सायमॉनिडीझ, की ऑसचा : (सु. ५५६– सु. ४६८ इ. स. पू.). श्रेष्ठ ग्रीक भावकवी. इजीअन समुद्रातील कीऑस ह्या बेटावर तो जन्मला. तिथेच त्याने संगीत व काव्यरचनेचा अभ्यास केला. पुढे तो हुकूमशाह हिपार्कसच्या निमंत्रणावरून अथेन्सला गेला. अथेन्समध्ये हिपार्कसच्या दरबारी तो काही काळ होता. तिथे त्याला ⇨ आनाक्रेऑन व लेसस हे कवी भेटले. हिपार्कसच्या खुनानंतर (इ. स. पू. ५१४) तो थेसलीला गेला. तिथे स्कोपाड व अलेयूड या ॲथलेटिक कुटुंबांची मर्जी त्याने संपादिली. पुढे त्याने ॲथलेटिक क्रीडांमधील त्यांच्या विजयोत्सवावर स्तुतिगीते रचली. काही वर्षांच्या वास्तव्यानंतर तो पुन्हा अथेन्समध्ये आला. मॅराथॉनच्या भूमीवर जे क्रीडापटू धारातीर्थी पडले, त्यांच्या सन्मानार्थ रचलेल्या शोकगीतांच्या स्पर्धेत त्याने ग्रीक नाटककार ⇨ एस्किलसच्यासमवेत पारितोषिक मिळविले. आयुष्याच्या अखेरीस तो सिराक्यूस येथे पहिल्या हायरॉनच्या (कार. इ. स. पू. ४७८–४६६) दरबारी होता. हायरॉनच्या दरबारात त्याचा नावलौकिक एवढा वाढला होता की, त्याच्या मध्यस्थीने हायरॉन व ॲकगसचा राजा थेरॉन यांमधील होऊ घातलेला इ. स. पू. ४७५ मधील युद्घप्रसंग टळला. तसेच इ. स. पू. ४८० मध्ये थर्मॉपिली खिंडीत पर्शियन सैन्याशी मुकाबला करण्यासाठी स्पार्टाचे संरक्षक दल सज्ज होते. त्यावरील सायमॉनिडीझचे स्मरणकाव्य संस्मरणीय ठरले असून त्याच्या काव्याचा काही भागच उपलब्ध आहे. या काव्यातून त्याची काव्यप्रतिभा–विशेषतः प्रासंगिक स्वरूपाची काव्यरचना–जाणवते. उदा., एखादा उत्सव, लढाई इत्यादी. ‘एपिनायसिऑन’ किंवा क्रीडाविजयगीत आणि ‘एंकोमिअम’ किंवा स्तुतिगीत हे काव्यप्रकारही त्याने समर्थपणे हाताळले. क्रीडाविजयगीत हा काव्यप्रकार तर त्यानेच ग्रीक भावकवितेत आणला, असे म्हटले जाते. गीकांनी पर्शियावर विजय मिळविल्यानंतर विकसित झालेल्या ग्रीकांश संस्कृतीतील आदर्श कल्पना त्याच्या अवशिष्ट भावकविता व समाधिलेख यांतून दृग्गोचर होतात. ग्रीक कवींत मोबदला घेऊन काव्यरचना करणारा तो पहिलाच कवी असावा.

पहा : ग्रीक साहित्य.

संदर्भ : 1. Bowra, C. M. Greek Lyric Poetry from Aleman to Simonides, London, 1936.

2. Bowra, C. M. Landmarks in Greek Literature, London, 1966.

3. Durrant, Will, The Life of Greece, New York, 1939.

कुलकर्णी, अ. र.