होफ्ट, पीटर कॉरनेलिसन : (१६ मार्च १५८१–२१ मे १६४७). डच नाटककार, इतिहासकार आणि कवी. डच साहित्याच्या प्रबोधनाचा तो अध्वर्यू मानला जातो. त्याची लेखनशैली एकोणिसाव्या शतकातील डच लेखकांनी आदर्श मानली. त्याचा जन्म ॲम्स्टरडॅम येथे एका सधन व्यापारी कुटुंबात झाला. वडील काही काळ तेथे दंडाधिकारी होते. सुरुवातीस काही वर्षे त्याने वडिलांच्या धंद्यात काम केले. नंतर लायडन येथे कायद्याचा अभ्यास करून प्रमुख अधिकारी म्हणून तो कोर्टात काम करू लागला. तत्पूर्वीचAchilles en Polyxenaही त्याची शोकात्मिका रंगमंचावर सादर झाली होती.
होफ्टने १५९८–१६०१ दरम्यान फ्रान्स, इटली व जर्मनी या देशांतून भ्रमंती करून त्यांच्या भाषा आत्मसात केल्या आणि तेथील वातावरणाचा अभ्यास केला. त्याची दुसरी शोकात्मिका Theseus en Ariadne(१६०२) प्रकाशित झाली. त्याने Granida हे सुखात्मिक गोपनाट्य लिहिले (१६०५). या सुखात्मिकेनंतर त्याने Geeraerdt van Velsen(१६१२), Warenar (१६१४) आणि Baeto (१६१६) ही नाटके लिहिली. यांपैकी Warenar हे प्लॉटसच्या Aulularia चे रूपांतर असून इरशीं ह्यावर सेनिकाचा प्रभाव जाणवतो तथापि या नाटकांवर परकीय अभिजात साहित्यिकांचा प्रभाव असला, तरी प्रत्येक नाटकाचा मूळ पिंड डच आहे. काव्य आणि नाट्य लेखनानंतर होफ्ट १६१८ नंतर इतिहास लेखनाकडे आकृष्ट झाला. द हिस्टरी ऑफ हेन्री द ग्रेट (इ.भा. १६२६), द मिझरीज ऑफ द प्रिन्सेस ऑफ द हाउस ऑफ मेदिची (इं. भा. १६३८) याबरोबरच त्याने एकोणीस वर्षे अथक परिश्रम घेऊन De Nederlandsche Historienहा डचांचा इतिहास वीस खंडांत तत्कालीन साधनांचा धांडोळा घेऊन, टॅसिटसचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन लिहिला. त्याच्या या बृहद्ग्रंथातील लॅटिन वाक्यरचना आणि गद्यशैली डच साहित्यातील एक उत्कृष्ट रचना असून प्रबोधनकाळातील तो एक नमुना ग्रंथ होय. तो तत्त्ववेत्त्यांपासून अलिप्त राहून अभिजात साहित्याच्या अभ्यासात व अनुकरणात गुंतला होता. त्यातूनच त्याचे Sticht-rijmen (१६१८, इं. भा. एडिफाईंग व्हर्सिस) काव्य प्रसृत झाले.
तो म्यूडरक्रिंग या कला, काव्य आणि संगीतप्रेमी वर्तुळाचा (गटाचा) पुढारी होता आणि या कलाकारांना तो ॲम्स्टरडॅम जवळच्या त्याच्या म्यूडरस्लॉट या आपल्या निवासी किल्ल्यात पाचारण करीत असे. त्यामुळे या गटाला म्यूडरक्रिंग हे नाव प्राप्त झाले होते. सधन व उच्चपदस्थ गुरलॅण्डच्या बेलिफ पदावर त्याची १६०९ मध्ये राजाने नियुक्ती केली होती. त्या पदावर तो अखेरपर्यंत कार्यरत होता. त्याच्या अखेरच्या दिवसांत फ्रान्सच्या बाराव्या लूई याने त्यास सरदारकी (नाइटहुड) दिली. तेव्हात्याने आपला किल्ला देशाच्या सांस्कृतिक केंद्रांत समाविष्ट केला.
त्याच्या वेळी साहित्यिक वर्तुळात त्याच्या एवढा कुणीही रम्याद्भुत काव्यात श्रेष्ठ नव्हता. त्याच्या काव्यात अस्सल इटालियन भावसदृश स्वछंदतावादी रचना आढळते. तीत त्याने कटाक्षाने व्यक्तिगत उल्लेख टाळले आहेत. भाषेवर त्याचे प्रभुत्व होते आणि छंद व लय सांभाळण्याचे तंत्रत्याने आत्मसात केले होते. डचनवकवितेच्या कक्षा त्याने प्रकट केल्या.
द हेग येथे अल्पशा आजाराने त्याचे निधन झाले.
पहा : डच साहित्य.
देशपांडे, सु. र.
“