर स्वच्छंदतावाद्यांना त्याच्या साहसी वृत्तीचे आकर्षण वाटते. तत्त्वज्ञांना त्याच्या प्रज्ञेचे कौतुक वाटते. दान्ते, जोव्हान्नी पास्कोली, टेनिसन, निकोस काझांटझाकीस, जेम्स जॉइस ह्यांनी ओडिस्यूस ह्या व्यक्तिरेखेचा नव्याने परिणामकारक उपयोग करून घेतला. ओडिस्यूसच्या मूळ आकृतिबंधाला बाध येऊ न देता वेगवेगळ्या काळांत त्याच्यावर वेगवेगळी भाष्येही करण्यात आली आहेत. 

संदर्भ : 1. Palmer, G. H. The Odyssey of Homer, Boston, 1949.

    2. Rieu, E.  V. The Odyessey, Harmondsworth, Middlesex, 1946. 

    3.  Steiner, George Fagles, Robert, Homer, Englewood Cliffs, N.  J. 1963. 

कुलकर्णी, अ. र.  कुलकर्णी, अनिरुद्ध